Pakistan Lyari Gang War Uzair Baloch Brother Firing News : पाकिस्तानच्या कराची शहरातील प्रसिद्ध ल्यारी भागात गुरुवारी अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात कुख्यात गँगस्टर उझैर बलोच याचा भाऊ झुबैर हा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कराचीसह संपूर्ण पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. झुबैरवर झालेल्या या गोळीबारानंतर ल्यारीत पुन्हा रक्तरंजित संघर्ष पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पोलिसांसह निमलष्करी दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारतीय गुप्तहेर-आधारित ‘धुरंदर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उझैर बलोच याचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. सध्या तो कराचीतील एका तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे समजते.

गोळीबाराची घटना नेमकी कशी घडली?

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी झुबैर बलोच हा कराचीतील चाकीवारा रोडजवळील सिंगू लेन येथील आपल्या घराबाहेर बसला होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात झुबैरच्या छाती आणि पोटात अनेक गोळ्या लागल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून झुबैरच्या साथीदारांनीही हल्लेखोरांवर गोळीबार केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. या चकमकीत घटनास्थळी उभे असलेले दोन नागरिक गोळीबाराच्या तडाख्यात सापडले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या झुबैरला त्याच्या साथीदारांनी तातडीने उपचारासाठी कराचीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते.

पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

गोळीबाराच्या या घटनेनंतर ल्यारी भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेषत: दक्षिण कराची जिल्ह्यात पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी गस्त तसेच देखरेख वाढवली आहे. त्यामागे तीन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. ‘डॉन’ वृत्तापत्राच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी कराचीतील गँगवार संपवण्यासाठी निमलष्करी दलाने कारवायांचा धडाका सुरू केला होता. त्या अंतर्गत दहशत माजवणाऱ्या टोळक्यांमधील अनेक गुंडांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईच्या भीतीपोटी बहुतांश गुंड दुबई तसेच इराणमध्ये पळून गेले. प्रकरण शांत झाल्यानंतर या गुंडांनी पुन्हा कराचीत आपले जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील काळात अंडरवर्ल्डशी संबंधित अनेकजण पुन्हा ल्यारी भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

झुबैर बलोच याच्यावर हल्ला कोणी केला?

लियारीत दहशत घालणाऱ्या झुबैर बलोच याला २०१२ मध्ये पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले होते. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये तो जामिनावर बाहेर आला आणि त्याने एका राजकीय पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी झुबैरने ल्यारी परिसरात त्याच्या पक्षाचे झेंडेही लावले होते. तपास यंत्रणांच्या मते, त्याच्या या नव्या राजकीय सक्रियतेमुळे प्रतिस्पर्धी स्थानिक गटांमध्ये नाराजी निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. झुबैरचा भाऊ उझैर बलोच हा बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स अमन कमिटी (PAC) या संघटनेचा प्रमुख होता. अपहरण, खंडणी आणि टोळी युद्धाच्या जोरावर या संघटनेने एकेकाळी ल्यारीत मोठे वर्चस्व निर्माण केले होते. उझैर बलोच सध्या तुरुंगात असला तरी त्याच्याशी निष्ठावान असलेले जाळे अद्याप सक्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळ्यांवर तातडीने सूड उगवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा विशेष सतर्क झाल्या आहेत.

‘धुरंधर’ चित्रपटाशी काय आहे संबंध?

कराचीतील या रक्तरंजित हल्ल्याची घटना अशा वेळी घडली, जेव्हा कुख्यात गुंड उझैर बलोच आणि लियारी गँगवारबाबत सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली. भारतात गेल्या वर्षी ‘धुरंधर’ आणि त्याचा पुढील भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटात अभिनेता दानिश पांडोरने उझैर बलोवर आधारित व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे ल्यारीच्या गुन्हेगारी इतिहास जागतिक स्तरावर मोठा चर्चेत आला होता. चित्रपटाच्या यशानंतर उझैर बलोचचे नाव पुन्हा चर्चेत आले आणि त्याची प्रतिमा अनेक प्रेक्षकांसाठी सिनेमातील एका प्रभावी पात्राप्रमाणे समोर आली. चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर पाकिस्तानी पत्रकार नूर-उल-अरिफीन यांनी २०१२ मध्ये घेतलेली उझैर बलोचची मुलाखतही सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाली. इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर या मुलाखतीच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आल्या होत्या.

उझैर बलोचने काय दावा केला होता?

या मुलाखतीत उझैर बलोचने, मी एका मुंगीचाही जीव घेतलेला नाही. अल्लाहने मला जे काही दिले आहे, ते मी माझ्या लोकांमध्ये वाटत आहे, असा दावा केला होता. यादरम्यान झुबैर बलोचवरील प्राणघातक हल्ल्याने चित्रपट आणि सोशल मीडियातून निर्माण झालेल्या या प्रतिमेला वास्तवाची जाणीव करून दिली आहे. एका बाजूला ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम असताना, दुसऱ्या बाजूला ल्यारीतील रहिवाशांना पुन्हा एकदा संभाव्य टोळी युद्धाच्या भीतीला सामोरे जावे लागत आहे. झुबैर बलोचवर हल्ला करणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी कराचीतील तपास यंत्रणांनी मोठ्या शोधमोहिमेला सुरुवात केली आहे. कोणताही पुढील हिंसाचार टाळण्यासाठी लियारी परिसरातील पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे अशी अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानमधील विविध शहरांत टोळीयुद्धाच्या कित्येक घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले असून तेथील लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. हे टोळीयुद्ध नेमके कधी संपणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.