Pakistan Saree Ban History under General Zia ul Haq rule: अलीकडेच पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात पसूरी फेम नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या शीमा केर्मानी यांना काळ्या बुरखाधारी पोलिस कॉन्स्टेबलनी ताब्यात घेतल्याचे दिसले. या व्हिडिओतील केर्मानी यांची साडी, केसात माळलेले फूल आणि कपाळावरील लाल बिंदी विशेष चर्चेत होती. भारतीय शृंगारात नटलेली स्त्री पाकिस्तानच्या रस्त्यावर पाहायला मिळणे तसे कठीणच. त्यामुळे भारतापासून विभक्त झालेल्या या प्रांतात साडी कधीपासून निषिद्ध ठरण्यास सुरुवात झाली हेही जाणून घेणे गरजेचे आहे.
साडी: भारतीय उपखंडाची सांस्कृतिक ओळख
साडी आवडणार नाही अशी स्त्री सापडणे विरळच आहे. Gen Z ने तर साडी ही फॅशन स्टेटमेंट म्हणून स्वीकारली आहे. खरंतर हा वस्त्रप्रकार भारतीय उपखंडाची सांस्कृतिक ओळख आहे. साडी किंवा सारी या शब्दाची व्युत्पत्ती ‘सत्तिका’ या प्राकृत शब्दापासून झाल्याचे मानले जाते. प्राचीन जातक कथांमध्ये स्त्रियांच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका किंवा सत्तिका या शब्दाचा उल्लेख सापडतो. तर काही अभ्यासक ‘चिरा’ (कापड) या संस्कृत शब्दापासून साडी शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे मानतात. भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या सर्व देशांमध्ये साडी सांस्कृतिक पेहराव म्हणून परिधान केली जाते.
महिलांच्या साडीवर घाला
पाकिस्तानमध्येही काही प्रमाणात साडी नेसली जाते. परंतु, सलवार-कमीज हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय पेहराव आहे. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावरही पाकिस्तानातील महिला वर्गात भारतीय स्त्रियांप्रमाणे साडीलाच पसंती देण्यात आली होती. असे असतानाही देशाची सांस्कृतिक ओळख भारतापासून वेगळी ठेवण्याकरिता महिलांच्या साडीवर घाला घालण्यात आला.
अघोषित बंदी
पाकिस्तानमध्ये साडी नेसण्यावर अधिकृतपणे कोणतीही कायमची कायदेशीर बंदी घालण्यात आली नव्हती आणि नाही. परंतु, १९७० आणि १९८० च्या दशकात लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक याच्या राजवटीत साडी नेसण्यावर अघोषित किंवा अप्रत्यक्ष बंदी (Restrictions) घालण्यात आली होती.
लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक कोण होते?
जनरल मुहम्मद झिया-उल-हक हे पाकिस्तानचा लष्करप्रमुख आणि सहावे राष्ट्रपती (हुकूमशहा) होते. त्यांनी १९७७ ते १९८८ अशी सलग ११ वर्षे पाकिस्तानवर राज्य केले. झिया-उल-हक पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो (बेनझीर भुट्टो यांचे वडील) यांना कनिष्ठ होते. तरी त्यांनी १९७६ साली इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून झिया-उल-हक यांना लष्करप्रमुख (Chief of Army Staff) केले. १९७७ साली पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन ५ जुलै १९७७ रोजी जनरल झिया यांनी ‘ऑपरेशन फेअर प्ले’ (Operation Fair Play) अंतर्गत लष्करी बंड केले आणि भुट्टो सरकार उलथवून टाकून देशात ‘मार्शल लॉ’ (लष्करी कायदा) लागू केला.

पाकिस्तानचे इस्लामीकरण
सत्तेवर आल्यानंतर झिया यांनी माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर एका राजकीय हत्येचा खटला चालवला. आंतरराष्ट्रीय विरोध असतानाही ४ एप्रिल १९७९ रोजी भुट्टो यांना फाशी देण्यात आली. झिया-उल-हक याच्या राजवटीत पाकिस्तानचे इस्लामीकरण करण्यावर भर देण्यात आला. आपल्या सत्तेला जनतेचा आणि धार्मिक नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी झिया-उल-हक यांनी ‘शरिया’ कायदे लागू केले. पारंपरिक इस्लामिक गुन्हेगारी कायदे लागू केले त्यांना ‘हुदूद अध्यादेश’ म्हटले जाते.
साडीला का विरोध करण्यात आला?
जनरल झिया-उल-हक यांनी १९७७ साली सत्तेवर आल्यानंतर साडी हा पेहराव भारतीय (हिंदू) संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो; तो ‘इस्लामिक’ किंवा पाकिस्तानी नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी महिलांना सलवार-कमीज घालण्याचे आणि दुपट्टा घेण्याचे आवाहन केले. झिया प्रशासनाने साडीवर आक्षेप घेताना दोन मुख्य मुद्दे पुढे केले होते.
