India vs Pakistan Jammu Kashmir Conflict : दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकण्याची एकही संधी सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांनी भारताविरोधात अधिकच आक्रमक भाषा वापरली आहे. गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिगणी पडली होती. त्यावेळी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर असीम मुनीर व शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. त्याविषयीचा हा आढावा…
शाहबाज शरीफ काश्मीरबाबत काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी) काश्मीर एकता दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेत भाषण केले. यावेळी काश्मिरी जनतेला पाकिस्तान सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. इतक्यावरच न थांबता भारताकडील काश्मीरचा प्रदेश हा पाकिस्तानचा भाग होणार असल्याचे चिथावणीखोर विधान त्यांनी केले. काश्मिरी जनतेच्या इच्छेचा सन्मान करून आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी करूनच जम्मू-काश्मीरच्या वादाचा तोडगा काढला जाऊ शकतो. पाकिस्तानी जनता आणि नेतृत्वाच्या वतीने आम्ही काश्मीरमधील आमच्या भावंडांशी एकजूट व्यक्त करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताबरोबरच्या संघर्षाचा केला उल्लेख
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताबरोबर झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना शरीफ यांनी दावा केला की- जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पूर्ण ताकदीने समोर आला आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांना हाताशी धरून पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. याबाबत पाकिस्तान सरकार सतर्क असून आम्हाला फक्त शांतता हवी आहे. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळेपर्यंत इस्लामाबाद त्यांना पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिन्ना यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्याची नस असे विधान केले होते. या विधानाचा पुनरुच्चार करून शरीफ यांनी सांगितले की- काश्मीर अजूनही पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असूनही बिटकॉइन का कोसळले? पडझडीमागची कारणे काय?
असीम मुनीर यांचीही चिथावणीखोर भाषा
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनीही पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सीमेवरील तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुनीर यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये उघडपणे जिहादची भाषा वापरली आणि काश्मीर मुक्तीची शपथ घेतली. पाकिस्तानी जनतेच्या इच्छेनुसार, काश्मीरमध्ये लवकरच स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे विधान मुनीर यांनी केल्याचे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात नमूद आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार जम्मू-काश्मीरच्या वादावर तोडगा निघेपर्यंत पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय मंचावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहणार, असेही ते म्हणाले. मुनीर यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराचे कौतुक केले, असे पाकिस्तानच्या जनसंपर्क विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादलाही भेट दिल्याचे निवेदनात नमूद आहे.
आक्रमक भाषा शांततेसाठी धोकादायक?
जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून भारताविरोधात वापरली जाणारी चिथावणीखोर भाषा ही संपूर्ण प्रदेशातील शांततेसाठी धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर कटकारस्थानांचे आरोप केल्याने दोन्ही देशांमधील वाद आणखीनच टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी नेत्यांच्या चिथावणीखोर विधानांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडत असून सीमावर्ती भागात हिंसाचार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण
असीम मुनीर व शाहबाज शरीफ यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे सध्या पाकव्याप्त काश्मीर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून सातत्याने वापरल्या जाणाऱ्या काश्मीर मुक्तीच्या भाषेमुळे स्थानिक पर्यटन, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचा मोठा फटका सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा काश्मीरमधील हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहे. यादरम्यान असीम मुनीर व शाहबाज शरीफ यांच्या चिथावणीखोर विधानाला भारताकडून कसे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : अमेरिकेतून ३८०० भारतीयांची हकालपट्टी; कोणकोणत्या देशांनी केलं भारतीयांना हद्दपार?
काश्मीरबाबत भारताची भूमिका काय?
जम्मू-काश्मीरवर आपलाच हक्क असल्याचा दावा पाकिस्तानकडून सातत्याने केला जातो. मात्र, भारताने त्यांचा हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील अशी भूमिका भारताने मांडली आहे. जानेवारीच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर या मुद्द्यावर भारताने पाकिस्तानचा तीव्र शब्दांत समाचार घेतला होता. भारताला आणि भारतीय जनतेला हानी पोहोचवणे हाच पाकिस्तानचा एकमेव अजेंडा आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी केली होती. सुरक्षा परिषदेत बोलताना त्यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींच्या वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांना खोटारडे आणि स्वार्थी ठरवले होते. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला फटकारताना भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, असेही हरीश म्हणाले होते.

