पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील कृषी आणि औद्योगिक पट्ट्याला कोकणातील बंदरांशी जोडण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे महामार्ग हे प्रामुख्याने घाटवळणाचे आहेत. त्यावरून प्रवासी आणि मालवाहतूक जलद गतीने होऊ शकत नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी द्रुतगती महामार्गानी जोडले जाणार आहे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रातून कोकणातील प्रवास वेगवान होणे, शेतमाल निर्यातीसही गती मिळमे, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील औद्योगिक पट्ट्यातून कोकणमार्गे निर्यात करता येणे हे लाभ अपेक्षित आहेत. या महामार्गांमुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
पार्श्वभूमी काय?
केंद्र सरकारने बंदरांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात औद्योगिक पट्टे आणि मुख्य मालवाहतूक जाळ्यांना बंदराशी जोडले जात आहे. याअंतर्गत जयगड बंदर-चिपळूण-सातारा आणि दिघी बंदर-पोलादपूर-सुरूर असे दोन नवीन महामार्ग प्रस्तावित आहेत. यामुळे सध्याच्या महामार्गांवरील मालवाहतुकीचा ताण आणि पर्यायाने या वाहतुकीचा खर्चही कमी होईल. हे दोन्ही महामार्ग मुंबई-बंगळुरू महामार्गाशी जोडले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन महामार्गांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासह व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची तयारी केली आहे. पंतप्रधान गती शक्ती योजना आणि राष्ट्रीय मालवाहतूक धोरणांतर्गत हे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
उद्देश काय?
सध्या पश्चिम महाराष्ट्रातून घाटमार्गे कोकणातील वाहतूक होत असली तरी धोकादायक झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागते. घाटमार्गांवर रस्ता रुंदीकरण शक्य नसल्याने दिघी-पोलादपूर-सुरूर या नवीन महामार्गाचा प्रस्ताव समोर आला. सातारा ते चिपळूण महामार्गही घाटवळणाचा आहे. त्यावर दाट लोकवस्ती असल्याने स्थानिक वाहतुकीचा ताणही अधिक आहे. यामुळे जयगड-चिपळूण-सातारा या महामार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या दोन्ही महामार्गामुळे कोकणातील बंदरांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यांची माल हाताळणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. यातून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. प्रवासाचा वेग वाढणार असून, त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च यात बचत होणार आहे.
दिघी-सुरूरचे महत्त्व काय?
दिघी हे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवरील मोठे बंदर आहे. ते पश्चिम महाराष्ट्रातील कृषी आणि औद्योगिक पट्ट्याशी जोडले जाईल. त्याचा सातारा आणि सांगलीतील औद्योगिक व कृषी, सोलापूरमधील वस्त्रोद्योग, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील निर्मिती व अभियांत्रिकी उद्योगांना फायदा होईल. सध्या दिघी ते सुरूर हा प्रवास १८० किलोमीटरचा आहे. या महामार्गावर घाटरस्ता अधिक असल्याने मालवाहतुकीवर मर्यादा येतात. नवीन महामार्ग दिघीतून पोलादपूरमार्गे पुणे-बंगळुरू महामार्गावर सुरूर येथे जोडला जाईल. हा महामार्ग १४० किलोमीटर लांबीचा असेल. या महामार्गामुळे सध्याचे अंतर ४० किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा वेळ दीड तासावर येईल. या प्रकल्पासाठी अंदाजे १२ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जयगड-सातारा का गरजेचा?
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हे महत्त्वाचे बंदर आहे. जयगड बंदर-चिपळूण-सातारा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा महामार्ग ९८ किलोमीटरचा असेल. तो मुंबई-बंगळुरू महामार्गाशी कराडजवळ जोडला जाईल. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याशी महामार्ग जोडला जाणार असल्याने या भागातील औद्योगिक पट्ट्यातून जयगड बंदरापर्यंत जलद मालवाहतूक होणार आहे. या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणातील प्रवास एका तासात शक्य होणार आहे. दिघीतून मालाची आयात-निर्यात जलद होण्यासोबतच त्याची वाहतूकही गतिमान होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
रचना कशी असेल?
या दोन्ही प्रकल्पांचा आराखडा तयार करताना महामार्गाची रचना, सेवा रस्त्यांची रचना, सध्याच्या पुलांचे रुंदीकरण अथवा नवीन पुलांचे बांधकाम या प्रमुख बाबींवर भर देण्यात येईल. याचबरोबर महामार्गांचे आरेखन करताना भौगोलिक स्थितीचा प्रामुख्याने विचार केला जाईल. या प्रकल्पाच्या क्षेत्रात डोंगराळ भाग असल्याने बोगदेही तयार करावे लागणार आहेत. या प्रकल्पांसाठी भूसंपादन करावे लागणार असून, त्यामुळे किती जण विस्थापित होतील, याचा आढावा घेतला जाईल. या प्रकल्पाचे आर्थिक व वित्तीय व्यवहार्यता विश्लेषण, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे. सुरुवातीला आठ पदरी महामार्गासाठी भूसंपादन आणि त्यात पहिल्या टप्प्यात चारपदरी महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ठिकाणांशी त्यांची जोडणी केली जाईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी दिली.
sanjay.jadhav@expressindia.com
