Pet insurance cover आपले पाळीव प्राणी केवळ प्राणी नसून ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग असतात. त्यांना आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी आपणही सर्वतोपरी प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्या मालकांवर केवळ भावनिकच नव्हे, तर मोठा आर्थिक ताणही येतो. अनेक लोक पशुवैद्याकडे जाण्यास कचरतात. याचे कारण त्यांना प्राण्यांबद्दल प्रेम नाही असे नसून, उपचारांच्या खर्चाची वाटणारी भीती आहे. मात्र, आता प्राणीप्रेमींना हीदेखील चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच आरोग्य संरक्षण मिळू शकते. पेट इन्शुरन्सचा प्राण्यांना कसा फायदा होतो? किती लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतात? याविषयी जाणून घेऊयात…

पाळीव प्राण्यांचा विमा

युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स (यूएसजीआय) च्या मुख्य अधिकारी आरती मुळीक ‘इकोनॉमिक टाईम्स’ला सांगतात, “आम्ही केलेल्या एका अंतर्गत सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, अनेक लोक उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे प्राणी आपोआप बरा होईल या आशेवर त्याला डॉक्टरकडे नेत नाहीत.” पाळीव प्राण्यांचा विमा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक आधार आणि मानसिक शांतता देण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गुरुग्राममधील मीनाक्षी गोयल यांचे उदाहरण त्यांनी दिले. त्यांच्याकडे ‘पिनट’ आणि ‘बटर’ नावाचे दोन देशी कुत्रे आहेत. एकदा एका कुत्र्याच्या उपचारासाठी ७,००० रुपये खर्च आल्यानंतर त्यांनी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सकडून दोघांचाही विमा करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, “मी अजून कोणताही क्लेम केलेला नाही, पण आता मला शांत झोप लागते. उद्या काही घडलेच तर मला उपचाराची चिंता राहणार नाही.”

पाळीव प्राण्यांचा विमा असणे किती महत्त्वाचे?

‘यूएसजीआय’ने २३५ पाळीव प्राणी मालकांचे सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के लोकांनी पशुवैद्यकीय खर्च हा एक मोठा भार असल्याचे मानले, तर ७४ टक्के लोकांनी यामुळे आर्थिक ताण येत असल्याचे सांगितले. हाडांचे फ्रॅक्चर, जुनाट आजार किंवा कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्च १०,००० रुपयांपासून ते एक लाख रुपयांच्या पुढे सहज जाऊ शकतो. अशा वेळी विम्याचे आर्थिक कवच नसेल तर खिशाला मोठी कात्री बसू शकते.

विम्याची इतकी गरज असूनही त्याबद्दलची जागरूकता कमी आहे. सर्वेक्षणातील केवळ २६ टक्के लोकांनी पाळीव प्राण्यांच्या विम्याबद्दल ऐकले होते आणि फक्त १० टक्के लोकांनी तो खरेदी केला होता. दिल्लीतील ‘डॉग अँड कॅट क्लिनिक’चे पशुवैद्य डॉ. बी. के. चौधरी म्हणतात, “आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या बहुतांश ग्राहकांना असा काही विमा उपलब्ध असतो याची माहितीच नसते. वास्तविक हा विमा अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे.” मुळीक यांनी पुढे सांगितले की, विमा एजंट्सचा यात रस कमी असणे हेदेखील एक कारण आहे. त्या स्पष्ट करतात, या विम्याचा हप्ता कमी असतो, त्यामुळे कमिशनच्या दृष्टीने एजंट्सना यात फारसा फायदा होत नाही.”

पाळीव प्राण्यांच्या मालकांमधील समज-गैरसमज

विम्याबद्दल माहिती असूनही अनेकदा चुकीच्या समजांमुळे लोक पॉलिसी घेत नाहीत. चेन्नईचे डॉ. ए. तिरुमाल यांच्याकडे दोन मांजरी आहेत. त्यांनी विम्याचा विचार केला, पण शेवटी तो न घेण्याचा निर्णय घेतला. ते म्हणतात, “यात अटी खूप आहेत आणि बहुतेक योजना श्वानांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. मांजरींसाठी खास योजना असती तर ती माझ्यासाठी जास्त फायदेशीर ठरली असती.”

