How One Dead Pig Nearly Started a War Between America and Britain: दोन देशांमधील सीमा हा नेहमीच वादाचा विषय ठरतो. भारत-पाकिस्तान, भारत-चीन, थायलंड-कंबोडिया या देशांमधील सीमावाद हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. परंतु, चक्क १६७ वर्षांपूर्वी जागतिक पातळीवरील जागतिक महासत्ता ब्रिटन आणि उदयोन्मुख सत्ता अमेरिका एका डुकराच्या मृत्यूमुळे आमने-सामने आल्या होत्या. इतिहासात या प्रसंगाची नोंद ‘पिग वॉर’ म्हणून करण्यात आली आहे.
१८५९ साली सॅन जुआन बेटावर घडलेली ही घटना इतिहासातील अत्यंत विचित्र सीमावादांपैकी एक मानली जाते. केवळ एका डुकराचा अमेरिकन शेतकऱ्याकडून झालेला मृत्यू, ब्रिटन आणि अमेरिका या दोन जागतिक महासत्तांमध्ये थेट लष्करी संघर्षाचे कारण ठरला. वरवर पाहता ही घटना अतिशय क्षुल्लक वाटत असली, तरी त्यामागे दोन देशांमधील जुने प्रादेशिक दावे आणि अस्पष्ट सीमांकन यांसारखी गंभीर राजकीय आणि भौगोलिक कारणे दडलेली होती.
एका शेतकऱ्याच्या बटाट्याच्या शेतात एक डुक्कर वारंवार घुसत होते. संतापलेल्या शेतकऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली. एरवी दोन शेजाऱ्यांमधील नुकसानभरपाईवर मिटू शकणाऱ्या या घटनेनंतर अमेरिका आणि ब्रिटनने त्या बेटावर सैनिक, तोफा आणि युद्धनौका तैनात केल्या. एका बाजूला भविष्यात अमेरिकेच्या यादवी युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा जॉर्ज पिकेट होता, तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिश आरमार. पुढील आदेशाची प्रतीक्षा करत होते.
१५ जून १८५९ रोजी सॅन जुआन बेटावर घडलेल्या या घटनेत प्रत्यक्षात केवळ डुकराचा मृत्यू झाला. मात्र इतिहासात ही घटना ‘पिग वॉर’ म्हणून नोंदली गेली. अर्थात, हा संघर्ष केवळ एका डुकरामुळे निर्माण झाला नव्हता. त्यामागे अमेरिका-ब्रिटनमधील अपूर्ण सीमांकन, सॅन जुआन बेटावरील परस्परविरोधी दावे आणि पॅसिफिक किनाऱ्यावरील सामरिक हितसंबंध दडलेले होते.
१८४६ चा ओरेगॉन करार आणि सीमावादाची मुळे
या संपूर्ण तणावाची खरी मुळे १८४६ मधील ओरेगॉन करारात (Oregon Treaty) होती. ब्रिटन आणि अमेरिकेने पॅसिफिक नॉर्थवेस्ट क्षेत्रावरील आपला अधिकार स्पष्ट करण्यासाठी हा करार केला होता. त्यानुसार ४९ व्या अक्षवृत्ताला सीमा मानण्यात आले, परंतु व्हॅंकुव्हर बेट आणि मुख्य भूमी यांच्यातील जलमार्गाबाबत करारात अत्यंत अस्पष्ट भाषा वापरली गेली होती. हारो सामुद्रधुनी आणि रोझारिओ सामुद्रधुनी या दोन्ही जलमार्गांना हे वर्णन लागू होत असल्याने, त्यांच्या दरम्यान असलेले सॅन जुआन बेट नक्की कोणाचे, यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले.
