Cervical Cancer HPV Symptoms Causes Warning : कर्करोग म्हणजेच ‘कॅन्सर’ असा शब्दही ऐकला तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. आता पुढे काय होणार या चिंतेच्या भावनेने बहुतांश लोक जगण्याची आशा सोडून देतात. गेल्या काही वर्षांत भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, त्यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. २०२४ मध्ये देशातील सुमारे ७९ हजार ३६० महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यातील ३६ हजार ३१९ महिलांचा या आजारामुळे आपले प्राण गमावावे लागले. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर उपचार करून मात करता येते. मात्र, अनेकदा या आजाराची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत. या पार्श्वभूमीवर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो? त्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत ठरतात? त्याविषयीचा हा आढावा…
लैंगिक संबंधामुळे वाढतोय ‘या’ कर्करोगांचा धोका?
तज्ज्ञांच्या मते, जगभरात कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आढळून येतात; पण त्यापैकी काही प्रकार फक्त महिलांमध्येच दिसतात. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. या आजाराला कारणीभूत ठरणारा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) नामक विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. परिणामी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग, तोंड किंवा घशाचा कर्करोग, योनीमध्ये होणारा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळते. महिलांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जवळजवळ ९९ टक्के प्रकरणांमध्ये HPV विषाणूमुळेच होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, अनेक लैंगिक भागीदार असणे आणि कमी वयात लैंगिक संबंध सुरू करणे हे या कर्करोगाचा धोका वाढवते. जगातील कर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी कारण माहिती असलेला बहुदा हा एकमेव कर्करोग आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जुलै २०२६ मध्ये अद्ययावत केलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या जवळपास सर्व प्रकरणांचा संबंध ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसच्या दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या संसर्गाशी संबंधित आहे, पण या विषाणूची लागण झाली म्हणजे कॅन्सर होतोच असे नाही. बहुतांश वेळा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या संसर्गाशी लढून त्यावर मात करते. तरीदेखील ‘हाय-रिस्क HPV’चा संसर्ग दीर्घकाळ शरीरात राहिल्यास काही महिलांच्या पेशींमध्ये कर्करोग होण्यापूर्वीचे बदल होऊ शकतात. या बदलांवर वेळीच उपचार न झाल्यास पुढे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचा प्रसार कसा होतो?
ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या प्रसाराबाबत अनेक गैरसमज आहेत. काही जणांना हा विषाणू इतर संसर्गांप्रमाणे सामायिक वस्तू, पृष्ठभाग किंवा सामान्य संपर्कातून पसरतो असे वाटते. मात्र, हे पूर्णपणे योग्य नाही. याबाबत कटक येथील एचसीजी कॅन्सर सेंटरचे सल्लागार-सर्जिकल डॉ. पांडा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, HPV प्रामुख्याने जवळच्या त्वचा-त्वचेच्या संपर्कातून, विशेषतः लैंगिक संबंधांदरम्यान पसरतो. त्यामध्ये योनीमार्गातून, गुदमार्गातून किंवा तोंडावाटे होणाऱ्या लैंगिक संपर्काचाही समावेश होतो. कंडोमचा वापर केल्याने संसर्गाचा धोका कमी होतो; पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही. कारण, कंडोमने झाकल्या न गेलेल्या त्वचेच्या भागातूनही विषाणूचा प्रसार होऊ शकतो ही बाब विशेष महत्त्वाची आहे. लैंगिक संबंधांशिवाय HPV चा प्रसार अत्यंत दुर्मीळ आहे. मात्र, विशिष्ट परिस्थितींमध्ये तो होऊ शकतो. उदाहरणार्थ, बाळाच्या जन्मादरम्यान आईकडून बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. तरीही, HPV च्या प्रसाराचा प्रमुख मार्ग हा जवळचा आणि लैंगिक त्वचा-त्वचेचा संपर्कच आहे. या विषाणूचा संबंध थेट लैंगिक आरोग्याशी येत असल्याने अनेकांना त्यावर बोलण्यास संकोच वाटतो. मात्र, चर्चा टाळल्याने संसर्गाचा धोका कमी होत नाही; उलट त्याबाबतची माहिती मिळण्यास आणि योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास विलंब होऊ शकतो, असेही डॉ. पांडा यांनी स्पष्ट केले.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग बहुतांश प्रकरणांमध्ये अनेक वर्षांच्या कालावधीत हळूहळू विकसित होतो. उच्च-जोखीम असलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गाचा दीर्घकाळ टिकून राहणे हे त्यासाठी कारणीभूत ठरते. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे कर्करोगपूर्व टप्प्यात शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सुरुवातीच्या काळात महिला स्वतःला पूर्णपणे सुदृढ समजतात, अशी माहिती राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या ऑन्कोलॉजी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रेणुका गुप्ता यांनी ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीला दिली. त्यांच्या मते, या आजारापासून बचावासाठी HPV लसीकरण, पॅप स्मिअर किंवा HPV चाचणीद्वारे नियमित तपासणी आणि वेळेवर वैद्यकीय पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर ती नेहमीच्या मासिक पाळीतील बदल किंवा किरकोळ संसर्ग म्हणून दुर्लक्षित करू नयेत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे असामान्य योनीतून रक्तस्राव होणे. त्यामध्ये दोन पाळीच्या दरम्यान होणारा रक्तस्राव, लैंगिक संबंधानंतर होणारा रक्तस्राव, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव, अचानक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होणे किंवा पाळी जास्त दिवस राहणे, यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.
