आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभाग नोंदवणार असला, तरी ते भारताविरुद्ध खेळणार नाहीत, असे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांमध्ये या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना हेच मुख्य आकर्षण असते. आता पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयामुळे ‘आयसीसी’ आणि अन्य भागीदारांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे त्यांचा स्पर्धा सहभागावर याचा काय परिणाम होईल, ‘आयसीसी’कडून पाकिस्तान क्रिकेट मंडळावर (पीसीबी) कोणती कारवाई केली जाऊ शकते याचा आढावा.

पाकिस्तानची भूमिका काय?

‘आयसीसी’ने या वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी अधिकृतपणे अटी जाहीर केल्या नसल्या तरी, २०२४ मधील खेळण्याची अटी २०२६ पर्यंतही राहण्याची शक्यता आहे. जर एखाद्या संघाला खेळ सोडून द्यायचा असेल तर त्यात काही तरतुदी आहेत. ‘आयसीसी’ कलम १६.१०.९ अंतर्गत, एक संघ सामना खेळण्यास तयार असल्यास आणि दुसऱ्या संघाने खेळण्यास नकार दिल्यास, सामनाधिकाऱ्यांना खेळण्याच्या १६.२ नियामनुसार किंवा सहभागी संघांनी स्वाक्षरी केलेल्या संबंधित कार्यक्रम करारांच्या तरतुदींनुसार, सामना खेळण्यास तयार असलेल्या संघास गुण बहाल करण्यात येतो. तसेच, सामना न खेळणाऱ्या संघाची निव्वळ धावगतीची गणना करताना या लढतीचा विचार करण्यात येत नाही.

‘आयसीसी’ने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) खेळण्यास भाग पाडण्यासाठी काहीही करू शकत नाहीत. ते त्यांना निर्बंधांचा इशारा देऊ शकतात आणि मोठ्या दंडाची आकारणी करू शकतात. परंतु, त्यांनी यापूर्वी कोणतेही दंड न घेता आंशिक बहिष्कारांना परवानगी दिली आहे, असा युक्तिवाद ‘पीसीबी’कडून केला जाऊ शकतो. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोघांनीही विश्वचषक सामन्यांसाठी श्रीलंकेला जाण्यास नकार दिला. २००३ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंडने अनुक्रमे झिम्बाब्वे आणि केनियाला जाण्याचे टाळले होते.

‘आयसीसी’चे म्हणणे काय?

पाकिस्तानच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपली भूमिका मांडली आहे. ‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) या निर्णयानंतर आपल्या देशातील क्रिकेटवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल. या निर्णयामुळे जागतिक क्रिकेटवर याचा परिणाम पहायला मिळू शकतो. पाकिस्तान स्वत: ‘आयसीसी’चा सदस्य असून त्यांचा लाभार्थीही आहे,’’ असे ‘आयसीसी’कडून सांगण्यात आले. ‘आयसीसी’ पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेबाबत अधिक माहिती घेत आहेत. त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या राष्ट्रीय संघाला काही सामन्यांमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. याबाबत ‘आयसीसी’ पाकिस्तान मंडळाशी अधिकृत संवादाच्या प्रतीक्षेत आहे.

‘आयसीसी’ राष्ट्रीय दृष्टीने सरकारने घेतलेल्या भूमिकेचा सन्मान करते. मात्र, हा निर्णय पाकिस्तानचे लाखो चाहत्यांसह जगभरातील प्रशंसकांच्या दृष्टीने हिताचा नाही. सध्या ‘आयसीसी’ प्राथमिकता ही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याकडे आहे. ‘पीसीबी’सह सर्व सदस्यांची देखील ही जबाबदारी असली पाहिजे. ‘पीसीबी’ सर्व भागधारकांचा विचार करून यामधून काही मार्ग काढेल अशी ‘आयसीसी’ला अपेक्षा आहे,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

व्यावसायिक नुकसान किती?

या स्पर्धांच्या माध्यम हक्कांबाबत जिओहॉटस्टार आणि ‘आयसीसी’ यांच्यात करार झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये नेहमीच महत्त्वाचा असतो. इतर सामने लक्ष वेधून घेऊ शकतात, परंतु हा एकमेव सामना आहे जो ‘आयसीसी’च्या प्रक्षेपणकर्त्यांना आठ आकडी उत्पन्न मिळवू शकतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास आशिया चषक स्पर्धेत १० सेकंदांच्या जाहिराती १२ लाखांपेक्षा जास्त किमतीत विकल्या गेल्या. विश्वचषकासाठी या सामन्यातकरीता दुप्पट रक्कम मिळू शकते. भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये २००८च्या दहशतवादी हल्ल्यानंतर द्विपक्षीय मालिका होत नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ ‘आयसीसी’ किंवा आशिया चषक स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून चाहत्यांना दोन्ही देशांचा खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळते. त्याचा फायदा प्रक्षेपणकर्तेदेखील घेतात. हा सामना न झाल्यास ‘आयसीसी’ला प्रक्षेपणकर्त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. तसेच, या सामन्यातून मिळणारी रक्कम ‘आयसीसी’ सहाय्यक सदस्य देशांच्या क्रिकेट वाढीसाठी खर्ची करीत असतो. कारण असे देश क्रिकेटसाठी पूर्णपणे ‘आयसीसी’च्या निधीवर अवलंबून असतात.

पाकिस्तानच्या निर्णयामागचे कारण काय?

बांगलादेशला ट्वेन्टी-२० विश्वचषकातून बाहेर केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पीसीबी’नेही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. ‘आमचा संघ या स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय आता सरकारच घेईल,’ असे ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. बांगलादेशला बाहेर केल्यानंतर पाकिस्तानने ‘आयसीसी’ भारतासाठी वेगळे नियम करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने संघाने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार न घालता केवळ भारतीय संघाविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान ‘अ’ गटात भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिकेसह सहभागी आहे.

भारताला पूर्ण गुण?

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले असले, तरी भारतीय संघाला सामन्याचे गुण मिळण्यासाठी ‘आयसीसी’च्या नियमानुसार जावे लागले. ‘आयसीसी’च्या नियमानुसार पाकिस्तानने खेळण्यास बहिष्कार नोंदविल्याने भारताला थेट पुढे चाल देता येत नाही. सामना रद्द करण्यासाठी एकाची संघाची मैदानावर उपस्थिती महत्त्वाची असते. त्यामुळे सामन्याच्या नियमानुसार भारतीय कर्णधाराला नाणेफेकीसाठी ठरलेल्या वेळेत मैदानावर उपस्थित राहावे लागेल. पाकिस्तानचा कर्णधार यावेळी उपस्थित न राहिल्यास भारताला पुढे चाल मिळेल. यामुळे भारताला दोन गुण बहाल केले जातील. या सामन्याचे सर्वाधिकार हे सामन्याधिकाऱ्यांकडे असतील.