Pakistan’s Use of ‘Rape as a Weapon’ in 1971: १९७१ साली वसंत ऋतू उंबरठ्यावर होता, परंतु ढाका मात्र धुराने झाकोळलेल्या एका दुःखद स्वप्नासारखं दिसत होतं. एका उध्वस्त गल्लीच्या शेवटी, आगीने काळवंडलेल्या भिंतींमधून निघणारा धूर आकाशात मिसळत होता आणि त्या धुरात एका आईचा हृदयद्रावक आक्रोश विरघळत चालला होता. तीन दिवसांपासून तिची चौदा वर्षांची मुलगी बेपत्ता होती. कुणीतरी थरथरत्या आवाजात तिला म्हणाले, “सैनिक घेऊन गेले तिला …” ती आई गुडघ्यांवर कोसळली. पण, तिचा आवाज त्या भग्न शहराच्या वेदनेपुढे हरवून गेला. त्या काळात ढाक्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये अशाच अनेक असंख्य किंकाळ्या उठत होत्या आणि रक्त, राख आणि दहशतीच्या वादळात विरत होत्या. १९७१ साली पाकिस्तान-बांगलादेशमध्ये झालेलं केवळ युद्ध नव्हतं (Bangladesh Liberation War); तर ते स्त्रीदेहावर केलेले नियोजित, पद्धतशीर अत्याचार होते. एका संपूर्ण प्रदेशाचे मनोधैर्य मोडण्याचा अघोरी प्रयत्न होता. आज बांगलादेश स्वतंत्र आहे, पण त्या काळाच्या वेदना आजही तिथल्या मातीत मूक आक्रंदत आहेत.
१. पार्श्वभूमी: पाकिस्तानची दडपशाही आणि ‘ऑपरेशन सर्चलाइट’
१९७० च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु पश्चिम पाकिस्तानातील लष्करी नेतृत्व (विशेषतः जनरल याह्या खान आणि झुल्फिकार अली भुट्टो) यांनी सत्ता हस्तांतरण नाकारले. त्यामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिक, विद्यार्थी आणि बुद्धिजीवी आंदोलन करू लागले. या आंदोलनाला चिरडण्यासाठी पाकिस्तानने २५ मार्च १९७१ रोजी ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरू केले गेले.
या ऑपरेशनचा प्राथमिक उद्देश:
- पूर्व पाकिस्तानातील बुद्धिजीवींची हत्या
- पूर्व पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व संपवणे
- हिंदूंवर लक्ष केंद्रित करून दहशत निर्माण करणे
- आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे..स्त्रियांवर अत्याचार करून जनतेचे मनोधैर्य मोडून टाकणे
गॅरी जे. बास आपल्या Pulitzer नामांकित पुस्तक The Blood Telegram मध्ये लिहितात:
“The Pakistani army did not see Bengali women as civilians. They saw them as instruments of humiliation.” (Bass, 2013)
“पाकिस्तानी सैन्य बंगाली महिलांकडे सामान्य नागरिक म्हणून पाहत नव्हते; त्यांच्या दृष्टीने त्या महिला या मनोधैर्य खच्चीकरण्याचे साधन होत्या.”

२. बलात्कार: ‘Weapon of War’
१९७१ मधील बलात्कार हे अनियंत्रित हिंसाचार नव्हते, तर एका ठरवून आखलेल्या लष्करी धोरणाचा भाग होते. महत्वाच्या स्त्रोतांनुसार, २,००,००० ते ४,००,००० महिलांवर बलात्कार झाले.
Susan Brownmiller, जगप्रसिद्ध फेमिनिस्ट लेखिका, Against Our Will (1975) मध्ये म्हणतात, “Between 200,000 and 400,000 Bangladeshi women were raped by Pakistani soldiers during 1971.” (Brownmiller, 1975) (१९७१ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी २,००,००० ते ४,००,००० बांगलादेशी महिलांवर बलात्कार केला.)
- बलात्कारासाठी छावण्या (rape camps) उभारण्यात आल्या
Yasmin Saikia (Women, War and the Making of Bangladesh, 2011) यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सैन्याने,
- अटक केलेल्या महिलांना लष्करी छावण्यांमध्ये ठेवले
- रोज त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला
- गर्भवती झाल्यानंतरही त्यांची सुटका केली नाही
- हिंदू महिलांना विशेष लक्ष्य केले
‘Razakar’ आणि ‘Al-Badr’ मिलिशिया हे स्थानिक सहयोगी दल पाकिस्तानी सैनिकांसाठी महिलांना खेचून आणत होते.
३. प्रत्यक्ष साक्षीदारांचे वर्णन: जग हादरवणाऱ्या नोंदी
Anthony Mascarenhas – ‘Genocide’ रिपोर्ट (1971)
ब्रिटिश पत्रकार अँथनी मसकेरॅन्हस यांनी UK Sunday Times मध्ये लिहिलेल्या ‘Genocide’ लेखामुळे जगाला पहिल्यांदा पाकिस्तानने केलेल्या अत्याचारविषयी समजले.
ते लिहितात:
“Rape was used systematically to terrorize the population. No woman, young or old, Hindu or Muslim, was safe.” (Mascarenhas, 1971) (जनतेमध्ये दहशत पसरवण्यासाठी बलात्काराचा पद्धतशीरपणे वापर केला गेला. तरुण असो वा वृद्ध, हिंदू असो वा मुस्लीम… एकही स्त्री सुरक्षित नव्हती.)
International Commission of Jurists (ICJ) Report
- International Commission of Jurists (ICJ) Report मध्ये बलात्काराला organized terror नियोजित दहशतवाद म्हटले आहे.
- अनेक गावांमध्ये ‘mass rape followed by mass killings’ नोंदलेले गेले आहे. (सामूहिक बलात्कारानंतर सामूहिक हत्या करण्यात आल्या)
Blood Telegram
अमेरिकेचे वाणिज्यदूत आर्चर ब्लड यांनी पाठवलेल्या ‘Blood Telegram’मध्ये त्यांनी म्हटले होते की, “The atrocities by the Pakistani army include widespread killing and rape.” (Blood Telegram, 1971) (पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्या आणि बलात्काराचा समावेश होता.)
४. हिंदू महिला विशेष लक्ष्य
इतिहासकार सरमिला बोस (Dead Reckoning) आणि यास्मिन साइकिया यांच्या नोंदींनुसार,
- हिंदू महिलांना ‘Indian agents’ म्हणून पाहिले जात होते
- त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचे प्रमाण अधिक होते
- काही गावांमध्ये ‘systematic abduction lists (पूर्वनियोजित अपहरण याद्या)’ तयार केल्या गेल्या.
५. गर्भधारणा आणि युद्धात जन्मलेली मुले
बहुतांश आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार:
- या बलात्कारामुळे हजारो स्त्रिया गर्भवती झाल्या
- १९७१ च्या अखेरीस अंदाजे २५००० ते ३०००० मुले जन्मली
- यापैकी अनेक मुलांना पाश्चात्त्य देशांमध्ये दत्तक दिले गेले
- बांगलादेशाने पीडित महिलांना ‘Birangona’ (वीरांगना) हा सन्मान दिला
६.पाकिस्तानी नेतृत्वाची भूमिका: आदेश कोणी दिले?
गॅरी बास, ओवेन बेनेट जोन्स आणि सुसन ब्राउनमिलर यांनी केलेल्या सखोल अभ्यास आणि सविस्तर नोंदींनुसार, १९७१ मधील अत्याचार हे सैनिकांच्या मनमानीचे नव्हते, तर पाकिस्तानी वरिष्ठ नेतृत्वाच्या स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष संमतीने झालेली नियोजित मोहीमच होती.
- जनरल याह्या खानचे कुख्यात उद्गार:
“I will kill three million of them and let the rest go to India.”
(Bass, 2013) - मेजर जनरल राव फारमान अली यांच्या वैयक्तिक डायरीमध्ये बंगाली जनता, विशेषतः हिंदू समुदाय आणि राजकीय कार्यकर्त्यांविषयी असलेला तीव्र द्वेष आणि कार्यवाहीचे आदेश स्पष्ट दिसून येतात.
