गोव्यातील कुंडई गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अनुष्का गायकवाड या तरुणीला काही वर्षांपूर्वी अचानक मासिक पाळी येणे बंद झाले होते. या समस्येकडे तिने दुर्लक्ष न करता थेट जवळच्या आरोग्य केंद्रात धाव घेतली; पण डॉक्टरांनी तपासणी करण्याआधीच तिला गर्भधारणा चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे घाबरलेल्या अनुष्काने पणजी येथील दुसऱ्या एका डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. तिथे करण्यात आलेल्या सोनोग्राफी तपासणीत तिची मासिक पाळी बंद होण्याचे खरे कारण समोर आले. अनुष्काला ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (PCOS) हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. गेल्या काही वर्षांत भारतातील अनेक महिलांना हा आजार होत असल्याचे विविध अहवालांतून समोर आले आहे, त्याविषयी…
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या आजाराला पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम (PMOS) असेही संबोधले जाते. आज २२ वर्षांची झालेली अनुष्का गायकवाड सांगते की, छोट्या शहरांमधील डॉक्टरांना महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत किती कमी माहिती असते हे मला नंतर समजले. अनुष्काला आलेला हा अनुभव अपवादात्मक नाही. PMOS हा जगभरातील अनेक महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हार्मोनल विकार मानला जातो. मात्र, नाव बदलूनही अनेकजण हा केवळ अंडाशयाशी संबंधित आजार असल्याचे समजतात. प्रत्यक्षात मात्र हा एक चयापचय विकार असून तो शरीरातील जवळपास प्रत्येक प्रणालीवर परिणाम करतो. शरीरातील इन्सुलिनचे नियंत्रण, प्रजनन क्षमता, हृदयाचे आरोग्य, झोप, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलन यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकानुसार, जगभरात सुमारे प्रत्येक आठ महिलांपैकी एक महिला PMOS आजाराने ग्रस्त आहे. त्यातच भारतातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. अलीकडील संशोधनानुसार, भारतातील प्रत्येक पाच महिलांपैकी एक महिला या समस्येने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
महिलांमधील ‘PMOS’ आजाराचे वाढते प्रमाण
मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील मिनिमली इनव्हेसिव्ह गायनॅकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अंशुमाला शुक्ला सांगतात की, २५ वर्षांखालील जवळपास प्रत्येक पाचपैकी एका तरुणीमध्ये PMOS चा काही ना काही परिणाम दिसून येतो. जागतिक स्तरावर हे प्रमाण सुमारे ८ ते १३ टक्के आहे. भारतात मधुमेह आणि इन्सुलिनच्या प्रतिकारशक्तीचे प्रमाण आधीच जास्त आहे. त्यात झपाट्याने बदलणारी जीवशैली, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते सेवन आणि वाढता मानसिक ताण यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, PMOS च्या वाढत्या रुग्णसंख्येमागे महिलांमध्ये जागरूकता वाढणे हेही एक कारण आहे. मासिक पाळीच्या समस्यांसाठी आता अधिकाधिक महिला डॉक्टरांची मदत घेत असल्याने या आजाराचे निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत दिल्लीतील फोर्टिस ला फेम रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी आहुजा म्हणाल्या की, आता स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाणे हा कोणताही सामाजिक संकोच राहिलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक महिलांना PMOS आजाराचे निदान होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही अनेक महिलांचे निदान वर्षानुवर्षे होत नाही. त्यातच किशोरवयीन मुलींसाठी पहिला आधार असलेल्या त्यांच्या मातांनाही या आजाराची पुरेशी माहिती नसते.
कमी वयात PMOS वाढण्याची कारणे काय?
भारतातील महिलांची चयापचयाशी संबंधित आरोग्यस्थितीही PMOS चा धोका वाढवणारी ठरत आहे. कुटुंबात मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा इतिहास असल्यास PMOS होण्याची शक्यता अधिकच वाढते. डॉ. आहुजा यांच्या मते, देशात या आजाराचे एकूण प्रमाण सुमारे १० टक्के असले, तरी मोठ्या शहरांमध्ये बैठी जीवनशैली, अपुरी झोप आणि वाढत्या तणावामुळे हे प्रमाण २५ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कमी वयातच या आजाराचे निदान होणे हा निव्वळ योगायोग नाही. आजच्या किशोरवयीन मुली स्क्रीनवर (मोबाईल/टीव्ही) जास्त वेळ घालवतात, अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन करतात आणि सहसा नियमित व्यायाम करत नाहीत. ज्यांच्यामध्ये आनुवंशिकदृष्ट्या PMOS ची शक्यता असते, त्यांच्यात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर लगेचच या आजाराची लक्षणे दिसू लागतात. याशिवाय, २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये धूम्रपानाचे वाढते प्रमाण ही आणखी एक गंभीर समस्या आहे. धूम्रपानामुळे रक्तातील मुक्त टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, अनावश्यक केस वाढणे आणि केस गळणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तसेच धूम्रपानामुळे शरीरातील इन्सुलिन प्रतिकारही अधिक वेगाने वाढतो, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढणे आणि टाइप-२ मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होतात. धूम्रपानामुळे शरीरातील दाहकता वाढते आणि अंडाशयातील स्त्रीबीजांची संख्या जवळपास २० टक्क्यांनी कमी होते, असा इशाराही डॉ. आहुजा यांनी दिला आहे.
PMOS आजाराची प्राथामिक लक्षणे कोणती?
