दोन आठवड्यांपूर्वी उत्तर अरबी समुद्रात भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौकांची सौम्य टक्कर झाली होती. ओमानच्या आखातापासून अंदाजे १२० नॉटिकल मैल अंतरावर अचानक दोन्ही नौका समोरासमोर आल्यामुळे हा अपघात घडला होता. या घटनेची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानने आता त्याच ठिकाणी आपल्या नवीन पाणबुडीची ताकद दाखवली. पाकिस्तानी नौदलात नव्याने दाखल झालेल्या पीएनएस हंगोर या पाणीबुडीने २७ सप्टेंबर रोजी उत्तर अरबी समुद्रात थेट शस्त्रप्रहाराची चाचणी केली. या लष्करी सरावादरम्यान पाणबुडीवरून समुद्रातील पृष्ठभागावरील लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागण्यात आले. या क्षेपणास्त्राने अचूक वेध घेत निश्चित केलेले सागरी लक्ष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल नवीद अश्रफ आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत ही चाचणी पार पडली. या पार्श्वभूमीवर भारताच्या शत्रूदेशाकडे असलेली ‘हंगोर पाणबुडी’ किती शक्तिशाली? तिची नेमकी वैशिष्ट्ये काय? त्याविषयी…

पीएनएस हंगोरची नेमकी वैशिष्ट्ये काय?

पाकिस्तानकडे असलेल्या पीएनएस हंगोर ही पाणबुडी चीनमध्ये तयार करण्यात आलेली आहे. २०१५ मध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये अब्जावधी डॉलर्सचा द्विपक्षीय करार झाला होता. या करारानुसार चीनच्या स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनने पाकिस्तानी नौदलाला आठ अत्याधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पात तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देण्यासाठी ५०:५० उत्पादन पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्यानुसार चार पाणबुड्या चीनमध्ये, तर उर्वरित चार पाकिस्तानमध्ये तयार करण्याचे ठरले होते. चीनच्या वुहान आणि शांघाय येथील प्रकल्पांमध्ये पीएनस हंगोरची निर्मिती करून २०२४ मध्ये ती लाँच करण्यात आली. यानंतर त्याचवर्षी एप्रिलमध्ये ही पाणबुडी पाकिस्तानी नौदलात दाखल झाली. उर्वरित चार पाणबुड्या पाकिस्तानातील कराची शिपर्या अँड इंजिनिअरिंग वर्क्स येथे तयार केल्या जात असल्याचे समजते. या पाणबुड्यांसाठी स्टील कटिंग आणि कील लेइंगचे काम २०२१ ते २०२४ या कालावधीत सुरू झाले. यामध्ये पीएनएस गाझी या पाणीबुडीचा समावेश आहे. या चारही पाणबुड्या २०२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने पाकिस्तानी नौदलात सामील होणार असल्याचे सांगितले जाते.

‘हंगोर’ नावाचा ऐतिहासिक संदर्भ

‘हंगोर’ हे नाव भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नौदल इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. मूळ मूळ PNS हंगोर ही फ्रेंच बनावटीची डॅफ्ने-क्लास पाणबुडी होती. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दीवच्या किनाऱ्याजवळ या पाणबुडीने भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस खुकरी बुडवली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या पाणबुडीने युद्धनौका बुडवण्याची ती पहिलीच घटना होती. या घटनेत भारताचे १८ अधिकारी आणि १७६ नौसैनिकांना वीरमरण आले होते. सध्याच्या हंगोर श्रेणीतील या पाणबुडीत आधुनिक हायड्रोडायनॅमिक रचना आणि कमी आवाज निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. किनारी भागातील तसेच खोल समुद्रातील ‘सी-डिनायल’ म्हणजे शत्रूच्या नौदलाला समुद्राचा वापर करण्यापासून रोखण्याच्या मोहिमांसाठी तिची रचना करण्यात आली आहे. या पाणबुडीचे वजन अंदाजे २,३०० ते २,४०० टन इतके आहे. तसेच तिची लांब सुमारे ७६ मीटर, रुंदी ८.४ मीटर आहे. पाण्याखाली ३०० मीटरहून अधिक खोल जाण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. आधुनिक ऑटोमेशन प्रणालीमुळे ही पाणबुडी केवळ ३८ ते ४५ नौसैनिकांच्या मदतीने चालवणे शक्य आहे.

