Why are Covid Restrictions Back in Pakistan : सणासुदीचा काळ संपताच पाकिस्तान सरकारने देशात कठोर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तानावर मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तेथील सरकारने काटकसरीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद जिल्हा प्रशासनाने नव्या व्यावसायिक वेळा जाहीर केल्या असून १ जूनपासून शहरात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.

दुकाने रात्री ८ वाजताच बंद होणार

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या बाजारपेठा, दुकाने आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजेनंतर बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम आशियातील युद्धाजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाल्याने पाकिस्तान सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये हे नियम लागू करण्यात आले होते. मात्र, ईदच्या खरेदी हंगामादरम्यान या निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्यात आली होती. यादरम्यान सणासुदीचे दिवस संपताच पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा करोना काळातील काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील बहुतांश भागात रात्री आठपासून प्रचंड शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून सूट

इस्लामाबाद जिल्हा प्रशासनाने समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टद्वारे नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. हे नियम संपूर्ण आठवडाभर लागू राहतील, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, काही अत्यावश्यक सेवांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये औषधांची दुकाने, वैद्यकीय सुविधा केंद्रे, पेट्रोल पंप, क्रीडा संकुले, कॉल सेंटर्स आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सेवा देणाऱ्या आयटी कंपन्यांचा समावेश आहे. तसेच, खासगी जागांवर आयोजित करण्यात येणारे कार्यक्रमही या नव्या नियमांच्या कक्षेत येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऊर्जा बचतीसाठी लागू करण्यात आलेले हे निर्बंध व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यक्रमांवरही लागू राहणार आहेत. रात्री ८ वाजेनंतर वाहनांना पेट्रोल-डिझेलही मिळत नसल्याने इस्लामाबादमधील रस्ते ओस पडताना दिसून येत आहे.

करोना काळातील निर्बंध कशासाठी?

पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काही आठवड्यांपासून व्यावसायिक आस्थापनांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत. आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवणे आणि ऊर्जा बचत करणे यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न तेथील केंद्र आणि राज्य सरकारांकडून केला जात आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा ताजा आदेश काढण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, विजेचा वापर कमी करणे आणि जास्त मागणीच्या वेळेत वीज वितरण कंपन्यांवरील ताण कमी करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. दिवसाच्या उजेडातच व्यावसायिक व्यवहार उरकल्यास विजेचा वापर कमी होईल आणि रात्रीच्या वेळी महागड्या इंधनापासून तयार होणाऱ्या विजेची बचत केली जाईल, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे.

निर्बंध लागू करण्यामागील प्रमुख कारणे

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जगातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा होर्मुझचा जलमार्ग अद्यापही बंदच आहे. त्यामुळे पाकिस्तानात इंधनासह घरगुती वापराचा गॅस आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तान इंधनाची मोठ्या प्रमाणात आयात परदेशातून करत असल्यामुळे त्यावरील खर्चही वाढला आहे. त्यामुळेच हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयाला देशातील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांमुळे आमचे मोठे नुकसान होईल, असा दावा या संघटनांकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानातील बहुतांश व्यावसायिक बाजारपेठा दुपारपासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत रात्रीपर्यंत चालतात. अशा परिस्थितीत दुकाने लवकर बंद करण्याच्या आदेशामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. आधीच देशाची अर्थव्यवस्था प्रचंड महागाई आणि ग्राहकांच्या घटलेल्या मागणीशी झगडत असताना, कामाचे तास कमी केल्याने विक्रीवर आणि नफ्यावर प्रचंड वाईट परिणाम होईल, असा दावा व्यावसायिक संघटनांनी केला आहे.

पाकिस्तानाने यापूर्वी कशी इंधनाची बचत?

पाकिस्तानने इंधन बचतीसाठी व्यावसायिक आस्थापने लवकर बंद करण्याचा निर्णय प्रथम मार्च महिन्यात घेतला होता. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त कारवाईनंतर हे निर्बंध लागू करण्यात आले होते. इंधनाच्या आयातीचा वाढता खर्च आणि वीज पुरवठ्यावर वाढत असलेला ताण लक्षात घेऊन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने ऊर्जा वापर कमी करण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या उपाययोजनांअंतर्गत अनेक कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय दूरसंचार आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याचा सल्ला देण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनाची परेडही केली रद्द

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानने रॉकेल (केरोसीन) आणि लाइट डिझेल ऑइलच्या किमतीतही वाढ केली होती. देशातील ऊर्जा संकट इतके गंभीर बनले होते की, २३ मार्च रोजी होणारी पाकिस्तानची प्रजासत्ताक दिनाची परेडही रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळे तेल पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यातून उद्भवलेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानच्या ऊर्जा गरजांचा मोठा भाग आयात इंधनावर अवलंबून असल्याने जागतिक घडामोडींचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील लोक या लॉकडाउनला कसे सामोरे जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.