व्यायाम करताना, नाचताना किंवा उडी मारताना अचानक लघवी गळणं… अनेक महिलांना या समस्येविषयी इतरांशी बोलताना संकोच वाटतो. ४३ वर्षीय कॉर्पोरेट प्रोफेशनल प्रिया भुवड यांच्यासोबतही जवळपास दोन वर्षे असंच घडत होतं. व्यायाम करताना किंवा कष्टाचं काम करताना लघवी गळू नये, यासाठी त्या हळूहळू आपलं दैनंदिन आयुष्य बदलत गेल्या. पण, लघवी गळण्यासोबतच त्यांना आणखी काही बदल जाणवत होते. लघवी केल्यानंतरही मूत्राशय पूर्ण रिकामं झालं नसल्यासारखं त्यांना वाटत होतं. पुढे त्यांना योनीमार्गात सैलपणा जाणवू लागला आणि लैंगिक संबंधांदरम्यान संवेदना कमी झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. मात्र, या सगळ्या लक्षणांचा संबंध पेल्विक फ्लोअरशी असू शकतो, याची त्यांना सुरुवातीला कल्पना नव्हती.
पेल्विक फ्लोअर म्हणजे ओटीपोटाच्या तळाशी असलेले स्नायू (Muscles) आणि ऊतींचे (Tisues) एक जाळे असते. हे जाळे मूत्राशय, गर्भाशय, योनी आणि आतड्यांना आधार देण्यासोबतच लघवी आणि शौचावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. गर्भधारणा, लठ्ठपणा आणि रजोनिवृत्तीमुळे (Menopause) हे स्नायू कमकुवत होऊ शकतात.
दोन सामान्य बाळंतपण (Normal Deliveries) झाल्यानंतर शरीराच्या पुनर्प्राप्तीसाठी जे करायला हवं होतं (Rehabilitation) त्याकडे प्रियाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. व्यायाम करण्यासाठी, पेल्विक फ्लोअरचे स्नायूंना मजबूत ठेवण्याला तिने प्राधान्य दिलेच नाही. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दुसऱ्या बाळंतपणानंतर तब्बल सहा वर्षांनी तिला शरीराकडून रेड फ्लॅग्स मिळू लागले.
तपासणीअंती डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या मूत्राशयाचा भाग योनीमार्गात घसरला होता (Bladder Prolapse), मलाशयाची भिंत पुढे आली होती आणि त्यामुळे गर्भाशयही त्याच्या मूळ जागेवरून खाली सरकले होते (Uterine Prolapse).
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी डॉक्टरांनी तातडीने पावले उचलली. योनीमार्गाच्या पुढील व मागील भिंतीची दुरुस्ती करण्यासाठी आणि स्नायूंना पुन्हा बळकट करण्यासाठी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने, गर्भाशय फारसे खाली सरकले नसल्याने ते काढण्याची गरज पडली नाही. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या सहा महिन्यांत प्रिया यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. वर्षानुवर्षे त्यांना छळणाऱ्या लघवीच्या त्रासापासून आणि अस्वस्थतेपासून पूर्णपणे मुक्ती मिळाली. पण, महिलांमधील या गंभीर समस्येमुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गरोदरपणात आणि बाळंत झाल्यानंतर महिलांनी कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावं याबाबत डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे.
नवी मुंबईतील मदरहूड हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. त्या म्हणतात, “अनेक महिला बाळंतपणानंतर लघवी गळणे, ओटीपोटात जडपणा जाणवणे किंवा अस्वस्थता होणे ही एक सामान्य गोष्ट मानतात. आई झाल्यानंतर हे असं व्हायचंच असा गैरसमज मनाशी बाळगून त्या वर्षानुवर्षे या यातना गुपचूप सहन करतात. मात्र, कोणतीही लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.”
