जागतिक स्तरावरील आघाडीची औषध निर्मिती करणारी कंपनी ‘फायझर’ने (Pfizer) नुकतेच एका नवीन आणि अत्यंत प्रभावी ठरू शकणाऱ्या औषधाच्या मध्यम-टप्प्यातील (mid-stage) वैद्यकीय चाचण्यांचे निकाल जाहीर केले आहेत. ‘बेरोबेनाटाईड’ (berobenatide), असे या औषधाचे नाव असून, ते प्रामुख्याने लठ्ठपणा (Obesity) आणि मधुमेह (Diabetes)विरोधी औषध म्हणून विकसित केले जात आहे. या औषधाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे औषध रुग्णांना महिन्यातून फक्त एकदाच घ्यावे लागणार आहे.

जर या औषधाला अन्न आणि औषध प्रशासनासारख्या (उदा. FDA) नियामक संस्थांकडून अंतिम मंजुरी मिळाली, तर हे जगातील पहिले असे जीएलपी-१ (GLP-1) वेट-लॉस थेरपी ठरेल, ज्यासाठी दर आठवड्याला इंजेक्शन घेण्याऐवजी महिन्याला फक्त एकच इंजेक्शन घ्यावे लागेल. सध्या लठ्ठपणा कमी करण्याच्या औषधांच्या बाजारपेठेवर ‘नोवो नॉर्डिस्क’ (Novo Nordisk) कंपनीचे ‘वेगोवी’ (Wegovy) व ‘एली लिली’ (Eli Lilly) कंपनीचे ‘झेपबाऊंड’ (Zepbound) यांसारख्या औषधांचे वर्चस्व आहे. मात्र, फायझरचे हे नवीन औषध या बाजारपेठेत ‘गेम-चेंजर’ ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

GLP-1 म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते?

GLP-1 (Glucagon-like peptide-1) हे आपल्या आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे एक संप्रेरक (Hormone) आहे. हे औषध त्याच नैसर्गिक संप्रेरकासाठी कृत्रिम पर्याय आहे. त्याचे शरीरातील मुख्य फायदे खालीलप्रमाणे :

  • रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवणे: हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • पचनाचा वेग कमी करणे : हे जठर (पोट) रिकामे होण्याची प्रक्रिया संथ करते, ज्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो.
  • भूक कमी करणे : रुग्णाला वारंवार भूक लागत नाही आणि थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते.

भारतीय रुग्णांच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांचे मत:

या नवीन औषधाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अत्यंत सकारात्मक आहेत. चेन्नई येथील ‘डॉ. मोहन्स डायबेटिज स्पेशॅलिटीज सेंटर’चे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन याविषयी माहिती देताना म्हणतात,

“हे अत्यंत उत्साहवर्धक पाऊल आहे. कारण- हे औषध वापरण्यासाठी अधिक सोईस्कर आहे. इंजेक्शन वारंवार घ्यावे लागत नसल्यामुळे रुग्ण उपचारांमध्ये सातत्य राखू शकतील आणि दिलेला डोस वेळेवर पूर्ण करतील. मात्र, आम्हाला या औषधाचा संपूर्ण विकास, त्याच्या चाचण्यांचे अंतिम निकाल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे ‘बेरोबेनाटाईड’ औषध भारतीय शरीरयष्टीवर (Indian body type) कशा प्रकारे काम करते, हे पाहणे अधिक गरजेचे आहे.”

भारतीय लोकांची जनुकीय रचना आणि शरीरातील फॅट्सचे (चरबीचे) प्रमाण पाश्चात्त्य लोकांपेक्षा वेगळे असते. त्यामुळे कोणत्याही जागतिक औषधाचा भारतीय रुग्णांवर कसा आणि किती परिणाम होतो, याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या औषधाची चर्चा जगभर का होतेय?

या औषधाविषयी निर्माण झालेली उत्कंठा केवळ वजन कमी होणार म्हणून नाही, तर हे औषध रुग्णांसाठी किती सोईस्कर आहे, हे या उत्कंठेमागचे मुख्य कारण आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेली आणि प्रचंड लोकप्रिय असलेली लठ्ठपणा कमी करणारी औषधे सामान्यतः रुग्णांना दर आठवड्याला इंजेक्शनद्वारे घ्यावी लागतात. ‘फायझर’च्या या नव्या औषधाचे मुख्य उद्दिष्ट रुग्णांवरील हाच ताण लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. उपचाराच्या सुरुवातीला रुग्णांना काही आठवडे साप्ताहिक डोस दिले जातील आणि त्यानंतर त्यांना दर महिन्याला फक्त एक इंजेक्शन घ्यावे लागेल. 

