तब्बल ८३ दिवसांचा कालावधी लोटला तरीही १८ व्या लोकसभेच्या आठव्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज अद्यापही ठप्प आहे. त्यामुळे संसदेच्या इतिहासातील अनिश्चित काळासाठी स्थगितीचा विक्रम या अधिवेशनाच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वीच्या दोन सर्वाधिक प्रदीर्घ स्थगिती काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाल्या होत्या. मात्र, २०१४ पासून मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर संसदेचे कामकाज इतक्या प्रदीर्घ काळापासून ठप्प असल्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन २० जुलै २०२६ रोजी सुरू झाले होते. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी ते अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. साधारणत: सत्र समाप्ती प्रक्रियेत अधिवेशनाचा औपचारिक समारोप होतो; पण अनिश्चित काळासाठीच्या स्थगितीमध्ये पुढील बैठकीची कोणतीही तारीख निश्चित न करता सभागृहाचे कामकाज थांबवले जाते. यादरम्यान संसदेच्या अधिवेशनाची अद्याप औपचारिक सत्रसमाप्ती न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे, त्याविषयी…
काँग्रेसचे केंद्र सरकावर गंभीर आरोप
डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भातील कायदेशीर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार ऐनवेळी अल्प मुदतीची नोटीस देऊन पुन्हा अधिवेशन बोलावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सरकारच्या संभाव्य योजनेबाबतचे हे दावे अद्याप केवळ तर्कवितर्क असून, त्याला संसदेच्या कोणत्याही अधिकृत निर्णयाचा आधार नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमधून केंद्र सरकावर आरोपांची राळ उठवली. संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन तब्बल ८२ दिवस उलटले, तरीही त्याची औपचारिक सत्रसमाप्ती करण्यात आलेली नाही. त्यामागचे कारण म्हणजे लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या जोरावर अत्यंत वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार अजूनही गृहमंत्र्यांच्या डोक्यात सुरू आहे. या विधेयकांमध्ये नेमके काय आहे हे अद्याप समोर आले नसले, तरी २०२९ मध्ये समोर ठाकलेल्या मोठ्या पराभवापासून भाजपाला वाचवणे, हाच यामागील स्पष्ट हेतू आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
अमित शाह यांना दिले खुले आव्हान
जयराम रमेश पुढे म्हणाले की, मतचोरीच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत गृहमंत्री जर खरोखरच गंभीर असतील, तर त्यांनी सर्वात आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा. तसेच मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची (एसआयआर) प्रक्रियाही स्थगित करावी. अर्थात, मतदारसंघ पुनर्रचनेबाबतचे नवीन प्रस्तावही त्यांनी विरोधकांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायला हवेत. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे धाडस ते का दाखवत नाहीत? असा सवालही काँग्रेस नेत्याने उपस्थित केला. दरम्यान भारतीय संविधानातील कलम ८५ नुसार राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. नियमित अधिवेशन बोलावण्यासाठी साधारणपणे १५ दिवस आधी सूचना देण्याची प्रथा आहे. मात्र, संसदेच्या नियमांनुसार दोन सलग अधिवेशनांमधील कालावधी सहा महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये. दुसरीकडे, विशेष अधिवेशन कमी कालावधीच्या सूचनेवरही बोलावता येते. एखादे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब केले असले, तरी त्याची औपचारिक सत्रसमाप्ती झालेली नसेल, तर तांत्रिकदृष्ट्या ते अधिवेशन सुरूच असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत लोकसभा अध्यक्षांना कामकाज नियमावलीतील नियम १५ नुसार अल्प सूचनेवर पुन्हा सभागृहाची बैठक बोलावता येते.
यापूर्वीच्या अधिवेशनांच्या तहकुबींचा इतिहास
लोकसभेच्या इतिहासात पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब राहण्याच्या दोन मोठ्या घटना १९८७ मध्ये बोफोर्स घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर घडल्या होत्या. त्यावेळी आठव्या लोकसभेचे आठवे अधिवेशन तब्बल ७६ दिवस औपचारिक सत्रसमाप्ती न होता सुरू राहिले होते. हे अधिवेशन २३ फेब्रुवारी १९८७ रोजी सुरू झाले होते. मात्र, बोफोर्स प्रकरणावरून सभागृहात गोंधळ झाल्याने १२ मे रोजी ते अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी नियम १५ मधील तरतुदीनुसार आपल्या अधिकारांचा वापर करत २७ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू केले. त्यामुळे सभागृहाच्या बैठकांमध्ये मोठा कालावधी गेला असला, तरी हे अधिवेशन अनेक महिने सुरू राहिले. बोफोर्स व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ३० सदस्यांची संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याचा ठराव लोकसभेने ६ ऑगस्ट रोजी मंजूर केला होता. त्यानंतर राज्यसभेनेही १२ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील ठराव मंजूर केला. या समितीमध्ये लोकसभेचे २० आणि राज्यसभेचे १० असे एकूण ३० सदस्य होते. अखेर ३ सप्टेंबर १९८७ रोजी लोकसभेच्या या अधिवेशनाची औपचारिक सत्रसमाप्ती करण्यात आली.