अनियमित आणि उशिरा येणारी मासिक पाळी हे PMOS आजाराचे प्राथामिक लक्षण मानला जाते. याच तक्रारीमुळे बहुतांश महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र, या आजाराची ही केवळ एकच बाजू असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. PMOS चे निदान करताना डॉक्टर अनेक बाबींची तपासणी करतात. त्यामध्ये अंडोत्सर्जन न झाल्यामुळे मासिक पाळीची वेळ बिघडणे, अनावश्यक केस वाढणे किंवा पुरुषांप्रमाणे केस गळणे, सोनोग्राफीमध्ये अंडाशयात अनेक लहान फॉलिकल्स दिसणे, तसेच रक्त तपासणीत अँटी-म्युलरियन हार्मोनचे प्रमाण वाढलेले आढळणे यांचा समावेश होतो. हा हार्मोन अंडाशयातील सुरुवातीच्या अवस्थेतील अंडकोषिकांची संख्या दर्शवतो. PMOS असलेल्या महिलांमध्ये ही संख्या सामान्यपेक्षा अधिक असते. याशिवाय, PMOS मुळे वजन वाढणे, वंध्यत्व, झोपेच्या समस्या, चिंता आणि नैराश्य यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आहारतज्ज्ञ कविता देवगण यांच्या मते, PMOS आजाराच्या उपचारांमध्ये मानसिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्या म्हणाल्या की, सामान्य रुग्णाला मी १५ ते २० मिनिटे आहाराचा सल्ला देते. मात्र, PMOS असलेल्या महिलांसाठी किमान ४० मिनिटे द्यावी लागतात. कारण- त्या केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि भावनिक समस्यांनाही एकट्याने सामोरे जात असतात.
PMOS आजारावर सर्वात प्रभावी उपाय कोणता?
डॉ. शुक्ला यांच्या मते, जीवनशैलीत बदल हाच PMOS आजारावरील सर्वात प्रभावी उपचार आहे. अनेक महिलांच्या कुटुंबात PMOS चा इतिहास असल्यामुळे त्यांना आनुवंशिक धोका असू शकतो. मात्र प्रक्रिया केलेले अन्न, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे त्याचे प्रमाण अधिकच वाढू शकते. व्यायाम हा वजन कमी करण्याचा तात्पुरता उपाय नसून इन्सुलिन प्रतिकाराचे व्यवस्थापन करण्याचा दीर्घकालीन मार्ग आहे. अनुष्का गायकवाड हिचाही अनुभव असाच होता. महाविद्यालयात असताना दररोज चार किलोमीटर चालत असल्याने तिची मासिक पाळी तुलनेने नियमित होती. मात्र, सुट्ट्या लागल्याने अचानक तिचे चालणे बंद झाले आणि त्यामुळेच ही समस्या उद्भवली. PMOS पासून मुक्तता मिळविण्यासाठी औषधांचा वाटाही तितका महत्वाचा आहे. मात्र, प्रत्येक रुग्णाला गर्भनिरोधक गोळ्यांची गरज असते हा गैरसमज आहे. गर्भनिरोधक गोळ्या केवळ ठराविक रुग्णांनाच दिल्या जातात. ज्या महिलांची मासिक पाळी अत्यंत अनियमित आहे त्यांनाच याचा फायदा होतो. इतर रुग्णांना इन्सुलिनचा प्रतिकार सुधारणाऱ्या किंवा मासिक पाळी नियमित करणाऱ्या औषधांनी बरे केले जाऊ शकते.
वारंवार केल्या जाणाऱ्या चाचण्यांवर तज्ज्ञांचा आक्षेप
PMOS आजार हा आर्थिकदृष्ट्याही मोठे आव्हानात्मक ठरतो. वयाच्या १६ व्या वर्षी या आजाराचे निदान झाल्यानंतर अनुष्का गायकवाडला आतापर्यंत सहावेळा सोनोग्राफी करावी लागली. त्यापैकी अनेक तपासण्या केवळ वेगवेगळ्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यामुळे पुन्हा करण्यात आल्या. मात्र, इतक्या वेळा सोनोग्राफी करणे खरोखर आवश्यक असते का, याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी आहुजा यांच्या मते, PMOS मध्ये दिसणाऱ्या सिस्ट (गाठी) या कार्यात्मक स्वरूपाच्या असतात. मासिक पाळीच्या चक्रादरम्यान त्या तयार होतात आणि नैसर्गिकरित्या कमीही होतात. त्यामुळे एकदा PMOSचे निदान निश्चित झाल्यानंतर वारंवार सोनोग्राफी करण्याची आवश्यकता बहुतांश रुग्णांमध्ये नसते. उपचारानंतर अंडाशयाचा आकार पूर्ववत झाला आहे का, हे पाहण्यासाठी एक-दोन वेळा सोनोग्राफी उपयुक्त ठरू शकते. मात्र, नियमितपणे पुन्हा-पुन्हा तपासण्या केल्याने उपचारपद्धतीत फारसा बदल होत नाही; उलट रुग्णांवरील आर्थिक भार वाढतो. तज्ज्ञांच्या मते, PMOS आजाराची समस्या गंभीर होण्यापूर्वीच किशोरवयीन मुलींची नियमित तपासणी, आवश्यक हार्मोन्स चाचण्या आणि लवकर निदान यावर भर देणे अधिक गरजेचे आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार सुरू केल्यास भविष्यातील गुंतागुंत तसेच उपचारांचा वाढता खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
