Pakistan Afghanistan Border War : भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही देशांत सुरू असलेल्या सीमावादाचा संघर्ष आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. यादरम्यान पाकिस्तानवर लवकरच मोठा हल्ला करणार असल्याचा इशारा तालिबान सरकारने दिला आहे. या घडामोडींमुळे भारताच्या शत्रूदेशात प्रचंड घबराट निर्माण झाली असून तेथील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, त्याविषयी…
पाकिस्तान-अफगाणिस्तानात पुन्हा युद्ध?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष आता मोठ्या युद्धाच्या दिशेने वळत आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांनी एकमेकांच्या हद्दीत लष्करी कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मंगळवारी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी कारवाया केल्याची घोषणा केल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तान प्रांतात घुसलेले चार ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. त्यापैकी एक ड्रोन सरानान येथील सरकारी शाळेजवळ कोसळल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तालिबान सरकारनेही या हल्ल्याला दुजोरा दिला असून त्याद्वारे सरानान परिसरातील आयएसआयच्या कथित ठिकाणांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानकडे आधुनिक लढाऊ विमानांचा ताफा नसला तरी त्यांच्याकडे किमान सहा विमाने आणि २३ हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अत्याधुनिक दर्जाची ड्रोनही असून अलीकडच्या सीमावादात त्यांचा वापर वाढला आहे.
दोन्ही देशांत संघर्षाला सुरुवात कशी झाली?
गेल्या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सैनिकांच्या मुख्यालयाजवळ भीषण हल्ला झाला होता. यावेळी झालेल्या स्फोटात पाकिस्तानच्या निमलष्करी दलातील तीन जवान जागीच ठार, तर चारजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यामागे तेहरीक-ए-तालिबान (TTP) पाकिस्तानशी संबंधित जमात-उल-अहरार ही संघटना जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. तसेच अलीकडील अनेक दहशतवादी हल्ल्यांचे सूत्र अफगाणिस्तानातून हलवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानातील पक्तिया आणि कुनार प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. त्यात जवळपास २५ दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय बाजौर जिल्ह्यातील कारवाईत जमात-उल-अहरारचे चार सदस्य ठार झाल्याचेही पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितले. टीटीपीनेही त्यांचा एक प्रमुख कमांडर खान फेरोश उर्फ ‘झाबुल’ या कारवाईत मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
अफगाणिस्तानचा नेमका आरोप काय?
पाकिस्तानने ही कारवाई दहशतवादविरोधी मोहीम असल्याचे सांगितले असले तरी तालिबानने या हल्ल्यांत मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांत किमान २८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असून हा आकडा वाढू शकतो. या भ्याड हल्ल्याचा लवकरच बदला घेतला जाईल, असा इशारा तालिबान सरकारमधील मंत्र्याने दिला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षापासूनच तालिबानवर टीटीपीच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय दिल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळून लावत पाकिस्तानातील दहशतवाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाचा भडका उडाला होता. त्यावेळी दोन्ही देशांत झालेल्या रक्तरंजित संघर्षाचा सगळ्या जगाने तमाशा पाहिला. त्यानंतर कतारच्या मध्यस्थीने तात्पुरता युद्धविराम झाला आणि दोन्ही देशांत वाटाघाटीसाठी बैठकी पार पडल्या. मात्र, त्यातून कोणताही कायमस्वरुपी तोडगा निघाला नाही.
टीडीपीकडून पाकिस्तानवर हल्ल्यांचा सपाटा
यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये हा युद्धविराम संपल्यानंतर टीडीपीने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक आत्मघाती हल्ले करण्याचा सपाटा सुरू केला. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन गझब लिल हक’ची घोषणा करत सीमापार असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल तालिबानने सीमाभागात असलेल्या पाकिस्तानच्या २७ चौक्यांवर ताबा मिळवला. मार्चमध्ये दोन्ही देशांतील संघर्ष आणखीनच तीव्र झाला. पाकिस्तानने काबूल, कंदहार आणि बग्राम हवाई तळावरील ठिकाणांवर हल्ले केले; तर अफगाणिस्तानने रावळपिंडी आणि क्वेटा परिसरात ड्रोन हल्ले वाढवले. रमजान आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे मार्च अखेरीस दोन्ही देशांनी आपापल्या लष्करी कारवाया काही प्रमाणात थांबवल्या होत्या. तरीदेखील सीमावर्ती भागातील चकमकी आणि दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे जूनअखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील संघर्ष उफाळून आला आहे.
पाकिस्तानचा आतापर्यंतचा दावा काय?
पाकिस्तानच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही दहशतवादी संघटना मानली जाते. पाकिस्तानातील सरकार उलथवून इस्लामिक शासन व्यवस्था प्रस्थापित करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानमधील तालिबान आणि टीटीपी या दोन स्वतंत्र संघटना असल्या तरी त्यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले केल्यानंतर टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात आश्रय घेतात आणि तालिबान प्रशासन त्यांना संरक्षण देते, असे तेथील सरकारचे नेत्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२५ मध्ये टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलातील ६६० हून अधिक जवान आणि ५८० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तालिबान सरकारने हे सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानातील दहशतवाद हा त्यांचा अंतर्गत सुरक्षा प्रश्न असून त्याचे नियोजन अफगाणिस्तानातून होत नसल्याचे तालिबान सरकारने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानला तडाखा देण्याची तालिबानची तयारी?
दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. यापूर्वी कतारने दोन्ही देशांत युद्धविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चीननेही या वादात वेळोवेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही दोन्ही देशांतील मतभेद कायम राहिले आणि संघर्ष पुन्हा भडकला आहे. पाकिस्तानच्या ताज्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानने आक्रमक भूमिका घेतली असून थेट युद्धाची भाषा केली आहे. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा लवकरच बदला घेतला जाईल, असा इशारा तालिबानकडून देण्यात आला आहे. यादरम्यान दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र झाला असला तरी त्याचे रुपांतर पारंपरिक युद्ध होण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणी, वाढती महागाई आणि वित्तीय तुटीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये दीर्घकालीन लष्करी कारवाई किंवा भूभागावर ताबा ठेवणे पाकिस्तानसाठी अत्यंत खर्चिक ठरेल. दुसरीकडे, तालिबानकडे काही विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन असले तरी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भूभाग ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक यांत्रिक लष्करी ताकद किंवा सक्षम हवाई दल त्यांच्याकडे नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
