अमेरिकेचा संरक्षण विभाग अर्थात पेंटॅगॉनने ८ मे रोजी ‘यूएफओ फाइल्स’ जनतेसाठी खुल्या केल्या. पेंटॅगॉनच्या war.gov/ufo या वेबसाइटवर यूएफओ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’संबंधी माहिती, छायाचित्रे, तर्क प्रकाशित केले जातील. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पारदर्शितेच्या नावाखाली या फाइल्स जनतेसमोर आणण्याचा चंग बांधला होता. यूएफओ आणि त्यानिमित्त अवकाश परजीवी अर्थात एलियन्सविषयी जगभर आजही गूढ आकर्षण असले, तरी अमेरिकेत हा विषय वर्षानुवर्षे चर्चिला जात आहे.

पेंटॅगॉनचा निर्णय काय?

विद्यमान ट्रम्प प्रशासन यूएफओला अनआयडेंटिफाइड अॅनोमेलस फिनोमेना (यूएपी) असे संबोधते. म्हणजे अपरिचित विसंगत घटना! पण सर्वसामान्यांमध्ये आजही एलियन्स आणि त्यांनी पृथ्वीतलावर ‘धाडलेल्या’ विचित्र वस्तूंना यूएफओ अर्थात अपरिचित उडणाऱ्या वस्तू असेच संबोधले जाते. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीची निरीक्षणे, नोंदी, छायाचित्रे, साक्षी, मते war.gov/ufo या वेबसाइटवर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

पेंटॅगॉन, अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासा, अमेरिकी लष्कर, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा, सर्वसामान्य नागरिक यांनी वेळोवेळी नोंदवलेली निरीक्षणे, प्रतिमा, छायाचित्रे या वेबसाइटवर दिसून येतात. डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश वेबसाइटच्या होमपेजवर सुरुवातीलाच दिसून येतो. एलियन्स, यूएफओ, यूएपी यांच्याविषयी आकर्षण सार्वत्रिक आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या अधिकृत संस्थांनी जमवलेली माहिती गोपनीय न राहता जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठीच मी युद्ध विभागाला (डिपार्टमेंट ऑफ वॉर) यासंबंधी फाइल्स खुल्या करण्याचा आदेश दिला, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

यूएफओ कार्यक्रम कधीपासून?

पेंटॅगॉनने २००७मध्ये त्यांच्या ६०,००० कोटी डॉलरच्या वार्षिक आर्थिक तरतुदीपैकी २.२ कोटी डॉलर ‘अॅडव्हान्स्ड एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम’ या कार्यक्रमासाठी राखून ठेवले. वरकरणी ही तरतूद यूएफओ कार्यक्रमासाठी आहे, असे समजून येत नाही. पेंटॅगॉनने कधीही अधिकृतरीत्या यूएफओ शोधमोहिमेचा उल्लेख कोणत्याही कागदपत्रांमध्ये केलेला नव्हता. पण विभागातील एक गुप्तचर अधिकारी लुइस एलिझोंडो संबंधित विभाग पेंटॅगॉनच्याच इमारतीत एका खोलीतून चालवत असे, असा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला आहे.

पेंटॅगॉनला या कार्यक्रमासाठी निधीची मदत अमेरिकेतील राजकीय नेते करत होते. यात नेवाडाचे डेमोक्रॅटिक सेनेटेर हॅरी रीड यांचे नाव आघाडीवर होते. हॅरी रीड यांचे एक घनिष्ठ मित्र आणि अमेरिकेतील धनाढ्य उद्योगपती रॉबर्ट बिगेलो हे नासाच्या प्रदीर्घ प्रवासासाठी आवश्यक अंतराळ मोहिमेशी संबंधित आहेत. त्यांच्या मते एलियन्स अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यातील काही पृथ्वीवर येऊनही गेले आहेत!

बिगेलो यांच्या कंपनीने काही कागदपत्रे गोळा केली. यात अत्यंत वेगाने उडणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचे दृश्य इंजिन नसलेल्या विमानसदृश वस्तुंच्या नोंदी आढळतात. सन २००४मध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी अशाच एका विमानाचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधीची चित्रफीतही नवीन वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यूएफओ फाइल्समध्ये काय दिसून येते?

पेंटॅगॉनच्या war.gov/ufo या वेबसाइटवर सध्या सादर झालेल्या कित्येक छायाचित्रांमध्ये नेमका थांग लागत नाही. एखाद-दोन छायाचित्रेच विचित्र दिसणाऱ्या वस्तूंची आहेत. इतर बहुतेक पुसट आणि संदिग्ध वाटतात. विशेष म्हणजे यातली बहुतेक गेल्या चार वर्षांतली आहेत. एक छायाचित्र अमेरिकेच्या यूएईमधील तळावर तैनात अमेरिकी सैन्यदलातर्फे घेण्यात आले आहे.

२००४मधील बहुचर्चित चित्रफीतीमध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या रडार कॅमेऱ्याने एक वस्तू टिपलेली दिसून येते. या वस्तूभोवताली पांढुरकी प्रभा दिसून येते आणि ती अतिशय वेगाने उडत असल्याचेही भासते. प्रचंड वेगाने उडणारी लढाऊ विमाने तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, असेही जाणवते. या साइटवर येत्या काही दिवसांत आणखीही फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातील.

‘ब्लू बुक’ कार्यक्रम काय होता?

अमेरिकेच्या हवाई दलाने १९४७मध्ये यूएफओ तपासाचा कार्यक्रम हाती घेतला. जवळपास १२ हजार दाव्यांची छाननी या कार्यक्रमाअंतर्गत झाली. पुढे १९६९मध्ये हा कार्यक्रम अधिकृतरीत्या बंद करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत तपासाला ‘ब्लू बुक’ असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. या तपासाअंती असा निष्कर्ष काढण्यात आला, की बहुतेक सर्व दाव्यांमध्ये तारे, ढग, पारंपरिक विमाने आणि हेरगिरी करणारी विमाने आढळून आली. तर ७०१ दाव्यांची मात्र छाननी करता आली नव्हती किंवा त्यांबाबत स्पष्टीकरणही देता आले नव्हते.

खगोलतज्ज्ञांचे म्हणणे काय?

बहुतेक खगोलतज्ज्ञ आजही अवकाश परजीवींच्या अस्तित्वाविषयी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे मानतात. सारा सीगर या एमआयटीमधील अवकाश संशोधक सांगतात, की एखाद्या वस्तूविषयी पुरेशी माहिती हुडकता आली नाही, याचा अर्थ ती वस्तू अवकाशातून आली असे मानणे चुकीचे आहे. विज्ञानात अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देता येत नाही, तेव्हा त्याविषयी संशोधन जारी ठेवावे लागते. वस्तूच्या अस्तित्वाविषयी निष्कर्ष काढणे योग्य नाही.

नासाचे स्पेस शटल अभियंता जेम्स ओबर्ग यांच्या मते, एखादी गोष्ट मनात असली, की समोर दिसू लागल्याचा भास होऊ शकतो. आकाश ही अत्यंत विशाल पोकळी आहे. तेथे अनेक वस्तू, विमाने उडवली जात आहेत. यातील काही वस्तू किंवा विमाने पूर्वसूचना देऊन उडवली जात नाहीत त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसते. अवकाश परजीवी नसतातच, असे मानता येत नाही. पण त्यांच्या अस्तित्वाविषयी पुरेसे पुरावे सापडलेले नाहीत यावर बहुतेक खगोलतज्ज्ञांचे एकमत असते.