Pakistan Afghanistan War : भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात अंदाधूंद गोळीबार केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या तब्बल १५ चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला. तालिबान सरकारच्या या कारवाईमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने थेट युद्धाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही या दोन मुस्लीम राष्ट्रांत युद्धाचा भडका उडाला होता. त्यावेळी झालेल्या रक्तरंजित संघर्षाचा सगळ्या जगाने तमाशा पाहिला. यापार्श्वभूमीवर पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्ध का भडकले? त्याविषयीचा हा आढावा…
गेल्या रविवारी पाकिस्तानी लष्कराने सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तालिबान सरकारने म्हटले होते. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरच्या काही तासांतच अफगाणी सैन्याने पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला आणि सीमावर्ती भागातील तब्बल १५ लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला. तालिबान सरकारच्या या कारवाईमुळे चवळताळून उठलेल्या पाकिस्तानने आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह काही महत्वाच्या शहरांमध्ये बॉम्बवर्षाव केला.
पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी तालिबान सरकारला अत्यंत कडक शब्दात इशारा दिला. आमच्या संयमाची सीमा संपली आहे. आता आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात युद्धाची अधिकृत घोषणा झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे- पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनीही तालिबान सरकारला इशारा दिला आहे. पाकिस्तान शांतता बिघडवणाऱ्या आणि प्रदेशाच्या एकतेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टींशी तडजोड करणार नाही. जे लोक आमच्या शांततेला कमकुवतपणा समजतात त्यांना आमचे सैन्य चोख प्रत्युत्तर देईल.
दोन्ही देशांत युद्धाची ठिगणी कशी पडली?
पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षाची सुरुवात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झाली. त्या दिवशी तालिबान सैन्याने ‘ड्युरंड लाईन’ओलांडून पाकिस्तानवर मोठा हल्ला चढवला. गेल्या रविवारी (२२ फेब्रुवारी) पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात १८ अफगाणी नागरिक (ज्यात महिला व मुलांचा समावेश होता) मृत्युमुखी पडले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे तालिबानने स्पष्ट केले. पाकिस्तानी लष्कराच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणाला उत्तर म्हणून आम्ही सीमेवरील त्यांच्या लष्करी तळांवर मोठा हल्ला केला आहे, अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दिली.
५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने असा दावा केला की- अफगाणी सैनिकांचा पाकिस्तानबरोबरचा संघर्ष हा सहा प्रांतामध्ये सुमारे चार तास चालला. या कारवाईत पाकिस्तानच्या १९ लष्करी चौक्या आणि दोन मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यादरम्यान ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले असून काहींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. या लढाईत आठ अफगाणी सैनिक शहीद झाले असून ११ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे- पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी तालिबान सरकारचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. त्यांच्या मते, केवळ दोनच पाकिस्तानी सैनिक शहीद झाले असून ३६ अफगाणी बंडखोरांना ठार करण्यात आले आहे.
पाकिस्तानची ‘ऑपरेशन गजब लिल हक’ मोहीम
तालिबान सरकारने केलेल्या धाडसी हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘ऑपरेशन गजब लिल हक’ या लष्करी मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल व कंदहार यांसारख्या महत्वाच्या शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये काबूलमधील अफगाणी सैन्याची दोन ब्रिगेड मुख्यालये उद्ध्वस्त झाली असून कंधारमधील एक कॉर्प्स मुख्यालय आणि एक ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय कंधारमधील एक दारूगोळा डेपो आणि लॉजिस्टिक्स तळही नष्ट झाला असून पक्तियामधील एक कॉर्प्स मुख्यालयही उडवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या सरकारी वृत्त संस्थांनी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईत १३३ तालिबानी सैनिक मारले गेले असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. भ्याड शत्रूने रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला होता. त्यांच्या या चुकीचे गंभीर परिणाम तालिबानला भोगावेच लागतील, असा इशारा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी दिला.
तालिबान सरकारचा पाकिस्तानला इशारा
सध्या अफगाणिस्तानमधील काबुल आणि कंदहारमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर शहरात गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. दोन्ही देश एकमेकांचे प्रचंड नुकसान केल्याचा दावा करत असले तरीही मृतांच्या नेमक्या आकड्यांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानी सैन्याच्या या कारवाईला डरपोक असे संबोधले आहे. पाकिस्तानच्या डरपोक सैन्याने काबुल, कंधार आणि पक्तियामधील काही भागांवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे अफगाणिस्ताच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तालिबान सरकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या देशातील नागरिकांचे संरक्षण करेन. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

