Personal Cyber Insurance Policy and Online Fraud Protection importance in India: भारतात सध्या ९० कोटींहून अधिक नागरिक नियमितपणे इंटरनेटचा वापर करत असून नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि यूपीआय (UPI) द्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत आहेत. मात्र, सोयीस्कर डिजिटल व्यवहारांसोबतच सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीचा धोकाही प्रचंड वाढला आहे. अशा संभाव्य आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून सुरक्षित राहण्यासाठी ‘वैयक्तिक सायबर इन्श्युरन्स पॉलिसी’ (Personal Cyber Insurance Policy) अत्यंत प्रभावी ठरत आहे.

आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून संरक्षण

भारतात सुमारे ९०-९५ कोटी लोक (आपल्या लोकसंख्येच्या ६६% ) इंटरनेटचा नियमित वापर करीत आहेत. भविष्यात ही टक्केवारी आणखी वाढतच जाईल. परिणामतः दैनंदिन आर्थिक व्यवहार सुद्धा मोठ्याप्रमाणावर ऑनलाइन होत आहेत. ऑनलाइन व्यवहार करणे निश्चितच सोयीचे आहे, मात्र यातून होणारी फसवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणवर होत असल्याचे दिसून येते. सायबर फ्रॉड हा सर्व चिंतेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी (Personal Cyber Insurance Policy) तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक तपशील चोरी (Identity Theft), डेटा हॅक होणे किंवा रॅन्समवेअर हल्ल्यांमुळे होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून संरक्षण देते. त्यादृष्टीने आज आपण या पॉलिसी बाबतची माहिती घेऊ.

सायबर इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात?

  • आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण: बँक खात्यातून, क्रेडिट/ डेबिट कार्डवरून किंवा यूपीआय (UPI) द्वारे झालेल्या अनधिकृत व्यवहारांमुळे बुडालेल्या पैशांची भरपाई मिळते.
  • डेटा पुनर्प्राप्ती (Data Restoration): संगणक किंवा मोबाईलवर मालवेअर किंवा रॅन्समवेअरचा हल्ला झाल्यास, डेटा पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च आणि आयटी (IT) तज्ज्ञांची फी यात कव्हर केली जाते.
  • सायबर ब्लॅकमेलिंग आणि धमक्या: सायबर गुन्हेगारांनी किंवा ऑनलाइन ट्रोलर्सनी मानसिक त्रास दिल्यास, मानसोपचारतज्ज्ञ (Psychologist) आणि कायदेशीर सल्लागारांवर (Lawyer) होणाऱ्या खर्चात मदत मिळते。
  • वैयक्तिक तपशील चोरी (Identity Theft): तुमचे वैयक्तिक तपशील वापरून कोणी बनावट कागदपत्रे किंवा खाती उघडल्यास, कायदेशीर लढाई आणि क्रेडिट मॉनिटरिंगचा खर्च यातून भागवला जातो.
  • थोडक्यात ज्या व्यवहारात अनोळखी व्यक्तीकडून आपल्या परोक्ष फसवणूक होते असे सेवा व्यवहार या पॉलिसीत समाविष्ट असतात.
Personal cyber insurance policy for online fraud protection | Cyber crime insurance cover benefits India | वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी ऑनलाइन फसवणूक | सायबर इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे आणि प्रीमियम
सायबर फसवणुकीपासून आर्थिक संरक्षण देणारी विमा पॉलिसी (Image- Gemini)

या पॉलिसीत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट नसतात ?

कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना आपला निष्काळजीपणा किंवा स्वत:हून केलेली चूक असेल तर अशा व्यवहारातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळतं नाही. उदा: स्वतःहून आपला पिन, पासवर्ड किंवा आलेला ओटीपी सांगितल्यामुळे फसवणूक झालेली असेल तर नुकसानभरपाई मिळत नाही. तसेच एखादी अनधिकृत /बेकायदेशीर वेबसाईट वापरल्यास त्यातून झालेले नुकसान यात समाविष्ट नसते.

व्यावसायिक नुकसानीचा समावेश नाही

वैयक्तिक पॉलिसीमध्ये व्यावसायिक नुकसान समाविष्ट होत नाही. पॉलिसी घेण्याआधी झालेल्या व्यवहारांतून पॉलिसी घेतल्यानंतर नुकसान झाल्यास त्याचा क्लेम मिळू शकत नाही. क्रीप्टो करन्सीचे व्यवहार यात समाविष्ट नसतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित नेटवर्क वापरून व्यवहार झाल्यास त्याचा क्लेम मिळणे कठीण होऊन जाते.

कायदेशीर कारवाईसाठी येणार खर्च समाविष्ट असतो का?

सायबर फसवणूक झाल्यास कराव्या लागणाऱ्या कायदेशीर कारवाई साठी येणार सर्व खर्च (वकील फी सहित) पॉलिसीत समाविष्ट असतो.

सायबर फसवणूक झाल्यास काय करावे व क्लेम कसा करावा ?

बँक खाते अथवा क्रेडिट कार्ड माध्यमातून सायबर फसवणूक झाल्याचे समजताच तातडीने बँकेस कळवून आपले बँक खाते गोठविण्यास सांगावे, तसेच क्रेडिट/ डेबिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे. (सर्वप्रथम फोन /मेल/ एसएमएस माध्यमातून व नंतर शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष जाऊन आपले खाते कार्ड गोठविले गेल्याची खात्री करून घ्यावी. cybercrime .gov .in या सरकारी पोर्टलवर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (एफआयआर ) नोंदवावी. त्यानंतर पोलीस एफआयआरची प्रत व बँकेचे स्टेटमेंट जोडून आपल्या विमा कंपनीकडे क्लेम दाखल करावा. उशिरा क्लेम दाखल केल्यास नुकसान भरपाई मिळेलच असे नाही. बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांचा हा कालावधी २४ तास ते ७२ तास इतकाच असतो.

सायबर इन्श्युरन्स पॉलिसी कोणी घेणे गरजेचे आहे?

सद्य परिस्थितीत इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही पॉलिसी असणे गरजेचे झाले आहे. विशेषतः जे दैनंदिन व्यवहारासाठी ऑनलाइन शॉपिंग किंवा नेटबँकिंग व यूपीआय तसेच क्रेडिट/ डेबिट कार्डचा वापर करतात. जे लोक व्हाट्सऍप इन्स्टा- फेसबुकवर जास्त सक्रिय आहेत अशांसाठी सुद्धा ही पॉलिसी घेणे जरुरीचे आहे. कारण सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना वैयक्तिक तपशिलाच्या चोरीचा जास्त धोका असतो विशेषतः AI चा वापर करून आवाजाची तसेच चेहऱ्याची नक्कल करणे आता शक्य झाले आहे.

वैयक्तिक सायबर इश्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम कसे असतात?

या पॉलिसीचे प्रीमियम तुम्ही घेत असलेल्या कव्हरवर अवलंबून असतात, जितके कव्हर जास्त तितका प्रीमियन जास्त असतो. असे असले तरी पॉलिसी आर्थिक फसवणुकीसाठीची असेल तर प्रीमियम कमी असतो मात्र जर यात आर्थिक फसवणुकीसोबत आयडेंटिटी थेफ्ट तसेच रॅन्समवेअर यांचाही समावेश असेल तर प्रीमियम वाढतो. साधारणपणे रु.१० लाखाच्या कव्हरसाठी सुमारे रु.२००० ते ३००० इतका वार्षिक प्रीमियम असू शकतो . प्रीमियम कंपनी व समाविष्ट बाबींनुसार कमी अधिक असू शकतो.