डॉ. सुरभी सिद्धार्थ यांच्याकडे अशा अनेक महिला उपचारासाठी येत असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणाल्या, “गरोदरपण आणि बाळंतपणाच्या काळात पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंवर प्रचंड ताण पडतो. बाळंतपणानंतर जर या स्नायूंच्या पुनर्प्राप्तीकडे (Rehabilitation) योग्य लक्ष दिले नाही, तर वाढत्या वयानुसार आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात हार्मोन्समधील बदलांमुळे हा सैलपणा किंवा कमकुवतपणा अधिक तीव्र होतो.
भारतातील महिलांमधील ही समस्या किती गंभीर आहे?
भारतात झालेल्या विविध संशोधनातून लघवी गळण्याच्या समस्येचे प्रमाण आकडेवारीतून समोर आले आहे
२०२३ मधील अभ्यास : २० ते ७० वर्षे वयोगटातील ११८ महिलांवर केलेल्या एका अभ्यासात तब्बल २७.१% महिलांमध्ये लघवी गळण्याची (Urinary Incontinence) समस्या आढळून आली. यात ‘स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स’ (पोटावर ताण आल्यावर लघवी गळणे) हा प्रकार सर्वाधिक महिलांमध्ये दिसून आला.
२०२५ मधील अभ्यास : ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ५०० महिलांवर केलेल्या आणखी एका अभ्यासात ३७% महिला या त्रासाने ग्रस्त असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, यातील निम्म्याहून अधिक महिलांना स्ट्रेस इनकॉन्टिनन्सचा त्रास होता.
सोप्या भाषेत सांगायचे तर खोकताना, शिंकताना, जोरात हसताना, धावताना, नाचताना किंवा व्यायाम करताना पोटावर किंचित जरी दाब आला, तरी लघवी गळणे हा अनुभव हजारो महिला रोज गुपचूप सहन करत आहेत. पण, लघवीची गळती हे केवळ एक प्राथमिक लक्षण आहे; पेल्विक फ्लोअरच्या समस्येमुळे इतरही अनेक गंभीर शारीरिक त्रास उद्भवू शकतात. पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत किंवा सैल झाल्यास महिलांना खालील लक्षणे जाणवू शकतात: ओटीपोटात जडपणा, योनीमार्गात उभार (Bulge), मूत्राशय अन् मलाशय साफ न होणे, लघवीची तीव्र घाई, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना जाणवणे, ओटीपोटाचा आणि पाठीचा त्रास अशी लक्षणं जाणवू शकतात.
मुंबईतील कामा अँड आल्ब्लेस रुग्णालयाच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली तळवलकर या ५२ वर्षीय किरण कदम (नाव बदलले आहे) या अविवाहित तरुणीमधील काही बदल स्पष्टपणे सांगतात. किरण यांना टीबीच्या (क्षयरोग) उपचारानंतर सतत ओटीपोटात तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. या आजारपणामुळे त्यांना दीर्घकाळ सुरू राहणारा खोकला झाला आणि नंतर त्यांना खोकल्याची ॲलर्जी झाली. तपासणीअंती त्यांनाही पेल्विक फ्लोअरशी संबंधित समस्या असल्याचे निदान झाले.
त्यांचे ओटीपोटातील स्नायू अतिशय कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर उपचार म्हणून त्यांना ‘पेल्विक फ्लोअर रिहॅबिलिटेशन’ (स्नायू बळकट करण्याची फिजिओथेरपी) करण्याचा सल्ला देण्यात आला. या त्रासातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी किरण यांना काही महिने नियमित व्यायाम करण्याची गरज असल्याचे डॉ. तळवलकर म्हणाल्या.
तरुण मुलींमध्ये ही समस्या का निर्माण होते?