त्यांची मुख्य चिंता अशी आहे की, त्यांच्या मांजरी बाहेर फिरतात आणि भटक्या कुत्र्यांशी झालेल्या भांडणात त्या गंभीर जखमी होतात. या समस्येमुळे त्यांनी यापूर्वी दोन पाळीव प्राणी गमावले आहेत. डॉ. तिरुमाल पुढे म्हणतात, “अशा घटनांना कव्हर करणारा कोणताही विमा मला दिसला नाही.” मात्र, त्यांचा हा समज चुकीचा आहे. बहुतेक विमा कंपन्या ‘अपघाती इजा संरक्षण’ देतात, ज्यामध्ये अशा घटनांचा समावेश होतो.

पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे आणि काय नाही, हे समजून घेतल्यास असे गैरसमज दूर होऊ शकतात. पाळीव प्राण्यांच्या विम्यात खूप अटी असतात, हा समज मोठ्या प्रमाणावर चुकीचा आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही योजनांमध्ये फ्रॅक्चर, कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांचा समावेश होतो. डॉ. चौधरी म्हणतात, “पोटाच्या समस्या वगळता जे आजार विम्यातून वगळले जातात ते सहसा कुत्र्या-मांजरींमध्ये क्वचितच आढळतात. पोटाच्या समस्यांसाठी अतिरिक्त प्रीमियम भरून संरक्षण घेता येते.”

विमा कंपन्या पारदर्शकताही जपतात. पॉलिसीच्या ब्रोशरमध्ये कोणत्या गोष्टी वगळल्या आहेत याची स्पष्ट यादी असते. यामध्ये वयाची अट ही मालकांसाठी चिंतेची बाब असते. बहुतेक कंपन्या ३ महिने ते ७ वर्षे वयोगटातील प्राण्यांना विमा देतात, तर ११ ते १२ वर्षांपर्यंत त्याचे नूतनीकरण करता येते. दातांचे उपचार हा आणखी एक घटक आहे, जो विम्यात समाविष्ट नसतो, पण त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. डॉ. चौधरी सांगतात, “श्वानांमध्ये दातांच्या समस्या सहसा १३ ते १४ वर्षांनंतर सुरू होतात.”

विम्याविषयीची जागरूकता

‘पॉलिसीबाझार’च्या पेट इन्शुरन्स विभागाच्या प्रमुख अंकिता लाल म्हणतात, “पाळीव प्राण्यांचा विमा घेण्याचे कोणतेही तोटे नाहीत. क्लेम फेटाळल्या जाण्याच्या घटना जवळपास नगण्य आहेत.” डॉ. चौधरी हेदेखील सांगतात की, जर प्राण्याला आधीपासूनच एखादा आजार नसेल तर क्लेम मिळवताना त्यांच्या कोणत्याही ग्राहकाला अडचण आलेली नाही. समस्या तेव्हा येते, जेव्हा मालकाला कोणती गोष्ट विम्यात बसते आणि कोणती नाही याची माहिती नसते; त्यामुळेच पॉलिसीमधील बारकावे वाचणे महत्त्वाचे आहे.

पाळीव प्राण्यांचा विमा हा मानवी आरोग्य विम्यासारखा नसतो. तुम्ही कंपनीने दिलेल्या विविध पर्यायांपैकी तुमच्या गरजेनुसार ‘कव्हर’ निवडू शकता. डॉ. चौधरी सल्ला देतात की, “तुमच्या प्राण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, हे ठरवण्यासाठी पशुवैद्याचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.” प्राण्याची ब्रीड, वय आणि लिंग यांचा त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने विम्याच्या प्रीमियमवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, ‘गोल्डन रिट्रिव्हर’ श्वानांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ‘टर्मिनल इलनेस कव्हर’ घेणे आवश्यक ठरते.

विमा संरक्षणाचा खर्च किती?

साधारणपणे दोन ते तीन लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देणाऱ्या प्लॅनसाठी वर्षाला १०,००० रुपये खर्च येतो, जो सामान्य वैद्यकीय गरजांसाठी पुरेसा असतो. जर तुम्हाला प्रीमियम जास्त वाटत असेल तर ‘को-पेमेंट’चा पर्याय निवडता येतो. यामध्ये बिलाचा ठराविक वाटा तुम्ही द्यायचा असतो आणि बाकी कंपनी देते. तुम्ही जितका जास्त को-पे वाटा निवडाल, तितका तुमचा वार्षिक प्रीमियम कमी होईल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतात सध्या कोणतीही कंपनी ‘कॅशलेस’ सुविधा देत नाही. मालकांना आधी स्वतः पैसे भरावे लागतात आणि नंतर रिइम्बर्समेंटसाठी अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेला क्लेमच्या स्वरूपानुसार दोन ते तीन महिने लागू शकतात.