Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शांततेची चर्चा पुन्हा एकदा फिसकटली आहे. दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी इस्तंबूलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. उलटपक्षी दोन्ही देशांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने परिस्थिती आणखीच चिघळली आहे. परिणामी पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान सध्या त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. या हल्ल्यांमागे तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तालिबान सरकार टीटीपीच्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने सर्व आरोप फेटाळून लावले असून उलटपक्षी पाकिस्तानलाच दम भरला आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्ध?

  • गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता.
  • त्यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करून, आपापली ताकद दाखवून दिली होती.
  • या वादावर तोडगा काढण्यासाठी तुर्की व कतारने मध्यस्थीची भूमिका घेतली आणि त्यांच्यात तात्पुरता युद्धविराम घडवून आणला.
  • तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बैठकीच्या माध्यमातून वाटाघाटी सुरू आहेत.
  • यादरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवर वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इस्तंबूलमधील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
  • परंतु, त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : Pakistan Army Sale : पाकिस्तान दिवाळखोरीच्या खाईत; असीम मुनीर यांनी सैन्य काढलं विक्रीला? आरोप काय?

बैठकीत नेमके काय घडले?

इस्तंबूलमध्ये झालेल्या बैठकीत तालिबान सरकारमधील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला चांगलाच दम भरल्याची माहिती आहे. पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करून अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेवर कोणतीही कारवाई करण्याचे लेखी आश्वासन अफगाणिस्तानने दिलेले नाही. दुसरीकडे, तालिबानी अधिकाऱ्यांनी केलेले आरोप पाकिस्तानने फेटाळून लावले आहेत. इतकेच नव्हे तर दहशतवादी संघटनेचा बंदोबस्त न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांनी अफगाणिस्तानला दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील शांतता बैठक फिसकटली असून त्यांच्यात पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

तालिबानचा इशारा काय?

तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी शांतता चर्चेच्या अपयशासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. “बैठकीमध्ये पाकिस्तानने अवाजवी मागण्या केल्या होत्या. त्यामुळेच चर्चेच्या माध्यमातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. तूर्तास शांतता बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आम्हाला प्रदेशात शांतता हवी असून, पाकिस्तानने माघार घ्यायला हवी. त्यांनी आपल्या कुरापती सुरूच ठेवल्यास युद्धात उतरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही”, असे त्यांनी कंधारमधील पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “या बैठकीतून दहशतवादाच्या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा होती; परंतु तालिबानने आम्हाला लेखी हमी दिली नाही. अफगाणिस्तानने आपल्या भूमीचा वापर पाकिस्तानवरील हल्ल्यांसाठी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जर चिथावणी दिल्यास पाकिस्तानकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जाईल.”

या तणावाचा नेमका काय परिणाम?

  • अफगाणिस्तानने पाकिस्तानला लागून असलेल्या सर्व सीमा १२ ऑक्टोबरपासून बंद ठेवलेल्या आहेत.
  • केवळ सीमेवर अडकलेल्या अफगाण नागरिकांना मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • या निर्बंधांमुळे अफगाणिस्तानमधला दक्षिण आशिया आणि त्या पलीकडील प्रदेशाशी जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग विस्कळित झाला आहे.
  • त्यातच शेकडो मालवाहू वाहने सीमेवरच अडकून पडल्याने दोन्ही देशांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे.
  • पाकिस्तानकडून बेकायदा स्थलांतरितांना लक्ष्य करणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
  • या मोहिमेंतर्गत अफगाणिस्तानमधील निर्वासितांना त्यांच्या मायदेशी पाठवले जात आहे.
  • पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, २०२३ पासून १० लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : Kidney Damage Symptoms : जगभरातील ८० कोटी लोकांना ‘या’ आजाराची लागण; अनेकांचा मृत्यू,’ही’ लक्षणे दिसताच सावध व्हा!

चर्चा फिसकटली; आता पुढे काय?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील निर्माण झालेला तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही देशांमधील वाद मिटवण्यासाठी तुर्की आणि कतारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत तीन वेगवेगळ्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अफगाणिस्तानने तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा बंदोबस्त करावा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. तर, पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करू नये, तसेच सीमावर्ती भागातील आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे तालिबान सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांत पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.