भारताकडून अमेरिका, ब्रिटनपर्यंत मारा होऊ शकेल, अशा अतिदीर्घ पल्ल्याच्या सूर्या या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा विकास होत असल्याचा दावा एका पाकिस्तानी संरक्षण विश्लेषकाने केल्यामुळे भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय भूराजनीतीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकणारे वॉरहेड्सचे प्रकार आणि श्रेणी कोणत्याही राष्ट्राचे प्रभावक्षेत्र अधोरेखीत करते.

पाकिस्तानी विश्लेषकाचा दावा काय?

भारताकडून ‘सूर्या’ नामक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार केले जात आहे. ते पश्चिमेकडील अमेरिका, ब्रिटनपर्यंत मारा करू शकेल, असा दावा इस्लामाबादस्थित कायद-ए-आजम विद्यापीठाच्या राजकारण व आंतरराष्ट्रीय संबंध विभागातील प्रा. जफर नवाज जसपाल यांनी केला आहे. प्रस्तावित सूर्या (आयसीबीएम) क्षेपणास्त्राचा पल्ला १० ते १२ हजार किलोमीटर आहे. याचाच अर्थ अमेरिकाही भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येईल. भारताची या श्रेणीची क्षेपणास्त्र निर्मिती अमेरिका, युरोप व रशियासाठी चिंतेचा विषय ठरायला हवा. कारण सध्या भारताकडे जी क्षेपणास्त्रे आहेत, त्यातून तो पाकिस्तानच्या कुठल्याही भागात, तसेच चीनच्या बहुतेक भागांत कधीही मारा करू शकतो, याकडे जसपाल लक्ष वेधतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

हेही वाचा >>> विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?

संभ्रम का निर्माण होतोय?

पाकिस्तानी संरक्षण विश्लेषकांनी केलेला दावा नवीन नाही. दोन ते अडीच दशकांपासून भारताच्या सूर्या नामक क्षेपणास्त्राविषयी जगात चर्चा घडत आहे. १९९५ मध्ये अण्वस्त्र प्रसारविरोधी पुनरावलोकनात त्याविषयीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. परंतु, त्याची पुष्टी झाली नाही, असे शस्त्रास्त्र नियंत्रण संघटनेचे म्हणणे आहे. अग्नी – ५ च्या चाचणीनंतर चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासात भारताने संयुक्त राष्ट्राच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आक्षेप घेतला होता. काही विश्लेषकांना अग्नी – ६ ही पुढील आवृत्ती १० हजार किलोमीटर मारक क्षमतेचा पल्ला गाठणारी वाटते. विविध स्तरावरील चर्चेने संभ्रमात भर पडते.

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम…

१९८० च्या दशकात शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत अग्नी क्षेपणास्त्रावर काम सुरू झाले. अग्नी – १ या ८०० किलोमीटरच्या मारक क्षमतेने सुरू झालेला प्रवास अग्नी – ५ द्वारे साडेपाच हजार किलोमीटरवर पोहोचला आहे. अग्नी – २ हे दोन हजार किलोमीटर, अग्नी – ३ अडीच हजार किलोमीटर, अग्नी – ४ हे चार हजार किलोमीटर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या इतिहासात अग्नी – ५ हे सर्वाधिक दूरवर म्हणजे साडेपाच हजार किलोमीटरवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नीच्या पहिल्या दोन आवृत्त्यांसाठी रस्ता व रेल्वेतून डागण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे जलदपणे ती कुठूनही डागता येतील. साडेपाच हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हटले जाते. अग्नी – ५ द्वारे तो टप्पा जवळपास गाठला गेला आहे.

हेही वाचा >>> हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?

संरक्षणात्मक क्षमता कशी वाढतेय?

सामरिक गरजांच्या दृष्टीने संरक्षणात्मक क्षमता वाढविण्यावर देशाचे लक्ष आहे. चीनचा विस्तारवादी दृष्टिकोन, ध्वनिहून पाचपट अधिक वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा विकास, त्याच्या भात्यातील डोंगफेंग – ४१ सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, पाकिस्तानला पुरविले जाणारे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आदींचा विचार करीत आयुधांचा विकास होत आहे. चीनची भारतातील कुठल्याही शहरावर क्षेपणास्त्र हल्ल्याची क्षमता आहे. या परिस्थितीत संपूर्ण चीन माऱ्याच्या टप्प्यात आणण्याच्या दृष्टीने अग्नीची मारक क्षमता वाढवली गेली. अग्नी – ५ च्या टप्प्यात बीजिंगसह चीनचा बराचसा भाग, जवळपास संपूर्ण अशिया खंड व युरोपातील काही भाग येतो. अण्वस्त्र सक्षम तीन टप्प्यातील घन इंधनावर आधारित ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्यामध्ये एकाच वेळी १० लक्ष्यांवर अण्वस्त्र व स्फोटके डागण्याचे तंत्रज्ञान आहे. अग्नी – ६ आणि अग्नी – ७ द्वारे आठ ते १० हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. परंतु, अधिकृतपणे तशी स्पष्टता झालेली नाही. काही वर्षांपूर्वी माजी हवाई दल प्रमुख प्रदीप नाईक (निवृत्त) यांनी आण्विक प्रहार क्षमता शेजारील राष्ट्रांच्या पलीकडे विस्तारण्याचा युक्तिवाद केला होता.

सामरिक समानता का महत्त्वाची ठरते?

लांब पल्ल्याची आण्विक सक्षम क्षेपणास्त्रे ही सामरिक शस्त्रे आहेत. म्हणजे या शस्त्राच्या वापराचे संभाव्य परिणाम शत्रूला भयग्रस्त करतील, शिवाय प्रतिरोधनाचे काम करतात. कुणी हल्ला केल्यास त्याला तसेच प्रत्युत्तर देण्याची जाणीव करून देतात. आंतरराष्ट्रीय भूराजनीतीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका निभावतात. सध्या रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन व फ्रान्स हे पाच देश आपल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी पृथ्वीतलावरील कुठलेही लक्ष भेदू शकतात. युक्रेनियन सैन्याच्या प्रतिकाराला तोंड देणाऱ्या रशियाने मध्यंतरी आरएस-२८ सरमत या आण्विक सक्षम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावरील लक्ष्य भेदू शकते, असे सांगितले गेले. दोन वर्षांपूर्वी उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या हासंग – १७ या आयसीबीएम क्षेपणास्त्राची चाचणी करीत अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांशिवाय भारत प्रादेशिक संदर्भातून बाहेर पडू शकणार नाही, असा एक मतप्रवाह आहे. याकरिता चीनला या क्षेपणास्त्रांनी अमेरिका व रशिया यांच्याशी सामरिक समानता प्राप्त करून दिल्याचा दाखला दिला जातो. भविष्यात भारतासमोर प्रभावक्षेत्र विस्तारून सामरिक समानता साधण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Story img Loader