Pakistan US Iran Ceasefire : पश्चिम आशियातील युद्धात पाकिस्तानने मध्यस्थी करत अमेरिका व इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी घडवून आणली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी महत्वाची भूमिका बजावली. अमेरिकेला इराणबरोबर चिघळलेल्या युद्धातून बाहेर पडायचे होते म्हणून त्यांनी पाकिस्तानला मदत मागितली. त्यामुळे पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानने अत्यंत काळजीपूर्वकपणे मध्यस्थी करत स्वत:च्या क्षमतेपेक्षा अधिक भरीव कामगिरी केल्याची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. मागील वर्षी ऑपरेशन सिंदूरनंतर व अमेरिकेबरोबर ‘क्रिप्टो डील’ केल्यानंतर पाकिस्तानची अमेरिकेशी जवळीक अधिक वाढली. उद्या (शुक्रवारी) पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अमेरिका व इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढल्याने भारताची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने प्रयत्न केले होते, परंतु, आता पाकिस्तान केंद्रस्थानी आला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

अमेरिका व इराणकडून पाकिस्तानचे कौतुक?

ट्रम्प व इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची या दोघांनीही पाकिस्तानचे कौतुक केले. पाकिस्तानमुळे कारवाई थांबवत असल्याचे ट्रम्प म्हणाले होते, तर युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने अथक परिश्रम घेतले. त्यासाठी इराणने शरीफ व मुनीर यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीन, सौदी अरेबिया, टर्की, इजिप्त आणि कतार या देशांनी शस्त्रसंधी घडवून आणण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अमेरिकेने शांततेसाठी संयम दाखवल्याचे शरीफ म्हणाले.

सौदी अरेबिया, टर्की, इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्लामाबादमध्ये बैठक?

अमेरिका व इस्रायलने इराणवर पहिल्यांदा हल्ला केला, तेव्हापासूनच पाकिस्तानने अमेरिका व इराण यांच्यात मध्यस्थी करणे सुरू केले. मागील दोन आठवड्यांपासून पाकिस्तानने दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार करण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न केले होते, अशी माहिती पाकिस्तानची वृत्त संस्था ‘द डॉन’ने दिली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या युद्धात कोणत्याही एका देशाची बाजू घेणे टाळले. इराणचे म्हणणे पाकिस्तानने अमेरिकेपर्यंत पोहोचवले. सर्वात मोठी घडामोड २९ व ३० मार्च दरम्यान घडली. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त आणि टर्की या देशांचे परराष्ट्र मंत्री एकत्र आले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात इराण व अमेरिका दरम्यान बोलणी सुरू करण्याबाबत एकमत झाले. पश्चिम आशियात अधिक तणाव वाढवू नये, असे ठरवण्यात आले. अशी माहिती ‘द डॉन’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात नमूद आहे.

पाकिस्तानने कोणत्या देशांशी साधला संपर्क?

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर हे ट्रम्प यांच्या संपर्कात होते. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ व इशाक दार यांनी जगातील महत्वाच्या नेत्यांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वॉशिंग्टन, मॉस्को (रशिया), बिजिंग (चीन) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते होते. तसेच त्यांनी गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलेचे सदस्य असलेल्या देशांशी संपर्क साधला होता. पाकिस्तानी अधिकारी इराणमधील सशस्त्र सेना इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

शस्त्रसंधीसाठी पाकने तयार केला दस्तावेज

शस्त्रसंधी होण्यासाठी पाकिस्तानने एक विनंती करणारा दस्तावेज तयार केला होता. तो दस्तावेज दोन्ही देशांना देण्यात आला. सैन्य माघार घेणे व समुद्रातील महत्वाचे मार्ग खुले करणे असे त्यात नमूद होते. अखेर ७ एप्रिल रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. आता १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. मागील वर्षी भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता पाकिस्तानने इराण-अमेरिकेतील युद्ध थांबवण्यात मध्यस्थी केली. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठी भारताने परिश्रम घेतले होते. पाकिस्तानला आता जागतिक पातळीवर महत्व आले आहे.

पाकिस्तानची प्रतिमा उंचावली?

अमेरिका व इराण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी होण्यात पाकिस्तानचे योगदान असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले आहे. “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या विनंतीचा मान राखत मी आज रात्री इराणमध्ये विनाशकारी सैन्याला पाठवण्याचा निर्णय मागे घेत आहे”, असे ट्रम्प शस्त्रसंधीची घोषणा करणाऱ्या पोस्टमध्ये म्हणाले होते. तर “पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ व फिल्ड मार्शल मुनीर यांनी युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या वतीने आभार मानतो”, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानने अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळाला १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांनी एकत्र बसून सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढावा, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले. पाकिस्तानने दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

भारतासाठी काय महत्वाचे? पुढे काय?

अमेरिका व इराण दरम्यान इस्लामाबादेत चर्चा होणार आहे. त्यात भारताचे मित्रदेश देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानला एकटे पाडण्यात किंवा त्याला कटकारस्थान रचणारा देश म्हणून सिद्ध करण्यात भारताला अनेक अडचणी येऊ शकतात. आखातातील अनेक देश पाकिस्तानच्या बाजूने होऊ शकतात. भारत ऊर्जेसाठी आखाती देशांवर अवलंबून आहे, असे भारताचे आखातात काम केलेले माजी राजनैतिक अधिकारी यांनी सांगितले. दरम्यान, येत्या काही आठवड्यांत व महिन्यांत भारतही स्वत:चे स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री हे सध्या अमेरिकेत आहेत, तर एस जयशंकर हे ११ व १२ एप्रिल रोजी यूएईच्या दौऱ्यावर जाणार आहेत.