संपूर्ण राज्यभरात चर्चेत असलेल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामुळे माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींचे शोषण झाल्याचे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. त्याविषयी..
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण काय?
१३ एप्रिल २०२६ रोजी परतवाडा परिसरात समाज माध्यमांवर काही मुलींच्या आणि एका व्यक्तीच्या आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अयान अहमद तनवीर अहमद या १९ वर्षीय आरोपीला अटक केली. अयानने या चित्रफिती त्याच्या मित्रांना पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना बेड्या ठोकल्या.

आरोपी अयानच्या मोबाईलच्या प्राथमिक तपासणीत ८ पीडित मुलींच्या १८ चित्रफिती आणि ३९ छायाचित्रे आढळून आली आहेत. काही पीडित मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे चित्रीकरण अमरावती येथील एका भाड्याच्या खोलीत केल्याची कबुली मुख्य आरोपीने दिली आहे. या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचाही मुद्दा समोर आला.

आरोपींची कार्यपद्धती कशी?

आरोपी अयान अहमद याच्या वडिलांचा जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने अनेक महागड्या कार त्याच्याकडे होत्या. बडेजाव दाखवून त्याने अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढले. त्यातच एकांताच्या ठिकाणी नेऊन पीडित तरुणींची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती त्याने काढून ठेवल्या होत्या. यानंतर आरोपीने या चित्रफिती आपल्या मित्राच्या मोबाईलवर पाठवल्या. त्याच्या मित्राने त्या इतर दोघांच्या मोबाईलवर एका ॲपद्वारे पाठवल्या. पुढे आरोपींनी या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी पीडित मुलींना ब्लॅकमेल केले का, आर्थिक लुबाडणूक केली का, या चित्रफितींची विक्री केली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.

‘एसआयटी’ची स्थापना कशासाठी?

या प्रकरणात अद्यापही पीडित मुली किंवा त्यांच्या पालकांपैकी कुणीही तक्रार करण्यास समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने आणि पारदर्शक व्हावा, यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक गठित करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले. सहायक पोलीस अधीक्षक तथा अचलपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली १० पोलीस अधिकारी आणि ३६ अंमलदाराचे स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पथकाने गुन्ह्याचा तपास त्वरित आणि जलद गतीने पूर्ण करावा, असे आदेशात म्हटले आहे.

‘बुलडोझर’ कारवाई कशासाठी?

या प्रकरणामुळे जनक्षोभ उफाळून आला. त्यातच अचलपूर नगरपालिकेने आरोपी अयान अहमद याच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्याचे सांगून घराचा लोखंडी जिना ‘बुलडोझर’च्या सहाय्याने तोडला. पालिकेला दीड महिन्यांपूर्वीच अतिक्रमणाबाबत तसेच वाढीव बांधकामाबाबत तक्रार आली होती, असे पालिकेचे म्हणणे आहे. हे घर आरोपीच्या नातेवाईकाच्या नावाने आहे. उर्वरित बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली आहे. येत्या ३० दिवसांत योग्य कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे स्वरूप काय?

माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार, शारीरिक शोषण करणाऱ्या, अश्लील साहित्य प्रकाशित करणाऱ्या किंवा त्यामध्ये हातभार असणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि १० लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. अश्लील छायाचित्र काढणे आणि चित्रफिती तयार करणे, तशा प्रकारचे ‘एमएमएस’ तयार करणे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ते प्रसारित करणे याही गोष्टी या कायद्याच्या कक्षेत येतात. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील चित्रफितींचे वितरण, प्रचार-प्रसार रोखणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

राजकीय नेत्यांचे म्हणणे काय?

या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून यात आंतरराष्ट्रीय धागेदोरे, अमली पदार्थ आणि आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा संशय असल्याचे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. मुख्य सूत्रधार अजूनही मोकळेच असून पोलीस गुप्तचर विभागाला या गंभीर प्रकाराचा सुगावा का लागला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात मुलींच्या चित्रफिती प्रसारित होत असल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त करीत सायबर विभाग काय करीत आहे, असा प्रश्न विचारला. अनेक नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे आणि पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

mohan.atalkar@expressindia.com