Physiotherapy Joint Knee Pain Relief: वेदनेच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे किंवा फिजिओथेरेपिस्टकडे गेल्यावर “तुम्हाला नक्की काय झालंय?” हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. परंतु, आधुनिक वैद्यकीय शास्त्रात आणि पुनर्वसनात (Rehabilitation) यापेक्षाही एक महत्त्वाचा प्रश्न रुग्णाला विचारला जातो, तो म्हणजे “तुम्हाला पुन्हा काय करता यावं असं वाटतंय?”
“डॉक्टर, माझे गुडघे खूप दुखतायत. पण मला नक्की काय झालंय हेच कळत नाही.”
“मला सांगितलं की, माझ्या मणक्यात झीज आहे. आता मी काय करू?”
“दुखणं कमी झालं तर बरं होईल; पण मला पुन्हा माझं काम करता येईल का?”
वेदना घेऊन उपचारासाठी आलेल्या व्यक्तीच्या मनात असे अनेक प्रश्न असतात. पण वैद्यकीय तपासणी सुरू झाली की संवाद अनेकदा एका प्रश्नाभोवती फिरतो “तुम्हाला काय झालं आहे?” हा प्रश्न अर्थातच महत्त्वाचा आहे. निदान समजून घेणं, योग्य उपचार ठरवणं आणि गंभीर कारणं ओळखणं यासाठी त्याची गरज असते. पण वेदनेच्या उपचारात आणखी एक प्रश्न तितकाच, किंबहुना अनेकदा अधिक महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे
“तुम्हाला पुन्हा काय करता यावं असं वाटतं?” कारण रुग्ण केवळ रिपोर्ट बरा करण्यासाठी उपचार घेत नसतो. त्याला पुन्हा आपलं आयुष्य जगता यावं अस वाटत असतं.
रुग्णासाठी ‘बरं होणं’ म्हणजे काय?
फिजिओथेरेपी क्लिनिकमध्ये दोन रुग्ण एकाच निदानासह येऊ शकतात; पण त्यांच्यासाठी ‘बरं होणं’ याचा अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. एका व्यक्तीला गुडघेदुखी कमी होऊन ऑफिसमध्ये आरामात बसता आणि चालता यावं ही अपेक्षा असते. दुसऱ्या व्यक्तीला नातवंडांसोबत जमिनीवर बसता यावं अस वाटत असतं. तिसऱ्याला पुन्हा मंदिराच्या पायऱ्या चढता यायला हव्या असतात. चौथ्याला घरातील स्वयंपाक, बाजारहाट किंवा शेतातील काम पुन्हा करता यावं अस वाटत असतं. म्हणूनच “तुम्हाला काय झालं?” हा प्रश्न शरीराची समस्या समजून घेतो; पण “तुम्हाला काय करता यावं असं वाटतं?” हा प्रश्न व्यक्तीला समजून घेत असतो.

फक्त वेदना कमी करणं पुरेसं आहे का?
समजा एखाद्या व्यक्तीची पाठदुखी ८/१० वरून ३/१० झाली. रिपोर्टमध्ये फारसा बदल नसला तरी वेदना कमी झाल्यामुळे तिला निश्चितच आराम वाटेल. पण अजूनही ती घराबाहेर एक किलोमीटर चालू शकत नसेल, मुलांना उचलू शकत नसेल किंवा कामावर परतू शकत नसेल, तर तिच्यासाठी उपचार पूर्ण झाले आहेत का? तर कदाचित नाही. कारण वेदना कमी होणं आणि कार्यक्षमता परत मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आधुनिक पुनर्वसनामध्ये त्यामुळेच रुग्णाच्या कार्यक्षमतेला आणि त्याच्या स्वतःच्या उद्दिष्टांना महत्त्व दिलं जातं.
“मला काय झालं?” हा प्रश्नही महत्त्वाचा आहे याचा अर्थ निदान महत्त्वाचं नाही असा अजिबात नाही.
रुग्णाला आपल्या समस्येबद्दल समज असणं आवश्यक आहे.
- “माझ्या गुडघ्यात काय होतंय?”
- “माझ्या हातात मुंग्या का येतात?”
- “माझ्या कंबरेचं दुखणं कशामुळे आहे?”
या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळणं रुग्णाचा संभ्रम आणि भीती कमी करू शकतं. पण त्यानंतर पुढचा प्रश्न विचारणं तितकंच महत्त्वाचं आहे. “ही समस्या असूनही तुम्हाला कोणत्या गोष्टी पुन्हा करता यायला हव्यात?”
यातून उपचाराची दिशा अधिक स्पष्ट होते.
रुग्णाचं आयुष्य उपचाराचा भाग का असावं?
आरोग्यसेवकासाठी एखादं निदान हे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचं असू शकतं. पण रुग्णासाठी त्याच्या आजाराचा अर्थ त्याच्या दैनंदिन जीवनात दिसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला खांदेदुखी आहे. क्लिनिकल तपासणीत हालचालींची मर्यादा, स्नायूंची ताकद किंवा इतर काही निष्कर्ष दिसू शकतात. पण त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी समस्या कदाचित केस विंचरता न येणं किंवा स्वतःचे कपडे घालता न येणं असू शकते. उपचाराची दिशा ठरवताना ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
- “तुमच्यासाठी महत्त्वाचं काय?” रुग्णाला हा प्रश्न विचारल्यावर अनेकदा उपचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
- “मला सकाळी उठून चालायला जाता आलं पाहिजे.”
