Pakistan ISI Instagram Recruitment Shehzad Bhatti: सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनचा वापर करून भारतातील तरुण पिढीला दहशतवादाच्या गर्तेत ढकलण्याची एक नवी आणि धोकादायक ‘मोडस ऑपरेंडी’ समोर आली आहे. पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड शहजाद भट्टी, अबिद जट्ट आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) यांनी संयुक्तपणे रचलेल्या या जाळ्यात महाराष्ट्रातील भिवंडी आणि मुंब्रासह उत्तर प्रदेश, पंजाब व दिल्लीतील अनेक तरुण अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेरगिरीच्या जाळ्यात

पैशांची गरज, व्यसनाधीनता, कौटुंबिक समस्या आणि व्यवस्थेबद्दलचा असंतोष… भारतात बहुसंख्येने तरुण वर्ग असंतुष्ट असल्याचे पाकिस्तानस्थित कुख्यात गुंडांना लक्षात आले आणि सुरू झाली भारतविरोधी दहशतवादी कारवाया करण्यासाठीची आयएसआयसाठीची भरती प्रक्रिया. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या डझनभर तरुणांचा शोध घेतल्यानंतर हे धक्कादायक वास्तव उघड झाले. पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदार आयएसआयच्या सांगण्यावरून हे नेटवर्क चालवत असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा आरोप आहे.

पोलीस ठाण्याचा व्हिडिओ ते हल्ला

या नेटवर्कची कार्यपद्धतीही धक्कादायक आहे. इन्स्टाग्रामच्या कमेंट्समध्ये गरजू, कमी शिकलेले, व्यसनाधीन किंवा असंतुष्ट तरुण शोधायचे, त्यांच्याशी खासगी संदेशांद्वारे संपर्क साधायचा, सुरुवातीला १२ ते २५ हजार रुपये द्यायचे आणि नंतर छोट्या-छोट्या कामांपासून मोठ्या हिंसक कारवायांकडे त्यांना वळवायचे. यातील अनेकांची सुरुवात पोलीस ठाण्याचा व्हिडीओ काढण्यापासून झाली आणि पुढचा टप्पा होता थेट ग्रेनेड फेकण्यापर्यंत…

Pakistan ISI Instagram Recruitment Shehzad Bhatti Terror Network | India Security Agencies Expose Instagram Terror Network | पाकिस्तान आयएसआय इन्स्टाग्राम भरती शहजाद भट्टी नेटवर्क | महाराष्ट्र एटीएस इन्स्टाग्राम दहशतवादी नेटवर्क पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ताब्यात घेतलेले दहशतवादी रिक्रुट

भिवंडीतील तरुणाला सांगितले पोलिस ठाण्याचा व्हिडीओ काढायला…

उत्तर प्रदेशातील बाराबंकीचा २३ वर्षीय अश्रफ दानियाल हा भिवंडीत हातमागावर काम करत होता. जानेवारी २०२६ मध्ये इन्स्टाग्रामवर त्याची ओळख हमद मेमनशी झाली. मेमन हा शहजाद भट्टीचा साथीदार असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे. काही काळ संवाद झाल्यानंतर दानियालला दुसऱ्या मेसेजिंग ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. तिथे भारतातील अल्पसंख्याकांची परिस्थिती आणि ती बदलण्याची कथित गरज यावर चर्चा होत असे. त्यानंतर दानियालला पहिल्यांदा अगदी साधे वाटणारे काम देण्यात आले ते म्हणजे भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्याचा व्हिडीओ काढून पाठवणे. त्याने १७ सेकंदांचा व्हिडीओ पाठवल्यानंतर त्याला आणखी एक काम देण्यात आले.

भिवंडीतील दानियाल गोरखपूरमधून ताब्यात

पाकिस्तानी गुंड अबिद जट्टचा फोटो देऊन त्याच्या ५० प्रती काढून परिसरात लावण्यास सांगण्यात आले. त्याचा पुरावा म्हणून व्हिडीओही मागविण्यात आला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेश एटीएसने दानियालला गोरखपूरमधून ताब्यात घेतले. त्याच्या घरातून शस्त्र सापडल्याचा एटीएसचा दावा आहे. उत्तर प्रदेश आणि अन्य शहरांतील महत्त्वाच्या संस्था, पोलीस ठाणी आणि चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी त्याची कथित भरती करण्यात आली होती.

