Mahabharata and Pakistan connection: पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठाने प्रथमच संस्कृत भाषा अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात संस्कृतचे औपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांतर्गत महाभारत आणि भगवद्गीता यांसारखी संस्कृतमधील महत्त्वाची ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असल्याची माहिती लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच संस्कृतसह महाभारत शिकवले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि महाभारताचा पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक संबंध समजून घेण्याचा हा प्रयत्न.
वास्तविक विषयाला हात घालण्यापूर्वी पुरातत्त्वीय पुरावे आणि साहित्यिक पुरावे यांच्यातील फरक आणि अनुबंध समजून घेणं गरजेचं आहे. महाभारत हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाभारतातील प्रत्येक कथेशी किंवा प्रसंगाशी आपल्या संस्कृतीची नाळ जोडलेली आहे. परंतु, पुरातत्त्वशास्त्रात कथेपेक्षा भौतिक अवशेष आणि त्यांचे कालमान यांना अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दोन्हीची सांगड घालणे गरजेचं ठरतं.
महाभारताच्या संदर्भात विचार करावयाचा झाला तर याचे खरं श्रेय प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ बी. बी. लाल यांना जाते. त्यांनी महाभारतात नमूद केलेल्या वेगवेगळ्या स्थळांची यादी करून तिथे प्रत्यक्ष पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. त्यामुळेच महाभारत आणि पुरातत्वीय पुराव्यांची सांगड घालणं शक्य झालं. पुराणा किला (इंद्रप्रस्थ), हस्तिनापूर, द्वारका यांसारख्या महाभारतात नमूद केलेल्या प्रसिद्ध स्थळांवर झालेल्या पुरातत्त्वीय उत्खनन आणि अन्वेषणात महत्त्वाचे सांस्कृतिक अवशेष उघडकीस आले. त्यामुळे महाभारतात नमूद केलेल्या स्थळांना प्राचीन इतिहास असल्याचे सिद्ध झाले. याच नियमाला अनुसरून पाकिस्तानमधील पुरातत्त्वीय स्थळं आणि महाभारत यांचा नेमका संबंध काय याचा घेतलेला हा आढावा.
खरंतर, पाकिस्तान आणि महाभारत यांच्यातील वेगळा संबंध प्रस्थापित करण्याची गरज नाही. परंतु, भारत आणि पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर भारतातील पुरातत्त्वीय स्थळं आणि महाभारत किंवा रामायण या संबंधांवर संशोधन आणि चर्चा वारंवार होते. परंतु, हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती वगळता पाकिस्तानातील पुरातत्त्वीय स्थळांचा भारतीय संस्कृतीशी असलेल्या संबंधांवर फारशी चर्चा केली जात नाही. परंतु, इथे एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजे पाकिस्तान पूर्वी भारताचाच भाग होता, त्यामुळे तिथल्या स्थळांवर आजही उत्खनन केलं तरी भारतीय संस्कृतीचेच पुरावे सापडणार आहेत. किंबहुना यापूर्वी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातही असेच पुरावे मिळाले आहेत.

तक्षशिला
साहित्यिक संदर्भानुसार महाभारताचे पहिले पठण ऋषी वैशंपायन यांनी राजा जनमेजयाने केलेल्या सर्प यज्ञाच्या वेळी तक्षशिलेत केले होते. वैशंपायन हे व्यासांचे शिष्य होते. या घटनेचा संदर्भ महाभारताच्या आदिपर्वात येतो. तर, परीक्षिताचा राज्याभिषेकही तक्षशिलेतच झाला होता. तक्षशिला पाकिस्तानमधील रावळपिंडी जिल्ह्यात आहे. पौराणिक संदर्भानुसार हा नागवंशीयांचा प्रदेश होता. नागराज तक्षकाने परीक्षिताचा वध येथेच केला होता. दगड कापून या प्रदेशाची रचना करण्यात आल्याने या प्रदेशाला तक्षशिला हे नाव मिळाल्याचे मानले जाते. या प्रदेशाची स्थापना भरताने (रामाचा भाऊ) केल्याचे पौराणिक संदर्भ सांगतात.
या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात इसवी सनपूर्व ८ व्या शतकातील नागरी संस्कृतीचे पुरावे सापडलेले आहेत. म्हणूनच, या स्थळाचा UNESCO च्या जागतिक वारसा (१९८०) यादीत समावेश करण्यात आलेला आहे. प्राचीन साहित्यात या स्थळाचा उल्लेख सुप्रसिद्ध विद्याकेंद्र म्हणून करण्यात आलेला आहे. बौद्ध साहित्यात तक्षशिलेचा उल्लेख गांधार देशाची राजधानी म्हणून येतो. याच प्रदेशात अशोकाची नियुक्ती प्रांताधिकारी म्हणून करण्यात आलेली होती, असा संदर्भ बौद्ध ग्रंथांमध्ये आढळतो. इसवी सनाच्या पाचव्या शतकात हूणांनी या देशावर आक्रमण करण्यापूर्वीपर्यंत हा प्रदेश समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून नावारूपास आला होता.
