Pakistan Crime Statistics Women Rape and Honor Killing : भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानात सध्या गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. दहशतवादाला खतपाणी लागणाऱ्या या देशात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तानात ६०० हून अधिक महिलांवर बलात्कार आणि जवळपास ७०० जणांनी हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटना सातत्याने वाढतच असल्यामुळे तेथील महिलांसह तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्याविषयी…

१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानने आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याच दिवशी समाजमाध्यमांवर ‘आयेशा गिलमना’ नावाने लोकप्रिय असलेल्या २८ वर्षीय ‘शमसो बीबी’ या तरुणीची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. जूनमध्येही १७ वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफ हिचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत या देशात जवळपास आठ महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. यावरून महिलांनी समाजमाध्यमांवर सक्रिय राहणे, स्वतःची ओळख निर्माण करणे आणि कंटेंटच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवणे हे तेथील कट्टरपंथीयांना रुचत नसल्याचे दिसून येत आहे.

शमसो बीबीची हत्या कशी झाली?

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तापत्राने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी शमसो बीबीला काशिफ उर्फ ‘काशी’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तिला टॅक्सिला शहरातील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर शमसो तिची १५ वर्षांची बहीण असीमा आणि भाऊ नैमतुल्लाह हे तिघेही कारमधून त्या ठिकाणाकडे निघाले. त्याचवेळी एका पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या कारवर बेछूट गोळीबार केला. त्यातील एक गोळी थेट शमसो बीबीच्या मानेला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती दुसऱ्या वाहनाला धडकल्याने तिची अल्पवयीन बहीण असीमा गंभीर जखमी झाली. पाकिस्तानी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३० ते ३५ वयोगटातील दोन संशयित आरोपी दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहे. पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला असून नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

शमसो बीबीची हत्या कशामुळे?

शमसो बीबीच्या हत्येनंतर तिचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आले आहे. अवघ्या तीन ते चार वर्षांत टिकटॉकवर तिचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि ३ कोटींहून अधिक लाइक्स होते. त्याशिवाय तिच्या यूट्यूब चॅनेलवरही पावणेदोन लाखांच्या आसपास सबस्क्राइबर्स होते. शमसो बीबीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिची ही निर्घृण हत्या कौसर आणि जावेद उर्फ शाहीन नावाच्या व्यक्तींबरोबर सुरू असलेल्या आर्थिक वादामुळे करण्यात आली. शमसोने तिच्या हक्काचे पैसे परत मागितल्यामुळे तिला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या आणि याबाबत तिने इस्लामाबादमध्ये रीतसर तक्रारही दाखल केली होती. तिचा आवाज दाबण्यासाठी आणि पैसे बळकावण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

पाकिस्तानात महिलांच्या हत्येचं सत्र

जून महिन्यात १७ वर्षीय सोशल मीडिया स्टार सना युसूफ हिचीही तिच्याच घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तिने प्रतिसाद न दिल्यामुळे फैजलाबादच्या २२ वर्षीय उमर हयातने तिची हत्या केली होती. त्याला न्यायालयाने तब्बल २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे, तिच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचीच चूक असल्याचे म्हणत विकृत शेरेबाजी केली होती. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या मते, देशात महिलांवरील हिंसाचार हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. जानेवारी २०२५ मध्ये क्वेटामध्ये एका बापाने टिकटॉकवर सक्रिय असलेल्या त्याच्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही कराची शहरातील एका व्यक्तीने टिकटॉवर ‘अश्लील’ व्हिडीओ तयार केल्याच्या संशयावरून आपल्याच कुटुंबातील चार महिलांचा जीव घेतला होता.

पाकिस्तान महिलांसाठी असुरक्षित देश?

पाकिस्तानात समाजमाध्यमांवर लोकप्रिय असलेल्या महिलांची एकापाठोपाठ एक हत्या होण्याची घटना हे देशातील गंभीर परिस्थितीची वस्तुस्थिती दर्शवते, असे तेथील महिला हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एखाद्या महिलेने पुरुषाच्या नियंत्रणातून बाहेर पडून स्वतः निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास तिची सर्रासपणे हत्या केली जाते, असे महिला हक्क कार्यकर्त्या फरझाना बारी यांनी ‘एबीसी न्यूज’ला सांगितले. आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत पाकिस्तानात ७०० हून अधिक महिलांची हत्या करण्यात आली. त्यापैकी सुमारे एक चतुर्थांश हत्या तथाकथित ‘ऑनर किलिंग’ अर्थात सन्मानाच्या नावाखाली करण्यात आलेल्या घटना असल्याचे सांगितले जाते. याच कालावधीत ६०० हून अधिक महिलांवर बलात्कार झाले. त्यातील अनेक महिलांनी बाळाला जन्म दिल्यामुळे निकाहाआधीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली. पाकिस्तानमधील प्रत्येक भागात एकतरी बलात्कार पीडित महिला गरोदर दिसून येते. आतापर्यंत जवळपास डझनभर पीडित महिलांनी आपला जीव दिला आहे, असे फरझाना यांनी सांगितले.

सनाच्या मृत्यूनंतर संतापजनक प्रतिक्रिया

पाकिस्तानमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, महिलांना असलेला धोका केवळ शारीरिक हिंसाचारापुरता मर्यादित नाही. समाजमाध्यमे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मही त्यांच्यासाठी असुरक्षित ठिकाणे बनली आहेत. सना युसूफच्या हत्येनंतर डिजिटल राइट्स फाउंडेशन या संस्थेने सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे विश्लेषण केले होते. त्यामध्ये अनेक वापरकर्त्यांनी सना युसूफच्या मारेकऱ्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण केल्याचे आढळले. काहींनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करायला हवा होता, अशा संतापजनक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पाकिस्तानमधील स्वतंत्र पत्रकार अम्मारा अहमद यांनीही सनाच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर दिसून आलेल्या महिलांविरोधी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पाकिस्तानी महिलांना मृत्यूनंतरही कोणतीही सहानुभूती किंवा सन्मान मिळत नाही. सना युसूफ या तरुणीची हत्या झाल्यानंतर तिच्या शरीराबद्दल तसेच अंत्यविधीवर खिल्ली उडवणे हे अत्यंत द्वेषपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनांमुळे पाकिस्तानात महिलांना प्रत्यक्ष जीवनात लैंगिक भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.