Asim Munir United States Visit : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे अमेरिका दौऱ्यावर असताना मुनीर यांना तीव्र टीकेचा व निदर्शनाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी समुदायाने त्यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केला आहे. निदर्शन करणाऱ्यांमध्ये विशेषत: इम्रान खान यांचे समर्थक आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगवरून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना लक्ष्य करण्यात आलं होतं. दरम्यान, अमेरिकेतील पाकिस्तानी समुदाय असीम मुनीर यांना लक्ष्य का करीत आहे? त्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊ…
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे सध्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील लष्करी व धोरणात्मक संबंध अधिक बळकट करणे असा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मुनीर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी पाकिस्तानी समुदायाने बॅनरबाजी करीत त्यांचा हुकूमशहा असा उल्लेख केला आहे. मोठमोठ्या डिजिटल बॅनर्सवर मुनीर यांच्यावर टीका करणारे संदेश झळकत आहेत. या निदर्शनामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या देशाचीही पुरती नाचक्की झाली आहे.
एका व्हिडीओत काही निदर्शक मुनीर यांच्यावर कठोर शब्दात टीका करताना दिसून येत आहेत. अमेरिकेत राहणारे बहुतांश पाकिस्तानी नागरिक, जे इम्रान खान यांचे समर्थक आहेत, त्यांच्याकडून ही निदर्शने केली जात आहेत. असीम मुनीर यांनी पाकिस्तानमधील लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप केला असून, राजकीय विरोधकांवर अन्याय केल्याचं या निदर्शकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने या निदर्शनापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. पक्षाध्यक्ष प्रवक्त्या गोहर अली खान यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांविरोधात आंदोलन करण्याचे कोणतेही आदेश पीटीआयने दिलेले नाहीत.
आणखी वाचा : Israel-Iran conflict: भारत आणि इस्रायल टाकणार होते पाकिस्तानवर बॉम्ब; पण, इंदिरा गांधी यांनी माघार का घेतली?
टाइम्स स्क्वेअरवरील डिजिटल होर्डिंगवरून वाद
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरील डिजिटल होर्डिंगवरूनही पाकिस्तानच्या राष्ट्रपतींवर तसेच लष्करप्रमुखांवर टीका करण्यात आली होती. असीम मुनीर हे फसवे आणि खोटारडे असल्याचा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, या बॅनर्सवरून पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही लक्ष्य करण्यात आलं होतं, तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अन्यायग्रस्त आणि बळी ठरलेले नेते म्हणून दाखवण्यात आलं होतं. टाइम्स स्क्वेअरवरील हे डिजिटल होर्डिंग पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पार्टीच्या परदेशातील समर्थकांनी लावले होते. या निदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

टाइम्स स्क्वेअरवरील फोटोंमध्ये नेमकं काय होतं?
- टाइम्स स्क्वेअरवरील डिजिटल होर्डिंगवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर थेट आणि खुले आरोप करण्यात आले होते.
- असीम मुनीर यांच्यावर फ्रॉड मार्शल, खोटारडा, अपयशी आणि स्वार्थासाठी काहीही करणारी व्यक्ती अशी टीका करण्यात आली होती.
- पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना राजकीय फसवणुकीचे साथीदार म्हणून दाखवण्यात आलं होतं.
- या निदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली होती.

मुनीर यांच्या ‘फील्ड मार्शल’ बढतीवरून वाद
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकून युद्धविरामाची विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल या पदावर बढती दिली. विशेष बाब म्हणजे, १९५९ नंतर पाकिस्तानी लष्करप्रमुखांना मिळालेली ही पहिलीच पदोन्नती होती. पाकिस्तान सरकारने मुनीर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ही बढती दिल्याचे सांगितले. मात्र, टीकाकारांनी हे राजकीय हेतूने उचलेले पाऊल असल्याचा आरोप केला. त्यांचा दावा होता की, ह्या बढतीमुळे लष्कराच्या अपयशांकडे लक्ष न जाता त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘Geo News’च्या एका अहवालात मुनीर यांना देशाच्या सुरक्षेची हमी दिल्याबद्दल ही बढती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यात त्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचेही कौतुक करण्यात आले. मात्र, परदेशस्थित पाकिस्तानी लोकांनी या दाव्यांची विश्वासार्हता प्रश्नार्थक ठरवली, विशेषतः भारताच्या कारवाईत पाकिस्तामध्ये झालेल्या नुकसानीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
असीम मुनीर यांचं पाकिस्तानी समुदायाला संबोधन
अमेरिकेतील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, असीम मुनीर यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाशी संवाद साधला आणि त्यांचं खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे राजदूत म्हणून कौतुक केलं. त्यांनी परदेशी पाकिस्तानी नागरिकांच्या आर्थिक पाठबळाबद्दल, गुंतवणुकीबद्दल आणि विविध क्षेत्रांतल्या यशाबद्दल आभार मानले. “असीम मुनीर यांच्या स्वागतासाठी अमेरिकेतील अनेक पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले,” असं एका वृत्तवाहिनीने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेव्यतिरिक्त काही मोठ्या डिजिटल होर्डिंगवर असीम मुनीर यांचं स्वागत करणारे संदेशही झळकल्याचं पाहायला मिळालं. हे संदेश पाकिस्तानी-अमेरिकन समुदायातर्फे दिले गेले असं सांगण्यात आलं. मात्र, सोशल मीडियावरून काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या या डिजिटल बॅनर्सवरील खर्च कोणी केला? मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की हे पैसे कुणाचे होते? आम्ही भरत असलेल्या कराचे पैसे तर यात वापरले गेले नाहीत ना? असा प्रश्न एका पाकिस्तानी व्यक्तीने ‘एक्स’वर विचारला.
हेही वाचा : Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनी खरंच बंद होणार? इराणच्या धमकीमुळे जग का घाबरलंय? काय आहेत कारणे?
अमेरिकन लष्कराच्या परेडमध्ये असीम मुनीर यांना निमंत्रण?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकन लष्कराच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परेडसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, व्हाइट हाऊसने या चर्चांचं खंडन केलं आहे. “कोणत्याही परदेशी लष्करी अधिकाऱ्यांना अमेरिकन लष्कराच्या परेडसाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही, ही अफवा चुकीची आहे,” असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
मुनीर यांच्या दौऱ्यावर इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम?
असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यावर इस्रायल-इराण संघर्षाचाही परिणाम दिसून येत आहे. पाकिस्तानने इराणला नैतिक आणि राजनैतिक समर्थन दिल्याचं जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेबरोबर संबंध वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न कठीण ठरू शकतो. अमेरिकेतील विश्लेषक मायकेल कुगेलमन यांनी पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राला सांगितलं की, अमेरिका सध्या पाकिस्तानला मदत करण्यासाठी तयार आहे. परंतु, त्यांनी इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तान इराणशीही संबंध सुधारण्याचे प्रयत्न करीत असल्यामुळे असीम मुनीर यांचा दौरा अमेरिकन नागरिकांना काहीसा अस्वस्थ करणारा ठरू शकतो.