‘एआयपी’ तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा

हंगोर श्रेणीतील या पाणबुडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची एअर-इंडिपेंडंट प्रोपल्शन (AIP) प्रणाली मानली जाते. पारंपारिक पाणबुड्यांना आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी डिझेल जनरेटर चालवावे लागतात. यासाठी त्यांना वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा पेरिस्कोपच्या खोलीवर यावे लागते. या प्रक्रियेत उष्ण धूर बाहेर पडत असल्यामुळे पाणबुडी रडार आणि सागरी गस्ती विमानांच्या नजरेत येण्याचा धोका असतो. मात्र चिनी बनावटीच्या हंगोर पाणबुडीत वातावरणातील ऑक्सिजनशिवाय पाण्याखालीच वीज निर्माण करता येते. त्यामुळे ती पाण्याच्या पृष्ठभागावर न येता सलग तीन ते चार आठवडे खोल समुद्रात राहू शकते. तसेच या पाणबुडीच्या बाहेरील भागावर आवाज शोषून घेणाऱ्या विशेष रबर टाइल्स लावण्यात आल्याचे समजते. या टाइल्स सक्रिय सोनारमधून येणाऱ्या ध्वनीलहरी शोषून घेण्यास मदत करतात. याशिवाय इंजिनमधून निर्माण होणारा आवाज पाण्यापर्यंत पोहोचू नये यासाठी पाणबुडीत विशेष प्रणालीही बसवण्यात आली आहे. कमी वेगाने प्रवास करताना निर्माण होणारे बुडबुडे अर्थात कॅव्हिटेशन कमी करण्यासाठी त्यात विशेष प्रकारच्या बहुपाती प्रोपेलरचा वापर करण्यात आला आहे. हंगोर क्लास पाणबुडीतून विविध जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करता येतो, असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने तेथील डॉन या वृत्तपत्राला सांगितले.

हंगोर पाणबुडीचा भारतासाठी मोठा धोका?

उत्तर अरबी समुद्र हा भारताच्या पश्चिमेकडील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, पर्शियन गल्फमधून येणारे देशाचे ऊर्जा वाहतूक मार्ग आणि कारवार येथील आयएनएस कदंब यांसारखे महत्त्वाचे नौदल तळ या समुद्री क्षेत्राच्या सीमेवर हा सागरी परिसर येतो. हंगोर श्रेणीतील सर्व आठ पाणबुड्या नौदलात दाखल झाल्यानंतर पाकिस्तानची अरबी समुद्रातील ताकद वाढणार आहे. या पाणबुड्यांची तैनाती झाल्यास भारताच्या शत्रूदेशाकडे एकूण ११ सुसज्ज आणि हल्लेखोर पाणबुड्यांचा ताफा असेल. अरबी समुद्रातील उथळ, उष्ण आणि खारट पाण्यामुळे सोनार लहरींचा अंदाज लावणे कठीण जाते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकणाऱ्या आणि कमी आवाज करणाऱ्या हंगोर श्रेणीतील पाणबुड्या पाकिस्तानी नौदलाची क्षमता वाढवू शकतात. या पाणबुड्यांना रोखण्यासाठी भारतीय नौदलाला आपल्या विमानवाहू युद्धनौका आणि मुख्य जहाजांच्या संरक्षणासाठी पाणबुडीविरोधी मोहिमांवर प्रचंड संसाधने तैनात करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताकडेही अत्याधुनिक क्षमता आहे. त्यामुळे पाकिस्तानने हंगोर पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी घेतली असली तरी भारताला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.