Pakistan cancels its March 23 Republic Day Parade : दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने २३ मार्चला होणारी आपली प्रजासत्ताक दिनाची परेड अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने त्या संदर्भातील घोषणा केल्याची माहिती अरब न्यूजने आपल्या वृत्तात दिली. अमेरिका–इस्रायल–इराण यांच्यात युद्धाचा वणवा पेटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानला नेमकी कशाची भीती? शाहबाज शरीफ सरकारने प्रजासत्ताक दिनाची परेड अचानक रद्द का केली? त्याविषयीचा हा आढावा…
तेल संकटामुळे पाकिस्तान बिथरला
अमेरिका–इस्रायल–इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. मध्यपूर्वेत पेटलेल्या या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद असल्याने जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. या समुद्री मार्गातून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किंमतीत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. हीच बाब लक्षात घेता शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय?
१९४० साली ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या २७व्या अधिवेशनात पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाद्वारे उपखंडातील मुस्लीम समाजाने स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती, त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ पाकिस्तानमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आखाती देशांमधील तेल संकट आणि सरकारने जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
आणखी वाचा : इराण युद्धावरून ट्रम्प प्रशासनात वादाची ठिगणी; वरिष्ठ अधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा का दिला?
पाकिस्तान सरकारने काय म्हटले?
यंदा कोणताही मोठा सोहळा आयोजित न करता केवळ साध्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात येईल. मंत्रालयासह सर्व सरकारी कार्यालयांनी हा दिवस अतिशय साधेपणाने आणि सन्मानाने साजरा करावा, जेणेकरून मर्यादित कार्यक्रमांनंतरही या दिवसाचे महत्त्व आणि त्याचा खरा संदेश जपला जाईल. हा निर्णय केवळ आर्थिक बचतीसाठी नव्हे तर पाकिस्तान दिनाचे आदर्श आणि देशाची संकटांशी लढण्याची जिद्द ही सरकारच्या व्यापक काटकसरीच्या धोरणाशी सुसंगत राहावी, यासाठी घेण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये महागाईचा वणवा
दरवर्षी पाकिस्तान दिनानिमित्त इस्लामाबादमध्ये ३१ तोफांची सलामी आणि प्रांतीय राजधानींमध्ये २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये सशस्त्र दलांचे भव्य लष्करी संचलन आयोजित करून शक्तीप्रदर्शन केले जाते. मात्र, यंदाच्या भीषण ऊर्जा संकटामुळे हे सर्व सोहळे रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. इंधन आणि गॅसच्या तीव्र टंचाईमुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा वणवा पेटला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये पाकिस्तानचा ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः ग्रामीण भागात महागाईचा दर ७.३% इतका जास्त आहे. त्याआधीच्या महिन्यात हा दर सुमारे ५.८ टक्के इतका होता. पाकिस्तानमध्ये १ मार्च २०२६ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तानी सरकारच्या उपाययोजना काय?
‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याशिवाय शाळा-महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीतील वाहतूक रोखल्यामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमतीत गगनाला भिडल्या आहेत. त्यातच महागाई प्रचंड वाढल्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईमुळे शाहबाज शरीफ सरकारला पाकिस्तानी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पाकिस्तानसाठी होर्मुझ सामुद्रधुनी का महत्वाची?
पाकिस्तानसाठी होर्मुझची सामुद्रधुनी अतिशय महत्वाची मानली जाते. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एकूण आयातीपैकी जवळपास ८५ ते ९९ टक्के आयात याच मार्गावरून होते. गेल्या आठवड्याभरापासून हा मार्ग जवळपास बंदच असल्यामुळे पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेतील युद्धामुळे पाकिस्तानचे महिन्याचे इंधन आयात बिल १.७ अब्ज डॉलर्सवरून (सुमारे १४,११० कोटी रुपये) थेट ३.५ ते ४.५ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : RSS आणि RAW वरील बंदीच्या मागणीने खळबळ का उडाली? अमेरिकन आयोगाच्या अहवालात नेमके आहे तरी काय?
पाकिस्तानमध्ये इंधनाचा किती साठा?
ऊर्जा संकटामुळे इस्लामाबादमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. दीर्घकालीन करारांतर्गत कुवेतकडून होणारा डिझेलचा पुरवठा या विस्कळीत सागरी मार्गांमुळे सर्वाधिक धोक्यात असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पेट्रोलियम पदार्थांची आयात वाढवण्याचे आणि राखीव साठ्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानकडे सध्या केवळ ११ दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा आणि ९ दिवस पुरेल इतका एलपीजीचा साठा शिल्लक असल्याची सांगितले जात आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर २६६.१७ रुपये प्रति लिटर इतका आहे, तर डिझेल सुमारे २८०.८६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंधनाबरोबरच पाकिस्तानमध्ये अन्न आणि शीतपेयांच्या किमतीतही सुमारे ५.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस आणि वीज दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. त्यातच परकीय चलनाची टंचाई आणि कर्जाच्या परतफेडीमुळे पाकिस्तानी रुपयाचे मूल्य सतत घसरत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे येत्या काळात पाकिस्तानमध्ये डिझेलच्या दरात ४५-५० रुपयांपर्यंत; तर पेट्रोलमध्ये २५-२६ रुपयांपर्यंत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
