पाकिस्तानामध्ये पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. यंदा मान्सून काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाकिस्तानातील एक तृतियांश भाग पाण्याखाली गेला आहे. गेल्या १०० वर्षांत पाकिस्तानातील ही सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. येत्या काळात हवामान बदलामुळे ही परिस्थती आणखी वाईट होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा सात ते आठ पटीने जास्त पाऊस झाला आहे. तापमानवाढीमुळे पाच दिवसांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तीव्रतेने या परिसरात पाऊस कोसळला, असा अहवाल ‘वर्ल्ड वेदर एट्रिब्युशन’(WWA) या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

हवामान बदलांमुळे सिंधू नदीच्या क्षेत्रामध्ये मान्सूनच्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील पावसाचे निरीक्षण करण्यासाठी ‘डब्लूडब्लूए’ या संस्थेने ३१ संगणक मोड्युल्सचा वापर केला आहे. या संस्थेने मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तान आणि भारतात आलेल्या उष्णतेच्या लाटेचादेखील अभ्यास केला आहे. या काळात दोन्ही देशातील काही भागांमध्ये तापमान ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हवामान बदलांमुळे उष्णतेच्या लाटेची शक्यता ३० टक्क्यांनी वाढल्याचे या संस्थेने म्हटले आहे. “उष्णतेची लाट येण्यामागे मुसळधार पावसापेक्षा हवामान बदलाची भूमिका मोठी आहे”, असे लंडनच्या इम्पेरिएल महाविद्यालयातील हवामान शास्त्रज्ञ फ्रेड्रिक ओत्तो यांनी म्हटले आहे.

विश्लेषण : पाणी वापरासाठीचे ‘जलदर’ कसे ठरवले जातात?

पाकिस्तानातील पुराचे नेमके कारण काय?

जागतिक हवामानाचा समुद्रातील तापमानावर परिणाम होत आहे. हिंद महासागरातील नकारात्मक द्विध्रुवांमुळे पूर्व हिंद महासागरामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मान्सूनचीही तीव्रता वाढत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. २०२१ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जागतिक तापमानवाढीमुळे भारतीय उपखंडातील मान्सून अधिक तीव्र आणि लहरी झाला आहे. २०१० पासून पाकिस्तानमध्ये वारंवार पूर आला आहे. काबुल नदीवरील धरण नष्ट करणे, हेदेखील पुराचे एक कारण असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तानात धरणांसारख्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे पुराने रौद्र रुप धारण केल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्ध भडकणार? १०० वर्षांपासून सुरू असलेला वाद काय आहे?

भीषण पुरानंतरचा पाकिस्तान…

पाकिस्तानातील पुरामुळे आत्तापर्यत १४०० जणांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे लाखो लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. पुराच्या पाण्यामुळे घरे, रस्ते आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. पाकिस्तानात पुरामुळे ३० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे पाकिस्तानामधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पुरामुळे डेंग्यू आणि कॉलरासारखे आजार पसरण्याची भीती बळावली आहे.