…प्रत्यक्ष हल्ल्यापर्यंत पोहोचले

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुदासपूर पोलीस ठाण्यावर झालेला ग्रेनेड हल्ला हा या नेटवर्कच्या कथित कारवायांचे गंभीर उदाहरण असल्याचे तपास अधिकारी सांगतात. या प्रकरणात १९ वर्षीय अमरजीत सिंह, करणजीत सिंह आणि २२ वर्षीय सतनाम सिंह यांना अटक झाली. पाकिस्तानस्थित गुंडांच्या माध्यमातून घडवून आणण्यात आलेल्या यशस्वी हल्ल्यांपैकी हा एक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
याच धर्तीवर पंजाबमधील गुरुदासपूर आणि अमृतसरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर यावर्षी तीन पोलिसांच्या झालेल्या गूढ हत्यांकांडांचाही शोध तपास यंत्रणा घेत आहेत. ती हत्याकांडेदेखील याच नेटवर्कशी संबंधित आहेत, असे अधिकाऱ्यांना वाटते.

ड्रोनद्वारे बंदूकांची पाठवणी

जुलैमध्ये राजस्थानातील २० हून अधिक शहरांमध्ये एटीएसने छापे टाकले. भट्टीशी कथित संबंध असलेल्या २८ तरुणांना ताब्यात घेण्यात आले. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांत ड्रोनच्या माध्यमातून सीमेपलीकडून बंदुका आणल्या जात आणि पंजाब-राजस्थानातील तरुणांना त्या इतरत्र हलविण्याचे काम दिले जात असे. भट्टीने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून त्याने या तरुणांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले असून, त्याला दोष देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या आहेत.

भट्टी आणि लॉरेन्स बिष्णोई

या कथित नेटवर्कची कार्यपद्धती भारतातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या सोशल मीडिया पद्धतीशीही मिळतीजुळती असल्याचे अधिकारी सांगतात. बिष्णोई ऑगस्ट २०२३ पासून अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात आहे. अलीकडेच अमेरिकन अधिकाऱ्यांनी शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर आरोप केले आहेत. भट्टी आणि बिष्णोई पूर्वी मित्र होते, मात्र भारत-पाकिस्तान संबंधांतील तणावामुळे त्यांच्यात मतभेद झाल्याचे दोघांनीही म्हटले आहे. भट्टीच्या तुलनेत बिष्णोई भारतातीलच तरुणांची अधिक भरती करतो आणि त्यांचा वापर खंडणीसारख्या गुन्ह्यांसाठी करून घेतो. अलीकडे देशभक्ती आणि धर्माचा वापर ही त्याची प्रमुख ओळख ठरल्याचे दिसते आहे.

कोणते तरुण या जाळ्यात अडकतात?

तपास अधिकाऱ्यांनी या तरुणांचा अभ्यास केला, त्यातून विशेष चिंताजनक निष्कर्ष आले आहे. यातील बहुसंख्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही. अनेक जण अस्थिर किंवा समस्याग्रस्त कुटुंबांतून आले आहेत. काहींना अमली पदार्थ किंवा दारूचे व्यसन आहे. अनेक जण डिलिव्हरी बॉय, दुकानातील कर्मचारी, कारखान्यातील कामगार अशा कमी पगाराच्या नोकऱ्या करतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक किंवा भावनिक मुद्द्यांचा वापर केला जात असला, तरी त्यांच्यासाठी सर्वांत मोठे आमिष हे पैसाच होते. कुर्ल्यातील २१ वर्षीय साजिद मेहबूब शेख हे त्याचे बोलके उदाहरण आहे. रेल्वे रुळालगतच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या साजिदने लहानपणी वडील आणि वयाच्या १५व्या वर्षी आई गमावली. तो कचरा गोळा करून उदरनिर्वाह करतो. २८ मे रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने देशभरातील आठ तरुणांना अटक केली. त्यात साजिदचाही समावेश होता.