ज्या लोकांसाठी लठ्ठपणा हा एक दीर्घकालीन आजार (Chronic condition) आहे, त्यांना वर्षाला ५२ इंजेक्शन्स घेण्याऐवजी आता केवळ १२ इंजेक्शन्स घ्यावी लागतील.

‘वेस्पर-३’ (VESPER-3) चाचणी:  

‘फायझर’ने ‘वेस्पर-३’ (VESPER-3) नावाच्या एका मध्यम-टप्प्यातील क्लिनिकल अभ्यासात नोंदवलेली निरीक्षणे:

  • मधुमेह नसलेल्या रुग्णांचे १२.३% वजन कमी झाले. 
  • सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या रुग्णांनी साप्ताहिक डोसवरून मासिक डोसकडे (monthly dosing) स्थलांतर केले, त्यांचे वजन एका विशिष्ट टप्प्यावर न थांबता सातत्याने कमी होत राहिले.

इतर औषधांशी तुलना: 

  • वेगोवी (Wegovy – semaglutide): या औषधाच्या ‘STEP 1’ नावाच्या अंतिम टप्प्यातील चाचणीत ६८ आठवड्यांच्या कालावधीत रुग्णांचे सरासरी १५% वजन कमी झाल्याचे दिसून आले.
  • झेपबाऊंड (Zepbound – tirzepatide): या औषधात GLP-1 सोबतच GIP नावाचे संप्रेरकही असते. याने काही अंतिम टप्प्यातील चाचण्यांमध्ये सरासरी २०% किंवा त्याहून अधिक वजन कमी करून दाखवले आहे.

महिन्याला एक शॉट : यामागील विज्ञान काय?

पहिल्यांदा ऐकताना, महिन्याला फक्त एक इंजेक्शन घेऊन संपूर्ण महिनाभर त्याचा प्रभाव कसा टिकून राहू शकतो, हा प्रश्न साहजिकपणे समोर येतो. कारण- मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारे GLP-1 संप्रेरक रक्तप्रवाहात केवळ काही मिनिटेच टिकून राहते आणि त्यानंतर ते नष्ट होते किंवा त्याचे विघटन होते.

औषध निर्मात्यांनी या नैसर्गिक मर्यादेवर अत्यंत प्रगत रेण्वीय अभियांत्रिकीच्या (sophisticated molecular engineering) माध्यमातून उपाय काढला आहे. हे आधुनिक औषध अशा प्रकारे बनवले जाते की, ते रक्तप्रवाहात खूप जास्त वेळ टिकून राहील.

  • शास्त्रज्ञ या रेणूच्या (molecule) काही भागांमध्ये बदल करतात, जेणेकरून त्याचे शरीरात लवकर विघटन होणार नाही.
  • ते याला ‘फॅटी ऍसिड’च्या साखळ्या जोडतात, ज्यामुळे ते रक्तातील प्रथिनांशी (proteins) घट्ट बांधले जाते.
  • किंवा ते मोठ्या प्रथिनांसोबत (larger proteins) मिसळले जाते, ज्यामुळे हे औषध शरीरातून बाहेर पडण्याची प्रक्रिया अतिशय संथ होते.

या सर्व प्रक्रियेचा परिणाम असा होतो की, हे औषध शरीरात काही मिनिटांऐवजी अनेक आठवड्यांपर्यंत सक्रिय राहते. ‘फायझर’च्या म्हणण्यानुसार, ‘बेरोबेनाटाईड’मध्ये ‘अल्ट्रा-लाँग हाफ-लाइफ’ (एखाद्या पदार्थाला विघटित व्हायला लागणारा एक अपवादात्मक दीर्घ कालावधी) आहे, ज्यामुळे संपूर्ण महिनाभर या औषधाचा स्थिर आणि सातत्यपूर्ण प्रभाव टिकून राहण्यास मदत होते.

कमी इंजेक्शन्सचे प्रमाण रुग्णांसाठी का महत्त्वाचे?