- “मला पुन्हा बसने प्रवास करता आला पाहिजे.”
- “मला माझं ऑफिसचं काम करता आलं पाहिजे.”
- “मला माझ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होता आलं पाहिजे.”
ही उद्दिष्टं केवळ भावनिक नाहीत. ती Functional Goals आहेत. आणि उपचाराच्या प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात. Patient-centred care म्हणजे नेमकं काय? Patient-centred care म्हणजे रुग्णाला उपचाराच्या केंद्रस्थानी ठेवणं. याचा अर्थ प्रत्येक निर्णय रुग्णाच्या म्हणण्यानुसार घ्यायचा असा नाही. वैद्यकीय ज्ञान, सुरक्षितता आणि पुराव्यावर आधारित उपचार तितकेच आवश्यक आहेत. पण उपचार ठरवताना रुग्णाच्या गरजा, मूल्यं, जीवनशैली, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टं यांचाही विचार केला जातो.
उदाहरणार्थ, दोन व्यक्तींना समान गुडघेदुखी असली तरी त्यांच्या उपचाराच्या उद्दिष्टांमध्ये फरक असू शकतो.
एकाला चालण्याची क्षमता वाढवायची असेल, तर दुसऱ्याला जिने चढता यावेत हे अधिक महत्त्वाचं असू शकतं.
रुग्ण उपचारात ‘सहभागी’ असतो. Pain Awareness Month मधील ‘Understand, Educate, Partner’ या दृष्टिकोनाशी हा विचार थेट जोडलेला आहे. रुग्णाला समजून घेणं म्हणजे त्याच्या वेदनेबरोबर त्याचं जीवनही समजून घेणं. Educate म्हणजे त्याला त्याच्या समस्येबद्दल योग्य माहिती देणं. आणि Partner म्हणजे उपचाराचा निर्णय घेताना त्याला सक्रिय सहभागी करणं.
फिजिओथेरेपिस्टने व्यायाम सांगायचा आणि रुग्णाने फक्त करायचा, इतकंच उपचाराचं नातं नसावं.
“आपण कुठे पोहोचायचं आहे?” हा प्रश्न दोघांनी मिळून ठरवणं महत्त्वाचं आहे. छोट्या उद्दिष्टांमधून मोठी प्रगती
कधी कधी रुग्णाचं अंतिम उद्दिष्ट मोठं असतं. “मला पुन्हा पूर्वीसारखं चालायचं आहे.”- अशा वेळी त्या उद्दिष्टाला छोट्या टप्प्यांमध्ये विभागता येतं. आज घरात आरामात चालणं. नंतर थोडं बाहेर चालणं. मग अधिक अंतर चालणं. नंतर जिने किंवा इतर आवश्यक दैनंदिन कामं. या प्रक्रियेत रुग्णाला स्वतःची प्रगती जाणवते. उपचार हा केवळ वेदनेच्या आकड्यांवर आधारित राहत नाही, तर जीवनात परत मिळणाऱ्या क्षमतांवर आधारित होतो.
रुग्णाला काय हवं आहे हे विचारणं उपचार बदलू शकतं कधी कधी आरोग्यसेवकाला वाटतं की, रुग्णाचं मुख्य उद्दिष्ट वेदना कमी करणं असेल. पण संवाद केल्यानंतर कळतं की त्याची खरी चिंता काही वेगळी आहे.
- “मला रात्री शांत झोपता यावं.”
- “मला कामावरून सुट्टी घ्यावी लागू नये.”
- “मला माझ्या आईची काळजी घेता यावी.”
- “मला पुन्हा प्रवास करता यावा.”
- अशा विविध उद्दिष्टांमुळे उपचार अधिक वैयक्तिक आणि अर्थपूर्ण होतात.
शेवटी प्रश्न वेदनेपलीकडे जातो. वेदना हा रुग्णाच्या अनुभवाचा महत्त्वाचा भाग आहे. पण रुग्ण म्हणजे फक्त त्याची वेदना नाही. तो एक व्यक्ती आहे, त्याचं काम आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत, आवडी आहेत आणि भविष्यासाठी काही अपेक्षा आहेत. म्हणूनच उपचाराच्या वेळी फक्त “किती दुखतंय?” एवढंच विचारण्याऐवजी कधी कधी “तुम्हाला पुन्हा काय करता यावं असं वाटतं?” हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे.
निदान महत्त्वाचं आहे. तपासण्या महत्त्वाच्या आहेत. वेदना कमी करणं महत्त्वाचं आहे. पण उपचाराचा अंतिम अर्थ केवळ रिपोर्ट सुधारण्यात किंवा Pain Score कमी करण्यात नसतो. रुग्णाला त्याचं आयुष्य पुन्हा जगता येणं, हे उपचाराचं तितकंच महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि Pain Awareness चा खरा अर्थही कदाचित हाच वेदना ऐकणं, व्यक्ती समजून घेणं आणि तिच्या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा करता याव्यात यासाठी तिच्यासोबत चालणं.
