सगळ्या जगाचे लक्ष मध्य पूर्वेतील युद्धाकडे लागले असतानाच भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्षाचा भडका उडाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानमधील एका रुग्णालयावर भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा भ्याड हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानला धडकी भरवणारा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण-मध्य आशियातील या दोन मुस्लीम राष्ट्रांत संघर्षाचा भडका नेमका कशामुळे उडाला? त्याविषयीचा हा आढावा…
अफगाणिस्तानवरचा सर्वांत मोठा हल्ला
तालिबान सरकारचे प्रवक्ते हदुल्लाह फितरत यांनी काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याबाबतची माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात २,००० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने उपचारासाठी दाखल झालेल्या ४०० रुग्णांचा समावेश असल्याचा दावा फितरत यांनी केला. अफगाणिस्तानच्या इतिहासातील हा सर्वांत प्राणघातक हल्ला आहे. २०२१ मध्ये अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असताना काबूल विमानतळावर भीषण बॉम्बस्फोट झाला होता. त्या घटनेत किमान १६९ अफगाण नागरिक आणि १३ अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानकडून भीषण हवाई हल्ला
काबूलमधील रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक ओमिद स्तानिकझाई यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला या भीषण हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. हल्ल्यापूर्वी काही लढाऊ विमाने आकाशात घिरट्या घालत होती. ही बाब लक्षात येताच तालिबानी सैन्याने त्या विमानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विमानांमधून थेट रुग्णालयावर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. या घटनेनंतर भीषण स्फोट झाला आणि रुग्णालयाला मोठी आग लागली. या हल्ल्यात प्राण गमावलेले सर्व जण सामान्य नागरिक होते, असे ओमिद स्तानिकझाई म्हणाले. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमान यांनीही या हल्ल्याबाबत एएफपी वृत्तसंस्थेला माहिती दिली. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४०० निष्पाप रुग्णांचा झाला; तर २५० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही शराफत जमान यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा : वाहनांवर लाल-निळे दिवे लावण्याचे नियम काय? मुंबईच्या महापौर वादात का सापडल्या?
अफगाण क्रिकेटपटूंचा पाकिस्तानवर संताप
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद नबी याने समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करीत पाकिस्तान सरकारचा निषेध केला आहे. सोमवारी रात्री काबूलमधील एका रुग्णालयात आशेचा दिवा विझला. उपचारासाठी आलेल्या तरुणांना बॉम्बहल्ल्यात ठार करण्यात आले. रमजानच्या २८ व्या रात्री पाकिस्तानी लष्करी राजवटीने उपचारासाठी आलेल्या तरुणांची हत्या केली, असे नबी याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान यानेदेखील या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला. युद्धात नागरी वस्त्या, शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयांना लक्ष्य करणे हा गुन्हा आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, असा संताप राशिदने आपल्या पोस्टमधून व्यक्त केला.
पाकिस्तानने हल्ल्यासंदर्भात कोणते दावे केले?
काबूलमधील रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मंगळवारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक निवेदन जारी केले. पाकिस्तानी लष्कराने केवळ काबूल आणि पूर्व नंगरहार प्रांतातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले केले. तालिबान राजवट ज्या दहशतवादी गटांना पाठिंबा देत आहे, त्यांच्या तळांनाच आम्ही लक्ष्य केले. हवाई हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या जीवाला कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे रुग्णालयावर हल्ला झाल्याचा तालिबान सरकारचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असे तरार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.
पाकिस्तानला धडकी भरवणारा इशारा
काबूलमधील रुग्णालयावर झालेल्या या हल्ल्यानंतर तालिबान सरकारने प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांवर तीव्र हल्ला केला. यावेळी पाकिस्तानची एक लष्करी चौकी ताब्यात घेतल्याचा आणि अनेक सैनिकांना ठार केल्याचा दावा अफगाणी सैन्याने केला. यादरम्यान तालिबान सरकारने पाकिस्तानला धडकी भरवणारा इशारा दिला आहे. पाकिस्तानबरोबर संवाद आणि राजनैतिक चर्चेची वेळ आता संपली आहे. आता आम्हाला फक्त निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. पाकिस्तानला या भ्याड हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमचे सैन्य त्यांच्यावर सर्वांत भीषण हल्ला करण्यास सज्ज आहे, असे तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले. त्यांच्या या इशाऱ्यामुळे दोन्ही देशांत लवकरच युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : इराणच्या डान्सिंग मिसाईलची अमेरिका-इस्रायलला धडकी? सेज्जिल क्षेपणास्त्र नेमके किती घातक?
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये संघर्ष का पेटला?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्धाचा भडका उडाला होता. या वादादरम्यान दोन्ही देशांनी आपापल्या सीमा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आठ दिवस चाललेल्या या रक्तरंजित संघर्षाचा तमाशा सगळ्या जगाने पाहिला. सरतेशेवटी कतार व तुर्कीने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूंनी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यात आला. यादरम्यान दोहा येथील एका बैठकीत त्यांच्यात वाटाघाटीचा प्रयत्नही झाला; पण बोलणी मध्येच फिसकटल्यामुळे दोन्ही देशांतील सीमावर्ती भागातला तणाव कायम राहिला. पाकिस्तानमध्ये दहशत माजवणाऱ्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेला तालिबान सरकार सुरक्षापूर्वक आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यांचा हा आरोप अफगाणिस्तानने सातत्याने फेटाळून लावला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे या दोन्ही देशांत मध्यस्थी करणारे कुणीही नाही. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