बँक खात्यांत थेट पैसे जमा

भट्टीचे साथीदार रुन हनैन आणि यावर खान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलवर साजिदने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर यावरने त्याच्याशी संपर्क साधला. भारतामधील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर बराच संवाद झाल्यानंतर साजिदला २५ हजार रुपये देण्यात आले आणि दिल्लीतील सुरक्षा कर्मचारी तसेच सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचे कथित काम देण्यात आले. साजिदचे मामा इक्बाल शेख यांच्या म्हणण्यानुसार, अमली पदार्थांच्या व्यसनामुळे साजिदला घरातून बाहेर काढण्यात आले होते. साजिदसोबत अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय तौकीर शेखला याच नेटवर्ककडून २१ हजार रुपये मिळाल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. मुंब्रा येथे आई-वडिलांसोबत राहणारा तौकीर क्रेन ऑपरेटर आहे. त्याची काकू शेर बानो यांच्या म्हणण्यानुसार, तोही व्यसनाधीन होता. एका तरुणामार्फत ऑनलाइन संपर्क झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात २१ हजार रुपये जमा झाल्याचे त्याने तिला सांगितले होते.

‘व्यवस्थेविरोधातील राग’ही ठरतो आहे हत्यार

गोरखपूरचा २० वर्षीय कृष्णा मिश्रा याची कहाणी आणखी वेगळी आहे. गरिबीमुळे त्याला लहानपणापासूनच काम करावे लागले. एका नातेवाईकाने वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या जमिनीतील हिस्सा नाकारल्याने तो त्रस्त होता. पोलिसांनी मदत न केल्याचा त्याला राग होता. याच असंतोषाचा फायदा घेत त्याला ‘अन्यायाचा बदला’ घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यासाठी त्याला शस्त्र देण्यात येणार होते आणि हल्ल्याचा व्हिडीओ करून परदेशातील हँडलर्सना पाठवायचा होता. या प्रकरणात मिश्रा आणि त्याचा कथित साथीदार अश्रफ यांच्याकडून देशी बनावटीची ९ मिमी पिस्तूल, काडतुसे आणि .३१५ बोअरचे पिस्तूल जप्त केल्याचा एटीएसचा दावा आहे.

१७ तरुणांना अटक

उत्तर प्रदेश एटीएसच्या एका प्रकरणात १७ जणांना अटक झाली होती. त्यातील मोहम्मद उमर आणि फैजान यांना अबिद जट्टचे फोटो आणि त्याचे उदात्तीकरण करणारे संदेश असलेली पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यास सांगण्यात आले. पाचवीपर्यंत शिकलेल्या या दोघांना प्रत्येकी १२ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे विशेष आयुक्त अनिल शुक्ला यांच्या मते, कमी उत्पन्न गटातील, व्यसनाधीन आणि पैसा व आयुष्यासाठी एखादा ‘उद्देश’ शोधणारे तरुण या सापळ्यात सहज अडकतात. त्यांना दुबई किंवा अन्य देशांत स्थलांतरित करण्याचे आणि समुदायासाठी ‘हिरो’ करण्याचे आश्वासन दिले जाते.

इन्स्टाग्रामच्या कमेंट्स ठरताहेत ‘हंटिंग ग्राउंड’

या संपूर्ण यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सोशल मीडियावरील कमेंट्स. भट्टी आणि त्याचे साथीदार इन्स्टाग्रामवर स्वतःची प्रतिमा ‘तारणहार’ म्हणून उभी करणाऱ्या आकर्षक रील्स आणि पोस्ट करतात. त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची खाती तपासली जातात. त्यातून भारतातील असंतुष्ट तरुणांची निवड केली जाते. त्यानंतर डायरेक्ट मेसेजद्वारे संपर्क साधला जातो. संबंधित तरुणाला आपल्या ‘हिरो’ने स्वतः संपर्क साधल्याचा आनंद होतो. पहिली परीक्षा पार पडली की, आणखी काही सोशल मीडिया खाती दिली जातात. मग छोटी कामे सोपवली जातात. याच पद्धतीला तपास अधिकाऱ्यांनी ‘ग्रेडेड वर्क’ म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढत जाणारे काम असे नाव दिले आहे. आधी पोस्टर लावणे, नंतर आग लावणे आणि पुढे त्याहून गंभीर हिंसक कारवाया अशी या कामांची चढती भाजणी असते. काही तरुणांना दिल्ली किंवा अन्य शहरांत जाऊन शस्त्रे आणि दारूगोळा घेण्यासही सांगितले जाते.

