Pakistan Bangladesh defence pact भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि बांगलादेश आता संरक्षण कराराची तयारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज १८’ला दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही देश एका प्रस्तावित परस्पर संरक्षण कराराच्या (Mutual Defence Agreement) अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. राजनैतिक आणि लष्करी संबंध पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमधील हा एक मोठा बदल मानला जात आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, बांगलादेश आणि पाकिस्तानने या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी एक संयुक्त यंत्रणा तयार केली आहे. हे पाऊल दोन्ही देशामधील वाढते लष्करी सहकार्य आणि धोरणात्मक समन्वयाचे प्रतीक आहे. राजनैतिक सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशचे लष्करी नेतृत्व पाकिस्तानबरोबर अशा प्रकारचा संरक्षण करार करण्यास उत्सुक आहे. या कराराचे स्वरूप पाकिस्तानच्या सौदी अरेबियासारख्या देशांबरोबर असलेल्या संरक्षण सहकार्य करारांसारखेच असेल. काय आहे हा संभाव्य करार? भारताच्या अडचणी वाढणार का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

लष्करी सहकार्यात वाढ

कराराचा हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमधील वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव आला असून, दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सुरक्षा संबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांच्या देशांना भेटी देत आहेत. या वर्षात दोन्ही देशांच्या भूदल, वायुदल व नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यातूनच प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि व्यावसायिक देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक लष्करी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कराराचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, याचा अंतिम मसुदा बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांनंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील सरकार या कराराचा अधिकृतपणे आढावा घेऊन त्याला मान्यता देऊ शकते.

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बदललेली समीकरणे

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. गेली अनेक वर्षं मर्यादित असलेले राजनैतिक मार्ग आणि लष्करी सहकार्य पुन्हा सुरू करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पावले उचलली गेली आहेत. दुसरीकडे, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. एका वरिष्ठ राजनैतिक सूत्राने सांगितले की, किमान आठ देशांनी पाकिस्तानबरोबर अशाच प्रकारच्या धोरणात्मक आणि संरक्षण करारांमध्ये स्वारस्य दाखवले आहे.

भारतासाठी चिंतेचे कारण काय?

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशातील नवीन नेतृत्वाशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे स्वागत करणाऱ्या पहिल्या देशांपैकी पाकिस्तान एक होता. या दोन्ही देशांमधील वाढत्या मैत्रीमुळे बांगलादेशात कट्टरतावाद वाढण्याची भीती पुन्हा निर्माण झाली आहे.

  • आयएसआय प्रमुखांची भेट : या वर्षाच्या सुरुवातीला आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांनी बांगलादेशचा दौरा केला होता. अनेक दशकांनंतर पाकिस्तानी गुप्तचर प्रमुखाचा हा पहिलाच बांगलादेश दौरा होता. त्यामुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
  • बांगलादेशमध्ये विशेष सेल : ताज्या वृत्तांनुसार, पाकिस्तानने बांगलादेश येथील आपल्या उच्चायुक्तालयात एक विशेष आयएसआय सेल स्थापन केला आहे. पाकिस्तानचे ‘चेअरमन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’ जनरल साहीर शमशाद मिर्झा यांच्या चार दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर हा सेल कार्यान्वित झाल्याची माहिती आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

ज्येष्ठ पत्रकार सुबीर भौमिक यांच्या मते, “भारताची मुख्य चिंता ही आहे की, पाकिस्तान किंवा लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटना भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आणि पुन्हा तिथे आश्रय घेण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा वापर करू शकतात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारत आणि बांगलादेश यांच्यात संघर्ष होऊ शकतो, ज्याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल.” ‘मंत्राया इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’च्या संस्थापक शांती मॅरिएत डिसूझा यांनी सांगितले की, बांगलादेश- पाकिस्तान संबंधांतील हा बदल भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षेसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

भारतीय विश्लेषकांच्या मते, जर असा करार प्रत्यक्षात आला, तर भारताच्या पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही सीमांवरून दबावाची शक्यता निर्माण होईल. सध्या भारताने प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीन सीमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, बांगलादेशच्या लष्करी समावेशामुळे भारताला आपली संसाधने आणि सुरक्षा यंत्रणा यांची पुन्हा नव्याने आखणी करावी लागेल.

१९४८, १९६५ व १९७१ च्या युद्धांमध्ये भारताने एकाच वेळी दोन्ही बाजूंनी दबाव अनुभवला होता. १९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाल्याने पूर्वेकडील धोका संपुष्टात आला होता. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी मैत्री भारतासाठी पुन्हा एकदा जुन्या आव्हानांना उजाळा देणारी ठरू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे.