हवामान बदलामुळे येणार्‍या काळात अनेक नैसर्गिक संकटांना मानवाला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे निसर्गात अनेक बदल होत आहेत. बदलत्या हवामानामुळे २०५० ते २१०० पर्यंत जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातही जगातील अनेक शहरे हवामान बदलामुळे जलमय होणार असल्याच्या मार्गावर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे अंदाज आता खरे ठरू लागले आहेत. मध्य अमेरिकन राष्ट्र पनामाच्या उत्तर किनाऱ्यापासून सुमारे १२०० मीटर अंतरावर असणार्‍या सॅन ब्लास द्विपसमूहातील गार्डी सुगडूब बेट लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नेमके कारण काय? जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांना स्थलांतरित करण्याचे कारण काय?

मध्य अमेरिकन राष्ट्र पनामाच्या उत्तर किनाऱ्याजवळील गार्डी सुगडूब बेटाला वाढत्या समुद्र पातळीचा धोका आहे. पनामा देशाचा किनारपट्टी भाग वेगाने पाण्याखाली जात आहे. त्यामुळे या किनारपट्टी भागातील रहिवाश्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम पनामा सरकारने सुरू केले आहे. पनामाने आपले पहिले बेट रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. गार्डी सुगडूब या बेटावरील गुना समुदायाच्या सुमारे ३०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. पनामाच्या पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या अभ्यासाचा अंदाज आहे की, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे २०५० पर्यंत दोन टक्के किनारपट्टी भाग पाण्याखाली जाईल. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास या देशातील इसला कारेनेरो, बसटीमेंटो आणि इतर काही भागांनाही धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीत एकूण किती पक्ष? जाणून घ्या त्यांचा इतिहास

गार्डी सुगडूब बेटावरील गुना समुदाय मासेमारी व्यवसायावर जगतो. परंतु, स्थलांतरामुळे त्यांना स्वतःच्या घरांसह व्यवसायाचा मार्गही बदलावा लागणार आहे. “आम्ही दु:खी आहोत, कारण आम्ही ज्या घरात आयुष्य घालवले ती घरे आम्हाला सोडावी लागत आहे. समुद्राशी असणारे नाते, आमचा व्यवसाय आम्हाला सोडावा लागत आहे”, असे या बेटावरील रहिवासी नादिन मोरालेस म्हणाली. पनामाच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोकांनी या बेटावरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी त्यांना बेट सोडण्यास जबरदस्ती करणार नाहीत.

हे बेट ३६६ मीटर लांब आणि १५० मीटर रुंद आहे. दरवर्षी, विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जेव्हा जोरदार वारे समुद्राला भिडतात, तेव्हा या बेटावरील रस्त्यावर पाणी तुंबते आणि लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरते. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, त्यामुळे समुद्रात जोरदार वादळे निर्माण होत आहेत. गुना समुदायाने बेटाच्या काठाला खडक वापरून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु समुद्राचे पाणी सतत आत शिरत आहे.

जगातील किनारपट्टी भागांना धोका

पनामा सरकारने या बेटावरील नागरिकांच्या वास्तव्यासाठी १२ दशलक्ष डॉलर खर्चून नवीन ठिकाणांवर घरे तयार केली आहेत, जिथे त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. स्थलांतराचे ठिकाण या बेटापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. पनामा येथील स्मिथसोनियन संस्थेच्या भौतिक निरीक्षण कार्यक्रमाचे संचालक स्टीव्हन पॅटन म्हणाले की, समुद्र पातळीत वाढ होणे, हा हवामान बदलाचा थेट परिणाम आहे. “सरासरी बेटे समुद्रसपाटीपासून फक्त अर्धा मीटर उंचीवर आहेत आणि जसजशी ही पातळी वाढत जाईल, तसतसे बेट समुद्राखाली जाईल, त्यामुळे गुना समुदायाने हे बेट लवकरात लवकर सोडायला हवे. केवळ इथेच नाही तर जगातील सर्व किनारपट्टी भागांना याचा धोका आहे.”

हेही वाचा : मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण, निमंत्रणांचे महत्त्व काय?

मेक्सिकोतील एका लहान किनारपट्टी शहरातील लोकांनी गेल्या वर्षी सातत्याने येणार्‍या वादळांमुळे शहर सोडले. पुढे ३८ हजार किंवा त्यापेक्षाही जास्त रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १.२ अब्ज खर्च येईल, असे पर्यावरण मंत्रालयाच्या हवामान बदल संचालक लिगिया कॅस्ट्रो यांनी सांगितले. जगभरातील अनेक महत्त्वाची शहरे समुद्रकिनार्‍यावर आहेत. यात भारतातील मुंबईसह जकार्ता, बँकॉक, न्यूयोर्क, ह्युस्टन, व्हेनिस या शहरांचा समावेश आहे. हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत ही शहरे पाण्याखाली जाऊ शकतात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panama evacuate 1st island due to rising sea levels rac