पहिला म्हणजे, ‘सतर’चा (शरीर झाकणे) नियम: इस्लामिक कायद्यानुसार महिलांचे संपूर्ण शरीर झाकलेले असणे आवश्यक आहे. साडी नेसल्यानंतर पोट, कंबर आणि पाठीचा काही भाग उघडा दिसतो. झिया राजवटीने याला ‘उथळपणा’ आणि ‘अश्लीलता’ ठरवले.
दुसरा म्हणजे, सांस्कृतिक शुद्धता: झिया-उल-हक यांना पाकिस्तानमधून उपखंडाची सामायिक (हिंदू-मुस्लिम) संस्कृती पुसून टाकायची होती. साडी हा प्रामुख्याने भारतीय आणि हिंदू महिलांचा पेहराव आहे, असा प्रचार करून तो पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात असल्याचा भास निर्माण करण्यात आला.
सरकारी नोकरदार आणि टीव्ही अँकर्सवर निर्बंध
सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी आणि शाळा-कॉलेजांमधील शिक्षिकांना साडी नेसून येण्यास मनाई करण्यात आली. त्यांच्यासाठी सलवार-कमीज अनिवार्य करण्यात आले. त्या काळात पाकिस्तान टेलिव्हिजनवर (PTV) काम करणाऱ्या महिला वृत्तनिवेदिका (News Anchors) आणि अभिनेत्रींना साडी नेसण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. त्या काळात पाकिस्तानमध्ये ‘पीटीव्ही’ (Pakistan Television) ही एकच सरकारी टीव्ही वाहिनी होती. झिया सरकारने वाहिनीचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी केला. नजमा शफीक आणि माहेपारा सफदर यांसारख्या प्रसिद्ध महिला वृत्तनिवेदिका (News Anchors) साडी नेसण्यासाठी प्रसिद्ध होत्या. पण त्यांना अचानक सांगण्यात आले की, त्यांनी साडी नेसणे बंद केले नाही आणि डोक्यावर हिजाब घेतला नाही, तर त्यांना ऑन-एअर (टीव्हीवर) येऊ दिले जाणार नाही. अनेक अभिनेत्रींना साडी नेसून नाटक किंवा गाण्यांचे शूटिंग करण्याची परवानगी नाकारली गेली. जुन्या कार्यक्रमांची पुनर्निर्मिती करतानाही साडी परिधान केलेली दृश्ये एडिट (कापली) केली जात असत.
कॉर्पोरेट आणि डिप्लोमॅटिक क्षेत्रातील निर्बंध
पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या (पीआयए-PIA-Pakistan International Airlines) एअरहोस्टेसचा युनिफॉर्म आधी साडी होता (विशेषतः ६० आणि ७० च्या दशकात). झिया याच्या काळात तो बदलून सक्तीने सलवार-कमीज आणि डोक्यावर हिजाब असा करण्यात आला. परदेशात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला राजनैतिक अधिकाऱ्यांना किंवा परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या महिला प्रतिनिधींना अधिकृत कार्यक्रमांमध्ये साडी नेसण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
बेगम राना लियाकत अली खान यांनी केलेला विरोध
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी बेगम राना लियाकत अली खान या पाकिस्तानातील महिला हक्कांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्या नेहमी अतिशय अभिमानाने साडी नेसत असत. झिया-उल-हक सरकारने साडीवर निर्बंध आणल्यानंतर बेगम राना यांनी उघडपणे या हुकूमाचा निषेध केला. त्यांनी जाहीर केले की, “साडी हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.” त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत मुद्दाम साडी नेसून हजेरी लावली आणि झिया याच्या हुकूमशाहीला आव्हान दिले.

कलाकारांचा ‘साडी’द्वारे मूक निषेध
पाकिस्तानच्या प्रसिद्ध गझल गायिका इक्बाल बानो यांनी १९८५ साली लाहोरमध्ये जनरल झिया-उल-हक सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी मुद्दाम काळी साडी नेसून फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध क्रांतिकारी गझल ‘हम देखेंगे’ गायली होती. इक्बाल बानो यांच्या व्यतिरिक्त, पाकिस्तानातील अनेक नामवंत महिला लेखिका, कवयित्री आणि कार्यकर्त्या (उदा. फहमिदा रियाज, किशोर नाहिद) खाजगी बैठकांमध्ये आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यक्रमांमध्ये मुद्दाम साडी नेसून जात असत. त्या काळात पाकिस्तानात साडी नेसणे ही केवळ फॅशन राहिली नव्हती, तर ती ‘बंडखोरी’ आणि ‘लोकशाहीच्या समर्थनाचे’ प्रतीक ठरली. म्हणूनच, १९८८ साली झिया-उल-हक यांचा मृत्यू झाला, तेव्हा महिलांनी पुन्हा एकदा साडी नेसून आपले स्वातंत्र्य साजरे केले होते.
संदर्भ सूची (Sources):
- Women’s Action Forum (WAF) Historical Documents on Dress Code Decrees under Gen. Zia-ul-Haq.
- Purifying the Land of the Pure by Farahnaz Ispahani.
- BBC Urdu & Dawn Newspaper Retrospective Reports on Iqbal Bano’s 1985 Lahore Performance.
