India Pakistan Conflict 2025 : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात २५ भारतीय पर्यटकांना आपले प्राण गमावावे लागले होते. प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत लष्करी कारवाई करीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. दरम्यान, पाकिस्तानने जम्मू सीमेवर पुन्हा ७० हून अधिक दहशतवादी लाँच पॅड सक्रिय केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

पाकिस्तानने पुन्हा उभारले लाँच पॅड

भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि दहशतवादी तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पाकिस्ताने गुप्त पद्धतीने ७२ दहशवादी लाँच पॅडची उभारणी केली आहे. त्यापैकी बरेसचे पॅड जम्मू आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारतावर हल्ला करण्याची तयारी केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यासाठी त्याने बांगलादेश येथे दहशतवादी तळ उभारल्याचे सांगितले गेले. या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, सीमेपलीकडून होणार्‍या संभाव्य घुसखोरीवर करडी नजर ठेवली जात आहे.

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी काय म्हणाले?

भारतीय सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवादी तळ आणि सीमावर्ती भागातील चौक्या उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने आपले सर्व लाँच पॅड्स नियंत्रण रेषेजवळून खोल भागात हलवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांच्या जुन्या आणि वाईट सवयी सुटलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या सियालकोट आणि जफरवाल भागात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ १२ दहशतवादी लाँच पॅड्स पुन्हा सक्रिय झाले आहेत. उर्वरित ६० लाँच पॅड्स हे नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडील जम्मूजवळील भागात उभारण्यात आले आहेत. दहशतवाद्यांची संख्या सतत बदलत असली तरी ते सहसा दोन ते तीन जणांच्या गटात ठेवले जातात, असे विक्रम कुंवर यांनी सांगितले.

आणखी वाचा : इम्रान खान आणि असीम मुनीर यांच्यात वैर कसे निर्माण झाले? बुशरा बीबींमुळे काय घडले?

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान

सध्या आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात दहशतवादी प्रशिक्षण छावण्या नाहीत; मात्र नियंत्रणरेषेच्या पलीकडील गहन भागात अशा छावण्यांच्या हालचालींची माहिती मिळत असल्याचे कुंवर यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जम्मू प्रांतातील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या ११८ चौक्या भारतीय सैन्यदलाने उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यापैकी ७२ चौक्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिरानगर, सांबा आणि जम्मू सेक्टर भागातील होत्या, तर ४६ चौक्या राजौरी आणि पुूछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील असल्याची माहिती उपमहानिरीक्षक कुंवर यांनी दिली आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानची पाळत ठेवणारी प्रणालीदेखील उद्ध्वस्त केली होती. मे महिन्यात झालेल्या युद्धविरामानंतर ही माहिती त्वरित उपलब्ध झाली नाही; परंतु आता ती समोर येत असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीवर बीएसएफची करडी नजर

सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमावर्ती भागात तैनात असलेल्या पाकिस्तानच्या अनेक रेंजर्सनी आपल्या चौक्या सोडून पळ काढला होता. काही दिवस त्यांनी या भागात पुन्हा चौक्या उभारण्याची हिंमत दाखवली नाही; पण आता ते परत आले असून, त्यांनी पुन्हा चौक्या उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या सर्व हालचालींवर नजर ठेवून आहोत. पाकिस्तानी सैन्य कोणत्या भूभागात बोगदे खोदत आहे, याची आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. सीमेचे रक्षण करण्यासाठी बीएसएफकडून अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. २०१९ नंतर सीमावर्ती भागात पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स घिरट्या घालताना दिसून आले. या धोक्याला तोंड देण्यासाठी बीएसएफने परिस्थितीशी जुळवून घेतले. आम्ही केवळ आमच्या जवानांना प्रशिक्षणच दिलेले नाही, तर सीमारेषेवर काउंटर-ड्रोन सिस्टीम्सही बसवल्या आहेत, अशी माहितीही शशांक आनंद यांनी दिली.

हेही वाचा : पाकिस्तानवर कोण करतंय ‘काळी जादू’? इम्रान खान यांच्या पत्नीवर नेमके आरोप काय?

बांगलादेशातून भारतावर हल्ला करण्याचा कट?

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात जवळचे संबंध निर्माण झाले आहे. या राजकीय बदलामुळे भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हा भारतावर हल्ला करण्याच्या दृष्टीने बांगलादेशचा वापर करीत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यातच संघटनेचा कमांडर सैफुल्ला सैफ याने केलेल्या एका वक्तव्यामुळे या दाव्यांना अधिकच बळ मिळाले होते. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या सभेत “हाफिज सईद शांत बसलेला नाही, तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करीत आहे,” असे विधान सैफने केले होते.

लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आधीच ‘पूर्वीय पाकिस्तान’ (आताचा बांगलादेश)मध्ये सक्रिय असून, ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी ते सज्ज आहेत, असा दावाही त्याने केला होता. त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि नियंत्रण रेषेसह बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीवर करडी नजर ठेवली जात आहे. हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेने यापूर्वी भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणलेले आहेत. त्यामध्ये २००८ चा मुंबई हल्ला आणि २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ल्याचा समावेश आहे.