Pakistan Terrorism : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (KP) प्रांतात शांततेसाठी निघालेल्या मोर्चालाच रक्तरंजित वळण लागले. स्वात खोऱ्यातील काबाल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वात पीस रॅली’दरम्यान झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान १७ जणांचा मृत्यू झाला; तर दोन डझनहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये सामान्य नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दहशतवादाच्या वाढत्या घटनांविरोधात आणि स्वात खोऱ्यात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी स्थानिक आदिवासी संघटना ‘स्वात अमन जिरगा’ने या मोर्चाचे आयोजन केले होते. आंदोलक पोलीस ठाण्याजवळ शांततेच्या मार्गाने जमले असतानाच आत्मघाती हल्लेखोराने स्वतःलाच बॉम्बने उडवले.

पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. २०२६ हे वर्ष पाकिस्तानसाठी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरले आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने ३१ जुलै रोजी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात देशभरात ३,१४५ दहशतवादी घटना घडल्या. त्यापैकी १,९७१ घटना एकट्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात घडल्या आहेत.

जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत दहशतवादी हल्ल्यांमध्ये ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३०० पेक्षा जास्त सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे काही वर्षांपासून या प्रांतात शांततेसाठी वारंवार जन आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. या संघर्षाचा परिणाम केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित नसून, त्याचे पडसाद दक्षिण आशियाच्या भूराजकारणावरही उमटताना दिसत आहेत. ते कसे? जाणून घेऊया सविस्तर…

स्वात खोऱ्यात शांततेसाठी ‘अमन लष्कर’ची चळवळ का सुरू झाली?

खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात खोरे हे एकेकाळी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेचे प्रमुख केंद्र मानले जात होते. २००७ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील लष्करी कारवाईनंतर अनेक अतिरेकी गट एकत्र येऊन तेहरीक-ए-तालिबानची स्थापना झाली.

टीटीपी ही संघटना पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखली जाते. पाकिस्तानचे लोकशाही सरकार उलथवून इस्लामी कायद्यावर आधारित शासन स्थापन करण्याचा या संघटनेचा उद्देश आहे. या उद्दिष्टासाठी टीटीपीने पाकिस्तानी लष्करावर हल्ले, राजकीय नेत्यांच्या हत्या आणि नागरिकांवर दहशतवादी कारवाया केल्या.

या वाढत्या हिंसाचारानंतर २००८-०९ पासून खैबर पख्तूनख्वामध्ये ‘अमन लष्कर’ (म्हणजेच शांतता दल) या नावाने शांतता मोर्चे आणि जन-आंदोलने सुरू झाली. हजारो नागरिकांनी या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला आणि दहशतवादाला आळा घालावा, तसेच सरकारने या प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करावी, अशी मागणी लावून धरली.

संशोधक अंचिता बोर्थाकूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, हे शांतता मोर्चे महत्त्वाचे आहेत. कारण- ते पश्तून या (खैबर पख्तूनख्वा आणि पूर्व अफगाणिस्तानातील प्रमुख वांशिक समुदाय) स्वभावतः हिंसक किंवा शांततेच्या विरोधात असलेल्या प्रचलित गैरसमजाला आव्हान देतात. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा केवळ पाकिस्तानी लष्कराचा अजेंडा नाही, तर स्थानिक पश्तून नागरिकांचीही तशी आग्रही मागणी आहे, हे या मोर्चांमधून अधोरेखित होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत स्वात खोऱ्यात पुन्हा दहशतवादी संघटनांच्या हालचाली वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीटीपी पुन्हा या भागात आपले जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वारंवार तालिबानविरोधी मोर्चे काढले आहेत. रविवारी झालेली ‘स्वात पीस रॅली’देखील याच मोर्चांचा भाग होती.

दहशतवादविरोधी कारवाया आणि स्थानिकांचा विरोध

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत खैबर पख्तूनख्वामध्ये अनेक मोठ्या लष्करी कारवाया केल्या. ऑपरेशन झर्ब-ए-अझ्ब (२०१४-१६), ऑपरेशन खैबर (२०१४-१७) व ऑपरेशन अझ्म-ए-इस्तेहकाम (जून २०२४ पासून सुरू) या प्रमुख मोहिमा राबविण्यात आल्या. या लष्करी मोहिमांमध्ये हजारो दहशतवादी आणि सुरक्षा दलातील जवानांचा मृत्यू झाला.

या कारवायांमुळे अनेक गावांतील नागरिकांना घरे सोडावी लागली; तर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक नागरिक अनेकदा अशा लष्करी मोहिमांना विरोध करताना दिसतात.

अफगाणिस्तानातील बदलानंतर आणखी बिघडली परिस्थिती

ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील ड्युरंड रेषेवर तणाव वाढला आहे. या सीमेवर वारंवार चकमकी आणि दहशतवादी हल्ले होत असून, हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अफगाणिस्तान आजही ड्युरंड रेषेला अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा मानत नाही. तसेच, सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या पश्तून समाजामध्ये आजही मजबूत कौटुंबिक, सामाजिक आणि आदिवासी संबंध आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांना या भागात हालचाली करणे तुलनेने सोपे जाते.

संशोधक अंचिता बोर्थाकूर यांच्या मते, पाकिस्तानने टीटीपीविरोधात कठोर लष्करी कारवाया सुरू केल्या असल्या तरी हल्ले कमी झालेले नाहीत. कारण- ड्युरंड रेषेच्या दोन्ही बाजूंना असलेले सामाजिक, आदिवासी आणि कौटुंबिक संबंध टीटीपीला सुरक्षित आश्रय, हालचाली आणि स्थानिक पातळीवरील पाठबळ मिळवून देतात. त्यामुळे या संघटनेची ताकद अद्याप कायम असल्याचे त्या सांगतात.

खैबर पख्तूनख्वामधील असंतोषामागे केवळ दहशतवाद नाही, तर दारिद्र्य आणि विकासाचा अभाव हेही महत्त्वाचे कारण मानले जाते. २०२६ च्या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसनुसार, तीव्र अन्नटंचाईचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगातील १० देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. त्यात खैबर पख्तूनख्वा हा सर्वाधिक प्रभावित प्रांतांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (UNDP) बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार, या प्रांतातील जवळपास ४८ टक्के लोकसंख्या गरिबीत जगत आहे.

दक्षिण आशियासाठी हा प्रश्न महत्त्वाचा का?

सध्या अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. असे असताना देशांतर्गत वाढणारा हिंसाचार आणि त्यात नागरिकांचा बळी जाणे, हे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी आव्हान ठरू पाहत आहे.

खैबर पख्तूनख्वा हा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC)चा महत्त्वाचा भाग आहे. येथे चीनच्या मदतीने उभारण्यात आलेले सुकी-किनारी जलविद्युत प्रकल्प, हजारा एक्स्प्रेसवे, काराकोरम महामार्ग व रशाकाई विशेष आर्थिक क्षेत्र यांसारखे मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे या भागातील अस्थिरतेचा परिणाम या गुंतवणुकींच्या सुरक्षेवरही होऊ शकतो.

दुसरीकडे अफगाणिस्तान आधीच दारिद्र्य आणि अन्नटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत खैबर पख्तूनख्वामधील अस्थिरतेचे पडसाद संपूर्ण प्रदेशावर उमटण्याची शक्यता आहे. भारतही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सीमावर्ती भागातील सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या दृष्टीने परिस्थितीवर नजर ठेवत आहे.