डॉ. तळवलकर यांनी पुढे सांगितले की, सततच्या खोकल्यामुळे किरणच्या पोटाच्या आतील भागावर (Intra-Abdominal Pressure) वारंवार प्रचंड ताण येत होता, यामुळे त्यांचे स्नायू कमकुवत झाले. त्यातच आजारपणात वजनात घट झाल्याने त्यांना अधिक अशक्तपणा जाणवू लागला. याविषयी अधिक स्पष्ट करताना डॉ. तळवलकर म्हणतात, “जेव्हा एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ खोकला असेल किंवा तीव्र बद्धकोष्ठता (Constipation) असेल तर वारंवार जोर द्यावा लागतो. तेव्हा एक टप्पा असा येतो, जिथे हे ओटीपोटातील स्नायू हार मानतात आणि ते सैल पडतात.”
वजन जास्त असेल, जिममध्ये किंवा घरात सतत जड सामान उचलत असाल, शौचाला साफ होत नसेल, हार्मोन्स असंतुलित असतील आणि सारखा अशक्तपणा जाणवत असेल तर ओटीपोटातील स्नायू सैल पडू शकतात. म्हणजेच काय, तर “माझे बाळंतपण झालेले नाही, म्हणजे मला हा त्रास होणारच नाही” या भ्रमात राहणे ही सर्वांत मोठी चूक ठरू शकते.
त्रास होतोय, पण महिला तो का ओळखू शकत नाहीत?
सर्वांत मोठी अडचण ही जागरूकतेची आहे. तरुण मुलींना किंवा महिलांना असे वाटते की हा त्रास फक्त वयोवृद्ध महिलांनाच होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यायामाचे आरोग्याला कोणते फायदे आहेत हे माहीत असूनही अनेक महिला व्यायाम करत नाहीत. ‘मदरहूड हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार, तब्बल ९०% पेक्षा जास्त महिलांना पेल्विक फ्लोअरच्या व्यायामाबद्दल (Kegel Exercises) माहीत असते, पण नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतकेच आहे.
बाळंतपणानंतरच्या काळातही ही मोठी संधी हुकते. डिलिव्हरीनंतर डॉक्टरांकडे फेऱ्या मारताना बाळ कसे दूध पितेय, कुटुंब नियोजन आणि इतर गोष्टींवरच भर दिला जातो. पण, तुमच्या पेल्विक स्नायूंमध्ये किती क्षमता राहिली आहे, याची बहुतांश महिला तपासणीच करत नाहीत.
फक्त ‘किगेल व्यायाम करा’ सांगून भागणार नाही
अनेकदा महिलांना सोपा सल्ला दिला जातो, “जा आणि किगेल (Kegel) व्यायाम करा!” पण, त्यामुळे काही जादू होत नाही. लघवी गळणे किंवा वेदना होण्यामागे नेमके काय कारण आहे, हे आधी शोधणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टर आधी तुमच्या स्नायूंची ताकद आणि त्यांचा ताळमेळ कसा आहे हे तपासतात. गरज पडल्यास स्पेशल फिजिओथेरपी दिली जाते. बायोफीडबॅक या अत्याधुनिक तंत्रज्ञानात रुग्णाच्या शरीराला विशेष सेन्सर्स (Sensors) लावून स्नायूंच्या हालचाली मोजल्या जातात. याद्वारे संगणकाच्या पडद्यावर दृश्य स्वरूपात किंवा आवाजाद्वारे रुग्णाला स्नायूंची थेट प्रतिक्रिया समजते, त्यामुळे आपण योग्य स्नायूंचाच वापर करत आहोत की नाही हे रुग्णाला स्वतः डोळ्यांनी पाहता येते आणि पुढे कसा व्यायाम करावा हे समजण्यास मदत होते.
पण, व्यायाम करण्याची पद्धत चुकली तर फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते! अनेक महिला केवळ स्नायू घट्ट किंवा मजबूत करण्यावरच भर देतात; मात्र स्नायूंमधील समन्वयाचा अभाव असणे किंवा स्नायू योग्य वेळी शिथिल करता न येणे हीच खरी अडचण असते, त्यामुळे स्वतःच्या मनाने काहीही करण्यापेक्षा, योग्य तपासणी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली सुरुवातच तुम्हाला या समस्येतून पूर्णपणे बाहेर काढू शकते.