  • लठ्ठपणावरील उपचारांमधील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे उपचारांमधील सातत्य. अनेक रुग्ण मधेच उपचार सोडून देतात कारण:
  • दर आठवड्याला इंजेक्शन घेणे गैरसोईचे असते.
  • हा उपचार अत्यंत महागडा असू शकतो.
  • वारंवार सुया टोचून घेणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक असते.

हे इंजेक्शन महिन्यातून एकदाच घ्यावे लागत असल्याने उपचार सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ते रुग्णांसाठी सोईस्कर आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे असे ठाम मत आहे की, इंजेक्शन्सची संख्या कमी केल्याने रुग्णांचा उपचारांना मिळणारा प्रतिसाद आणि नियमपालन सुधारेल. ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण आता वैद्यकीय जगतात ‘लठ्ठपणा’कडे केवळ तात्पुरते वजन कमी करण्याची प्रक्रिया म्हणून न पाहता, एक ‘कायमचा उपाय’ आवश्यक असलेला दीर्घकालीन आजार म्हणून पाहिले जात आहे.

या औषधाचे काही दुष्परिणाम आहेत का?

इतर कोणत्याही GLP-1 आधारित औषधांप्रमाणेच ‘बेरोबेनाटाईड’मुळे काही ‘गॅस्ट्रोइंटेस्टायनल’ (पोटाशी आणि पचनाशी संबंधित) दुष्परिणाम होऊ शकतात (मळमळणं, उलट्या होणं).

फायझरच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उपचारांसारखेच या औषधाचे दुष्परिणाम :

  • ‘वेस्पर-३’ (VESPER-3) चाचणीतील दुष्परिणाम : या अभ्यासात, रुग्णांना मळमळ होण्याचे सरासरी प्रमाण सुमारे ३८% होते; तर अंदाजे २३% सहभागींना उलट्यांचा त्रास झाला.
  • वेगोवीशी तुलना: नोवो नॉर्डिस्कच्या ‘वेगोवी’ चाचण्यांमध्ये, सुमारे ४४% सहभागींनी मळमळ होण्याचा त्रास झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली होती आणि अंदाजे एक-चतुर्थांश (२५%) रुग्णांना उलट्यांचा अनुभव आला होता. याचा अर्थ ‘फायझर’चे औषध याच श्रेणीत मोडते.

फायझरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बहुतेक दुष्परिणाम अत्यंत सौम्य (mild) स्वरूपाचे होते आणि ते महिनाभर टिकून राहण्याऐवजी डोस घेतल्यानंतर लगेचच सुरुवातीच्या काळात दिसून आले. संशोधकांच्या असेही लक्षात आले की, जेव्हा रुग्णांनी ‘साप्ताहिक’ इंजेक्शनवरून ‘मासिक’ इंजेक्शनवर स्थलांतर केले, तेव्हा दुष्परिणामांमध्ये तात्पुरती वाढ झाली. त्यामुळेच कंपनीने भविष्यातील अभ्यासांमध्ये अधिक टप्प्याटप्प्याने आणि सावकाश डोस वाढवावेत, असे सुचवले आहे.

पुढे काय होणार?

हे ताजे निकाल औषधविकासाच्या ‘मध्यम टप्प्यातील’ (mid-stage) चाचण्यांमधून आले आहेत. त्याचा अर्थ असा की, नियामक संस्थांकडून (जसे की FDA) बाजारात विकण्यासाठी अंतिम मंजुरी मिळवण्यापूर्वी, या औषधाला अजून मोठ्या प्रमाणावरील आणि अधिक काळ चालणाऱ्या अंतिम टप्प्यातील चाचण्यांना सामोरे जावे लागेल.

भविष्यातील या मोठ्या चाचण्या ज्यावर तज्ज्ञ प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतील असे तीन महत्त्वपूर्ण प्रश्न:

  • या औषधामुळे रुग्णांचे एकूण किती वजन कमी होते?
  • वजन कमी होण्याचे हे प्रमाण कालांतराने किती काळ टिकून राहते?
  • मोठ्या आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येवर चाचणी केल्यास याचे दुष्परिणाम आटोक्यात राहतात का?

जर या पुढील चाचण्यांचे निकालही आतासारखेच भक्कम आणि सकारात्मक आले, तर ‘फायझर’ सध्या त्यांच्या स्पर्धकांकडे नाही असे ‘मासिक GLP-1 इंजेक्शन’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण  उत्पादन बाजारात आणेल. ते वैद्यकीय जगतात आणि लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लाखो लोकांसाठी खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण ठरू शकते.