कर्करोगाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
डॉ. गुप्ता यांच्या मते, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे हा अनेकदा बोलण्यास संकोच वाटणारा विषय असतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करू नये. संसर्ग, गर्भाशयाच्या मुखावरील पॉलीप, दुखापत किंवा हार्मोन्समधील बदलांमुळेही असा रक्तस्राव होऊ शकतो. मात्र, गर्भाशयाच्या मुखातील काही बदलांचे हे संकेतही असू शकतात, ज्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. लैंगिक संबंधांनंतर एकदाच रक्तस्राव झाला तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. वारंवार असा रक्तस्राव होत असल्यास घरगुती उपाय किंवा मेडिकलमधून मिळणारी औषधे घेऊन स्वतःहून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मासिक पाळीच्या चक्रानुसार योनीतून होणाऱ्या स्रावामध्ये नैसर्गिक बदल होत असतात. मात्र, सतत होणारा किंवा नेहमीपेक्षा वेगळा स्राव गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये प्रामुख्याने पाण्यासारखा स्राव, रक्तमिश्रित स्राव, तपकिरी रंगाचा स्राव, दुर्गंधीयुक्त स्राव दिसून येतो, असेही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. कोणतेही स्पष्ट कारण नसताना अनेक दिवस किंवा आठवडे स्राव सुरू राहिल्यास योग्य वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वारंवार किरकोळ संसर्ग समजून त्यावर उपचार करत राहिल्यास मूळ आजाराचे निदान होण्यास विलंब होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
ओटीपोटात दुखणे किंवा लैंगिक संबंधांदरम्यान वेदना
ओटीपोटाच्या खालच्या भागात सतत वेदना होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळीतील वेदना, मूत्रमार्गाचा संसर्ग, फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रिओसिस यांसारख्या कारणांमुळेही हा त्रास होऊ शकतो. मात्र, नव्याने सुरू झालेली किंवा वाढत जाणारी ओटीपोटातील वेदना, विशेषतः त्यासोबत असामान्य रक्तस्राव किंवा योनीतून स्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लैंगिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदनाही एखाद्या स्त्रीरोगविषयक समस्येचे संकेत असू शकतात. हा त्रास वारंवार होत असेल किंवा त्यासोबत रक्तस्राव होत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. गुप्ता यांनी दिला आहे. त्यांच्या मते, कंबरदुखी ही अतिशय सामान्य समस्या आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये कंबरदुखी हे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढल्याचे लक्षण असू शकते. आजार प्रगत अवस्थेत पोहोचल्यास आसपासच्या ऊती, नसांवर किंवा लसिका द्रवाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंबरेच्या खालच्या भागात वेदना, पायांमध्ये जाणारी वेदना किंवा एका अथवा दोन्ही पायांना सूज येऊ शकते.
लघवी किंवा शौच करताना वेदनांकडे दुर्लक्ष नको!
डॉ. गुप्ता सांगतात की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आसपासच्या अवयवांमध्ये पसरल्यास त्याचा मूत्राशय किंवा गुदाशयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लघवी करताना वेदना होणे, लघवीत रक्त येणे, वारंवार लघवीला होणे, बद्धकोष्ठता, शौच करताना वेदना होणे, गुदाशयातून रक्तस्राव होणे, यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. ही लक्षणे संसर्ग किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्यांमुळेही होऊ शकतात. मात्र, ही लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास किंवा त्यासोबत स्त्रीरोगाशी संबंधित लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. कारण नसताना वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, भूक न लागणे आणि अशक्तपणा ही केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची विशिष्ट लक्षणे नाहीत. मात्र, इतर इशाऱ्यांसोबत ही लक्षणे दिसत असतील तर त्यांचे गांभीर्य वाढते.
गर्भाशयाच्या कर्करोगावर योग्य उपचार कोणते?
इतर अनेक कर्करोगांच्या तुलनेत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याशी संबंधित संवेदनशील किंवा वैयक्तिक लक्षणांबाबत डॉक्टरांशी बोलण्यास संकोच करू नये. डॉ. गुप्ता यांच्या मते, वेळेवर स्क्रीनिंग, HPV लसीकरण, नियमित स्त्रीरोग तपासणी आणि असामान्य लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे यामुळे जीव वाचवण्याच्या दृष्टीने मोठा फरक पडू शकतो. लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेतल्यास यशस्वी उपचाराची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. लक्षणे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित नसली तरी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. यादरम्यान वरील लक्षणे दिसली म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगच आहे, असे स्पष्ट होत नाही. त्यापैकी अनेक लक्षणे सामान्य आणि उपचार करता येण्याजोग्या आजारांमुळेही उद्भवू शकतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. लवकर तपासणी केल्यास लक्षणामागील कारण समजू शकते आणि योग्य वेळी योग्य उपचार सुरू करता येतात, असेही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.