- सेना प्रमुख टिक्का खान, जे नंतर ‘Butcher of Bengal’ (बंगालचा कसाई) म्हणून ओळखले गेले, यांनी पूर्व पाकिस्तानात दहशत निर्माण करण्यासाठी कठोर दडपशाहीच्या नीति अवलंबल्या.
या सर्व नोंदी सुचवतात की, १९७१ मधील अत्याचार हे स्वतःहून उफाळून आलेली हिंसा नव्हती. ती होती विचारपूर्वक आखलेली, नियोजनपूर्वक अंमलात आणलेली, लष्करी पातळीवरील मोठ्या प्रमाणातील अत्याचार मोहीम होती. बंगाली जनतेचे मनोधैर्य पूर्णतः मोडणे हा त्या मोहिमेचा उद्देश होता.
७. भारताची भूमिका आणि शरणार्थी संकट
पाकिस्तानी अत्याचारांमुळे:
- १ कोटीहून अधिक विस्थापित भारतात आले
- हजारो महिला बलात्कारापासून वाचण्यासाठी पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामध्ये पळून आल्या
- भारतीय सैन्याने आणि सरकारने या संकटाची गंभीर नोंद घेतली
त्यामुळेच, भारताने ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानविरुद्ध या युद्धात प्रवेश केला. भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानातील नरसंहाराला पूर्णविराम देण्यासाठी आणि लाखो निरपराध बंगालींच्या रक्षणासाठी निर्णायक कारवाई केली. शेवटी, १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यात पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. हा दिवस आजही विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या क्षणी बंदुकींचा आवाज थांबला, परंतु हजारो बलात्कारित महिलांच्या वेदना मात्र शांत झाल्या नाहीत. त्या जखमा आजही जिवंत आहेत.
८. युद्धानंतरची कारवाई
- ९३,००० पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यात आले.
१९७१ च्या युद्धानंतर भारताने इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धकैद्यांचा गट… सुमारे ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना कैद केले. - बांगलादेशचे युद्धगुन्हे खटले:
स्वातंत्र्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानी सैन्याच्या युद्धगुन्ह्यांवर स्वतंत्र खटले सुरू करण्याची प्रक्रिया आरंभ केली. - १९७४ चे ‘Tripartite Agreement’ आणि मोठ्या प्रमाणावर माफी:
भारत- पाकिस्तान- बांग्लादेश यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे पाकिस्तानला व्यापक राजनैतिक माफी मिळाली. परिणामी, पाकिस्तानच्या अधिकृत लष्करी अधिकाऱ्यांवर अपेक्षित प्रमाणात खटले चालवले गेले नाहीत. - २०१० नंतर बांगलादेशातील कारवाई:
पाकिस्तानी सैन्य थेट न्यायालयासमोर उभे राहू शकले नाही, तरी बांगलादेशाने २०१० नंतर स्थानिक सहयोगी Razakar, Al-Badr, आणि Al-Shams या दहशतवादी मिलिशिया गटांच्या सदस्यांवर कठोर कारवाई सुरू केली. यापैकी अनेकांना मानवतेविरुद्ध गुन्हे, सामूहिक हत्या, आणि लैंगिक अत्याचारांसाठी सहकार्य यांसारख्या आरोपांखाली शिक्षा झाली.

९. आजही ही जखम जिवंत का आहे?
- पाकिस्तानने आजपर्यंत अधिकृत माफी मागितली नाही
- पीडित महिलांवर आजही कलंक आहे
यास्मिन साइकिया लिहितात:
“It was not just the rape of women. It was the rape of a nation.”
(Saikia, 2011)
संदर्भ/References
Bass, G. J. (2013). The Blood Telegram: Nixon, Kissinger, and a Forgotten Genocide. New York: Knopf.
Bose, S. (2011). Dead Reckoning: Memories of the 1971 Bangladesh War. C. Hurst.
Brownmiller, S. (1975). Against Our Will: Men, Women and Rape. New York: Bantam.
Mascarenhas, A. (1971). The Rape of Bangla Desh. Vikas Publications.
Saikia, Y. (2011). Women, War and the Making of Bangladesh: Remembering 1971. Duke University Press.
International Commission of Jurists. (1972). The Events in East Pakistan.
Blood, A. (1971). The Blood Telegram. US Consulate, Dhaka.
