ईपीएफओच्या अनिवार्य सदस्यांसाठीची वैधानिक वेतनमर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्याच्या निर्णयामुळे पीएफ, ईपीएस आणि निवृत्ती बचतीच्या गणनेत महत्त्वाचे बदल होऊ शकतात. मात्र, या बदलाचा लाभ कोणाला मिळणार, योगदान कसे वाढणार आणि पेन्शनवर नेमका काय परिणाम होणार, याबाबत अनेक प्रश्न आहेत.

ईपीएफओचा अनिवार्य सदस्य म्हणजे नेमके कोण?

एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ठरावीक मर्यादेत आहे म्हणून तो ईपीएफओचा अनिवार्य सदस्य ठरत नाही. संबंधित आस्थापना किंवा उद्योग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या कक्षेत येणे आवश्यक आहे. आस्थापना (उद्योग, कंपनी) कायद्याच्या कक्षेत आल्यानंतर त्यातील पात्र कर्मचाऱ्यांना पीएफ योजनेत सहभागी करून घेणे ही नियोक्त्याची जबाबदारी असते. त्यामुळे कर्मचाऱ्याचे वेतन, आस्थापनेचे स्वरूप आणि लागू कायदेशीर तरतुदी या तिन्ही बाबी महत्त्वाच्या ठरतात.

१५ हजारांवरून २५ हजार रुपयांची मर्यादा वाढण्याचा नेमका अर्थ काय?

पूर्वी १५ हजार रुपयांपर्यंतच्या वेतनावर अनिवार्य अंशदानाची तरतूद होती. ती २५ हजार रुपये झाली आहे. त्यामुळे १५ ते २५ हजार रुपयांदरम्यान पीएफसाठी ग्राह्य वेतन असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना थेट फायदा होऊ शकतो. म्हणजेच कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचे योगदान वाढण्याची शक्यता आहे.

पीएफसाठी २५ हजार रुपयांचे वेतन कसे ठरवले जाते?

पीएफसाठीचे वेतन आणि एकूण मासिक पगार या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. पीएफसाठी ग्राह्य वेतन ठरवताना बेसिक वेतन, महागाई भत्ता (डीए), फूड अलाऊन्स आणि रिटेनिंग अलाऊन्स यांसारख्या संबंधित घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे एखाद्याचे एकूण वेतन ३० किंवा ३५ हजार रुपये असले तरी पीएफसाठी ग्राह्य वेतन त्यापेक्षा कमी असू शकते.

२५ हजार रुपये ग्राह्य वेतन असल्यास पीएफमध्ये किती अंशदान होईल?

पीएफसाठी ग्राह्य वेतन २५ हजार रुपये असल्यास कर्मचाऱ्याचा १२ टक्के हिस्सा ३ हजार रुपये होतो. नियोक्त्याचाही हिस्सा ३ हजार रुपये असतो. नियोक्त्याच्या योगदानातील नियमानुसार ८.३३ टक्के हिस्सा ईपीएसमध्ये वळवला जातो. २५ हजार रुपयांवर हा हिस्सा सुमारे २,०८३ रुपये होतो. उर्वरित रक्कम ईपीएफमध्ये जाते. त्यामुळे जुन्या १५ हजार रुपयांच्या मर्यादेच्या तुलनेत संबंधित कर्मचाऱ्याच्या निवृत्ती बचतीत वाढ होऊ शकते.

२५ हजारांपेक्षा अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ लाभ मिळेल का?

एकूण पगार २५ हजार रुपयांपेक्षा अधिक असणे आणि पीएफसाठी ग्राह्य वेतन २५ हजार रुपयांपेक्षा अधिक असणे या स्वतंत्र बाबी आहेत. एखाद्याचा एकूण पगार ३५ हजार रुपये असला, तरी पीएफसाठी ग्राह्य वेतन २५ हजार रुपये असल्यास अनिवार्य कव्हरेज त्या मर्यादेपर्यंत लागू होऊ शकते. पण, त्यापेक्षा अधिक असल्यास, अधिक वेतनावर पीएफ योगदान सुरू ठेवण्यासाठी लागू नियमांनुसार नियोक्ता आणि कर्मचारी यांची संमती आवश्यक असू शकते.

ईपीएफओच्या योजनांमधून कर्मचाऱ्यांना कोणते प्रमुख लाभ मिळतात?

ईपीएफओच्या कक्षेत प्रामुख्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस-९५) आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना (ईडीएलआय) या योजना येतात. ईपीएफमधून नियमानुसार निवृत्ती बचत उपलब्ध होते. ईपीएसअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतूद आहे. तर सेवेत असताना सदस्याचा मृत्यू झाल्यास ईडीएलआयअंतर्गत पात्र कुटुंबीयांना विमा लाभ मिळू शकतो.

ईपीएस पेन्शनसाठी किती सेवा आवश्यक आहे आणि पेन्शन कशी ठरते?

ईपीएसअंतर्गत मासिक पेन्शनसाठी साधारणपणे किमान १० वर्षांची पात्र सेवा आवश्यक असते. पेन्शनची गणना पेन्शनेबल वेतन आणि पेन्शनेबल सेवा यांच्या आधारे केली जाते. मूलभूत सूत्र पेन्शनेबल वेतन × पेन्शनेबल सेवा ÷ ७० असे आहे. त्यामुळे पेन्शनसाठी ग्राह्य वेतन वाढल्यास, इतर पात्रता आणि लागू नियम कायम राहिल्यास, भविष्यातील पेन्शन देखील वाढू शकणार आहे.

२५ हजार रुपयांच्या मर्यादेचा ईपीएसवर किती परिणाम होऊ शकतो?

१५ हजार रुपयांच्या मर्यादेवर नियोक्त्याच्या ८.३३ टक्के ईपीएस योगदानाची कमाल रक्कम सुमारे १,२५० रुपये होती. २५ हजार रुपयांची मर्यादा लागू झाल्यास ती सुमारे २,०८३ रुपये होऊ शकते. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या ईपीएस योगदानात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष पेन्शन किती वाढेल हे केवळ योगदानावर अवलंबून नसून पेन्शनेबल वेतन, पात्र सेवा आणि त्या वेळी लागू असलेल्या ईपीएस नियमांवर अवलंबून राहील.

पगार वाढल्यानंतर ईपीएसची सदस्यता आपोआप संपते का?

एखादा कर्मचारी आधीपासून ईपीएसचा सदस्य असेल आणि त्याच्या वेतनात कालांतराने वाढ झाली, तरी केवळ वेतन वाढल्यामुळे ईपीएस सदस्यत्व आपोआप संपत नाही. मात्र, नव्याने सदस्यत्व, उच्च वेतनावरील अंशदान आणि ईपीएसमधील पात्रता याबाबत स्वतंत्र नियम लागू होतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात कर्मचाऱ्याची सदस्यत्वाची स्थिती आणि योगदानाबाबतचा तपशील समजून घेणे आवश्यक असते.

या बदलाचा सर्वाधिक थेट परिणाम कोणावर होईल?

१५ ते २५ हजार रुपये पीएफसाठी ग्राह्य वेतन असलेल्या आणि ईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यांचे कर्मचारी व नियोक्ता योगदान वाढल्याने ईपीएफमधील बचत वाढण्याची शक्यता आहे.

rajeshwarthakare@expressindia.com