१९८९ मध्ये अधिवेशनाला दुसरी मोठी तहकुबी
यानंतर दोन वर्षांनी याच लोकसभेच्या चौदाव्या अधिवेशनात तिसऱ्यांदा सर्वाधिक काळ अधिवेशन तहकूब राहण्याची घटना घडली. हे अधिवेशन १८ जुलै १९८९ रोजी सुरू झाले आणि १८ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. यावेळीही बोफोर्स प्रकरणावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. या व्यवहारासंदर्भातील नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा (कॅग) अहवाल संसदेत मांडल्यानंतर विरोधी पक्षांच्या सुमारे १०० खासदारांनी एकाच वेळी राजीनामे दिले होते. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा नियम १५ मधील तरतुदीनुसार अधिकारांचा वापर करत ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू केले. मात्र, १३ ऑक्टोबर रोजी सभागृह पुन्हा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि २० ऑक्टोबर रोजी अधिवेशनाची औपचारिक सत्रसमाप्ती झाली. या घटनेनंतर काही आठवड्यांतच राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपाच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते.
एनडीए सरकारच्या काळातील दीर्घ तहकुबी
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या काळातही संसदेचे अधिवेशन दीर्घकाळासाठी अनिश्चित काळासाठी तहकूब ठेवण्याच्या घटना घडल्या होत्या. ऑगस्ट २०१५ ते १० सप्टेंबर २०१५ या कालावधीतील अधिवेशनाला २८ दिवसांची तहकुबी देण्यात आली होती, तर ११ ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत २० दिवसांसाठी अधिवेशन तहकूब करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या पावसाळी अधिवेशनाने या सर्व विक्रमांना मागे टाकले आहे. दरम्यान एम. एन. कौल आणि एस. एल. शकधर यांनी लिहिलेल्या ‘प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट’ या पुस्तकानुसार, संसदेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहाचे कामकाज एक दिवसासाठी, एकापेक्षा अधिक दिवसांसाठी किंवा अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाऊ शकते. तहकूब करण्याच्या प्रक्रियेमुळे सभागृहाची बैठक दुसऱ्या वेळेपर्यंत पुढे ढकलली जाते. सभागृहाच्या कामकाजाला अनिश्चित काळासाठी तहकुबी दिल्यानंतर पुढील बैठकीची कोणतीही तारीख निश्चित केलेली नसते. या प्रक्रियेत फक्त सभागृहाचे कामकाज थांबते; मात्र संबंधित अधिवेशन औपचारिकपणे समाप्त होत नाही.
अधिवेशनाची समाप्ती कोणाच्या आदेशाने होते?
भारतीय संविधानातील कलम ८५ (२) नुसार, संसदेच्या सत्राची अधिकृत समाप्ती केवळ राष्ट्रपतींच्या आदेशानेच होते. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती अधिवेशनाच्या औपचारिक सत्रसमाप्तीचा निर्णय घेतात. तांत्रिकदृष्ट्या सभागृहाचे कामकाज सुरू असतानाही कोणत्याही वेळी अधिवेशनाची सत्रसमाप्ती केली जाऊ शकते. मात्र, सर्वसाधारणपणे आधी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाते आणि त्यानंतर अधिवेशनाची औपचारिक सत्रसमाप्ती केली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे, सभागृहाचे कामकाज ज्या तारखेपर्यंत तहकूब करण्यात येत, त्यापूर्वी किंवा सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतरही लोकसभेची बैठक बोलावण्याचा पूर्ण अधिकार लोकसभा अध्यक्षांना असतो. याचाच अर्थ असा की, अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब केले असले, तरी त्याचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा मार्ग आपोआप बंद होत नाही.