यंत्रणा अधिक सतर्क

महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम वस्त्यांमधील रील्स पोस्ट करणाऱ्या तरुणांवरही या खात्यांकडून लक्ष ठेवले जाते. ज्या तरुणांचा प्रत्यक्ष हिंसक कारवाईत सहभाग झालेला नाही, त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतात. अनेक प्रकरणांत एफआयआर नोंदवून समुपदेशनानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. परदेशातील संशयित सोशल मीडिया खात्यांवरही सध्या तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. काही वेळा संभाव्य लक्ष्य असलेल्या तरुणांशी पोलीस स्वतः संपर्क साधून त्यांना सावध करतात. भारतातून संबंधित खाती ब्लॉक करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांकडेही विनंती केली जाते. मात्र ही लढाई सोपी नाही. संशयित वारंवार नवीन खाती तयार करतात. त्यांच्या हँडलमध्ये अनेकदा ३३३, ६६६ किंवा ९९९ अशा आकड्यांचा वापर केला जातो, असेही पोलिसांनाही लक्षात आले आहे.

‘स्थानिक तरुणां’चा वापर करणे अधिक सोपे

तपास अधिकाऱ्यांच्या मते, पूर्वी दहशतवादी संघटना स्वतःचे लोक पाठवत किंवा भारतीय तरुणांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवून पुन्हा भारतात आणत. या प्रक्रियेत अनेक धोके असत. त्याऐवजी आता त्यांना मोडस ऑपरेंडी बदलली असून देशातील असंतुष्ट तरुणांचा वापर करणे त्यांच्यासाठी अधिक सोपे आणि परिणामकारक ठरते आहे. कारण अशा तरुणांना प्रशिक्षण देण्याची गरज कमी असते आणि ते पकडले गेले तरी त्यामागील नेटवर्कपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अवघड असते. अधिकाऱ्यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘ते तरुण अपयशी ठरले तरी दहशतवादी संघटना किंवा आयएसआयसाठी गमावण्यासारखे काहीच नसते.’

भट्टी, अबिद जट्ट आणि इतर कोण?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार शहजाद भट्टी कधी दुबईत असतो तर कधी पाकिस्तानात. त्याच्यावर बॉम्ब तयार करणे आणि भारत, दुबई, अमेरिका व कॅनडात बेकायदा शस्त्रे व दारूगोळा पुरवण्याचे आरोप आहेत. बलुचिस्तानस्थित गुंड फारूक खोखरशी त्याचे जवळचे संबंध आहेत, अशी तपास यंत्रणांची माहिती आहे. सोशल मीडियाद्वारे तरुणांना आकर्षित करण्याव्यतिरिक्त भट्टीवर मार्च २०२४ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे यूट्यूबर रोजर संधूच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये मुस्लिमांविरोधात कथित वक्तव्य केल्याच्या कारणावरून अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना धमकी देण्याच्या प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते.

कथित पाकिस्तानी डॉन

अबिद चहल ऊर्फ अबिद जट्ट स्वतःला ‘पाकिस्तानी डॉन’ म्हणवतो आणि इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर सक्रिय असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राणा हुनैन ऊर्फ राणा भाईविरोधात भारतातील किमान पाच राज्यांत एफआयआर आहेत. पैसे, शस्त्रे आणि सोशल मीडियावर अधिक प्रसिद्धी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना आकर्षित करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. अजमल गुजर, हमद मेमन, अश्रफ बशीर आलम, उझैर आणि यावर खान हेही अशाच कारवायांमध्ये सहभागी असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे.

इन्स्टाग्राम कमेंटपासून सुरुवात आणि …

डिजिटल जगात धोक्याची सुरुवात नेहमी एखाद्या संशयास्पद फाइलपासून किंवा गुप्त संदेशापासूनच होते असे नाही. तर हल्ली अनेकदा ती केवळ एका इन्स्टाग्राम कमेंटपासून सुरू होते आणि एका छोट्याशा ‘टास्क’पासून हिंसक कारवाईपर्यंत पोहोचते!