Pakistan Navy Returns to Bangladesh After 50 Years: १९७१ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका बांगलादेशात दाखल झाल्या आहेत. ही घडामोड भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नवीन अशरफ हे बांगलादेशाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांची भेट घेतली आणि त्यांच्या समकक्ष अॅडमिरल एम नजमुल हसन यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानी नौदलाची युद्धनौका ‘पीएनएस सैफ’ बांगलादेशमध्ये दाखल झाल्यानंतर अॅडमिरल अशरफ बांगलादेशात पोहोचले. ही युद्धनौका बांगलादेशच्या आग्नेय भागातील मुख्य बंदर चट्टोग्राम येथे चार दिवसांच्या सदिच्छा भेटीसाठी दाखल झाली आहे.

पाकिस्तान नौदलप्रमुख ढाकामध्ये

रविवारी पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नवीन अशरफ यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-जमान यांची भेट घेतली. तसेच त्यांनी आपल्या समकक्ष अॅडमिरल एम. नजमुल हसन यांच्याशीही द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पाकिस्तानी नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, या भेटीचा उद्देश इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील दीर्घकाळापासून असलेल्या संबंधांना अधिक दृढ करणे आणि सागरी सहकार्य वाढवणे हा आहे.

“अॅडमिरल अशरफ आणि जनरल झमान यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि लष्करी क्षमतांना अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. तसेच त्यांनी प्रशिक्षण, सेमिनार आणि अधिकृत भेटींद्वारे लष्करी सहकार्य वाढवण्याच्या शक्यतांवरही विचार विनिमय केला,” असं त्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या Inter Service Public Relations (ISPR) या विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अॅडमिरल अशरफ यांचा बांगलादेश दौरा पाकिस्तानच्या संयुक्त लष्करी प्रमुख समितीचे अध्यक्ष जनरल साहिर शामशाद मिर्ज़ा यांच्या भेटीनंतर दोन आठवड्यांनी झाला. मिर्झा यांनी आपल्या दौऱ्यात बांगलादेशचे कार्यवाहक सरकारप्रमुख मुहम्मद युनूस आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट घेतली होती.

ऐतिहासिक पार्श्वभूमी: १९७१ चे युद्ध आणि तणावपूर्ण संबंध

१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण होते. त्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवायांमुळे बांगलादेश आणि पाकिस्तान संबंधांवर खोल राजकीय आणि भावनिक परिणाम झाले. त्यामुळे ढाक्याने इस्लामाबादपासून लांब राहण्याचं धोरण अवलंबलं होतं. १९७१ नंतर बांगलादेशात पाकिस्तानविषयी तीव्र नाराजी होती आणि सैनिक, विशेषतः नौदल भेटी, यावर अनौपचारिक बंदी होती.

राजनैतिक संबंधांमध्ये दीर्घ थंडावा

दोन्ही देशांनी नंतर औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले (१९७४ मध्ये), तरीही सैन्याच्या पातळीवरील संपर्क जवळपास पूर्णपणे थांबलेला होता. पाकिस्तानी युद्धनौका किंवा लष्करी प्रतिनिधीमंडळ बांगलादेशात गेलेले नाही. बांगलादेशनेही इस्लामाबादसोबत मर्यादितच संवाद ठेवला. गेल्या पाच दशकांत नौदल सहकार्य शून्यावर आले होते.

पाकिस्तान-बांगलादेश वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची?

चट्टोग्राम बंदरावर पीएनएस सैफ या पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौकेच्या आगमनाने इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील दशकांपासून थंडावलेल्या संबंधांना प्रतिकात्मक सुरुवात झाली, असं मानलं जात आहे. केवळ राजनैतिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर धोरणात्मकदृष्ट्याही या भेटीचं वेगळं महत्त्व आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानचं बंगालच्या उपसागरात पुन्हा आगमन हे या भागात त्यांचे सागरी अस्तित्त्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाचा संकेत असू शकतो. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने हे सर्वात महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जुलै उठाव’ या जनआंदोलनात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार सत्ताच्युत झाल्यानंतर, बांगलादेश-पाकिस्तान संबंधांमध्ये झपाट्याने सुधारणा दिसू लागली. या उठावानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम प्रशासन स्थापन झाले, त्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा प्रस्थापित होऊ लागले.

या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चे अधिकारी ढाक्याला भेट देऊन गेले होते. ISI चे डायरेक्टर जनरल ऑफ अॅनालिसिस मेजर जनरल शाहिद आमिर अफसर यांनीही बांगलादेशचा दौरा केला होता. यापूर्वी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या एका प्रतिनिधीमंडळाने पाकिस्तानचा दौरा केला होता.

इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील अशा उच्चस्तरीय भेटींची वारंवारता अलीकडे वाढत आहे. पाकिस्तानच्या संयुक्त लष्करी समितीचे (CJCSC) अध्यक्ष जनरल साहिर शामशाद मिर्झा यांनी बांगलादेशला भेट देऊन कार्यवाहक सरकारप्रमुख मुहम्मद युनूस तसेच तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची भेट घेतली होती. त्यानंतरच पीएनएस सैफ या युद्धनौकेचे चट्टोग्राममध्ये आगमन आणि अॅडमिरल नवीन अशरफ यांचा दौरा झाला.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील नव्या जवळीकीकडे केवळ राजनैतिक दृष्टिकोनातून पाहणं पुरेसं नाही. तर या भेटीमागे दडलेले सागरी भू-राजकारणाचे सूक्ष्म संकेत समजून घेणं आवश्यक आहे. बंगालचा उपसागर हा आता भारत, चीन आणि पाकिस्तान या तिघांसाठीही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर ठरत आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या क्षेत्रातील घडामोडींकडे भारताने अधिक सतर्कतेने पाहण्याची गरज आहे.