ब्रिटिश कालखंडात जॉर्न मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थळावर उत्खनन करण्यात आले होते. नंतरची उत्खनने अमलानंद घोष यांनी केली. भीर (इ.स.पूर्व ८००-५२५), सिर्काप (इ.स.पूर्व २ रे शतक-इ.स. १ ले शतक) , सिरसुख (कुषाण; इ.स. १ ले-३ रे शतक) या तीन टेकाडांवर उत्खनन करण्यात आले. या उत्खननांत गांधार शैलीतील शिल्प आणि बौद्ध धर्माशी संबंधित अनेक अवशेष सापडले. याशिवाय प्रगत नगर रचना, वेगवेगळ्या कालखंडातील मातीची भांडी, नाणी, दैनंदिन वापरातील वस्तूंचेही अवशेषही सापडले आहेत.
गांधार
गांधार हा प्रदेश आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये पसरलेला होता. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांत हा या प्राचीन प्रदेशाचा मुख्य भाग मानला जातो. पेशावर खोरे, स्वात दरी, चारसद्धा (पुष्कलावती) आणि तक्षशिला ही गांधार प्रदेशाची ऐतिहासिक केंद्रे होती. महाभारत आणि रामायण या दोन्ही महाकाव्यांमध्ये गांधार प्रदेशाला विशेष स्थान आहे. महाभारतातील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही मूळची गांधार प्रदेशातील राजकन्या होती, तर तिचा भाऊ शकुनी हा गांधारचा राजकुमार होता.
याशिवाय, गांधार प्रदेशाला बौद्ध इतिहासातही अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. हा प्रदेश इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या पाचव्या- सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म, बौद्ध शिक्षण आणि बौद्ध कलाकृतींचे आशियातील एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाला. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात या प्रदेशात बौद्ध धर्माचा अधिक प्रसार झाला. त्यानंतर इंडो-ग्रीक, इंडो-सिथियन, कुषाण अशा विविध सत्ताकाळांत बौद्ध मठ, विहार, स्तूप आणि विद्यापीठीय केंद्रांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गांधारची सर्वात प्रसिद्ध देणगी म्हणजे गांधारकला. ही कला जगभरात Greco-Buddhist Art म्हणून ओळखली जाते. गांधार हा प्रदेश प्राचीन काळात सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता. हा प्रदेश प्राचीन रेशीम मार्गावर असल्याने या प्रदेशांचे महत्त्व अधिक होते. सततच्या व्यापारी संबंधांमुळे गांधारमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात झाली.
मद्र
मद्र देश (Madra) हा महाभारतकालीन वायव्य भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश होता. आजच्या भौगोलिक नकाशानुसार हा परिसर मुख्यतः पाकिस्तानातील लाहोर, सियालकोट आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशांशी संबंधित मानला जातो. गांधार, पांचाल आणि कुरू राज्यांदरम्यान असलेल्या या प्रदेशाला त्या काळात राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व होते. मद्र देशातील सर्वात उल्लेखनीय संदर्भ म्हणजे माद्री. सहदेव-नकुल यांची आई. राजा पांडूने मद्राच्या प्रथेप्रमाणे लग्नासाठी ‘वधूमूल्य’ (शुल्क) देऊन माद्रीशी विवाह केला होता. तिचा भाऊ शल्य याची भूमिकाही महाभारतात महत्त्वाची होती (संदर्भ: आश्वलायन-गृह्यसूत्र/महाभारत).
कंबोज
प्राचीन कंबोजचे (Kamboja) स्थान उत्तर पाकिस्तान, विशेषतः गिलगिट–बाल्टिस्तान, हजारा, स्वात, तसेच अफगाणिस्तानातील बदख्शान आणि पामीर परिसर या भागांमध्ये मानले जाते. महाभारतात कंबोजचा उल्लेख विशेषतः कुशल घोडेस्वार आणि अद्वितीय युद्धकौशल्य असलेल्या योद्ध्यांच्या रूपात येतो. त्यांची सेना घोडदळासाठी प्रख्यात होती आणि त्या काळातील सर्वश्रेष्ठ घोडे आणि घोडेस्वार याच प्रदेशातून येत असत. कंबोजांचे समाजजीवन, भाषा आणि युद्धशैली यावर मध्य आशियाई आणि इराणी संस्कृतीचा ठसा स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच महाभारतात या प्रदेशाचा उल्लेख म्लेंच्छ म्हणून करण्यात आलेला आहे.
एकुणातच, पाकिस्तानने कितीही नाकारले तरी त्यांची नाळ ही भारतीय संस्कृतीतच आहे, हे निर्विवाद सत्य आहे!
संदर्भ सूची: References
Lal, B. B. 2001. The Mahabharata and Its Historicity: A Fresh Look. Delhi: Aryan Books International.
Lal, B. B. 1954-55. “Excavations at Hastināpura.” Ancient India 10-11: 5-151.
Marshall, John. 1951. Taxila: An Illustrated Account of Archaeological Excavations. 3 vols. Cambridge: Cambridge University Press.