प्रादेशिक दावे आणि आर्थिक हितसंबंधांची स्पर्धा
भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या आणि सुपीक जमीन लाभलेल्या या बेटावर दोन्ही देशांनी आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. ब्रिटनची नामांकित ‘हडसन बे कंपनी’ (Hudson’s Bay Company) या भागात सक्रिय झाली आणि तिने १८५३ मध्ये ‘बेल व्ह्यू शीप फार्म’ स्थापन करून आपला दावा बळकट केला. दुसरीकडे, अमेरिकन वसाहतकार आणि शेतकरी देखील या जमिनीवर अमेरिकन कायद्यानुसार स्वतःचा हक्क सांगत तेथे स्थायिक होऊ लागले. स्पष्ट प्रशासकीय व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील कोणताही वाद थेट आंतरराष्ट्रीय वाद ठरण्यासाठीची पार्श्वभूमी तयार झालेली होती.
‘त्या’ डुकराची घटना आणि लष्करी तणावाची ठिणगी
१५ जून १८५९ रोजी अमेरिकन शेतकरी लायमन कटलर याने आपल्या बागेचे नुकसान करणाऱ्या एका डुकरावर गोळी झाडून त्याला ठार मारले. दुर्दैवाने, ते डुक्कर ब्रिटीश हडसन बे कंपनीचे होते. या घटनेनंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी कटलरला अटकेची धमकी दिली, त्यामुळे अमेरिकन वसाहतकारांनी लष्करी संरक्षणाची मागणी केली. याला प्रतिसाद म्हणून अमेरिकन सैन्याचे कॅप्टन जॉर्ज पिकेट आपल्या तुकडीसह बेटावर दाखल झाले. या घटनेमुळे ब्रिटीश गव्हर्नर जेम्स डग्लस संतापले आणि त्यांनी ब्रिटीश नौदलाला युद्धनौका तैनात करण्याचे आदेश दिले. ऐतिहासिक नोंदींनुसार, कटलरने डुकराची नुकसानभरपाई म्हणून १० डॉलर देऊ केले होते; परंतु त्याच्याकडे त्याहून मोठी रक्कम मागण्यात आली. त्यामुळे साध्या आर्थिक तडजोडीने मिटू शकणारा वाद यामुळे अधिक चिघळला.
६४ सैनिकांपासून युद्धनौकांपर्यंत
कॅप्टन जॉर्ज पिकेट २७ जुलै १८५९ रोजी ६४ अमेरिकी सैनिकांसह बेटावर उतरला. त्यानंतर बेटावर ब्रिटिश युद्धनौका दाखल झाल्या. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनकडे संघर्ष सहज जिंकण्याइतके मनुष्यबळ आणि शस्त्रबळ होते; तरीही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हल्ला केला नाही.
थेट युद्ध टाळणारा लष्करी संयम
सॅन जुआन बेटावर दोन्ही बाजूंनी तोफा, युद्धनौका आणि शेकडो सैनिक तैनात करण्यात आले होते. वातावरण पूर्णपणे युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. परंतु, ब्रिटनच्या पॅसिफिक नौदलाचे कमांडर रिअर ॲडमिरल लॅम्बर्ट बेन्स यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवला. एका डुकराच्या मृत्यूवरून दोन महासत्तांनी महायुद्धात उतरावे, ही कल्पना त्यांनी थेट फेटाळून लावली. “मी दोन महान राष्ट्रांना डुकरासाठी युद्धात ढकलणार नाही” …रिअर ॲडमिरल रॉबर्ट लॅम्बर्ट बेन्स यांनी गव्हर्नर जेम्स डग्लस यांच्या आक्रमक भूमिकेला विरोध केला. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार, एका डुकराच्या वादावरून दोन राष्ट्रांना युद्धात ढकलण्यास बेन्स यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे लष्करी ताकद असतानाही दोन्ही बाजूंच्या कमांडरनी प्रत्यक्षात गोळीबार न करता कमालीचा संयम पाळला.
द्विराष्ट्रीय छावण्या आणि विचित्र ‘शांतताकाळ’
युद्धाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांनी वरिष्ठ जनरल विनफिल्ड स्कॉट यांना वाटाघाटीसाठी पाठवले. दोन्ही देशांनी परस्पर संमतीने बेटावरील सैन्याची संख्या कमी केली. अमेरिकन सैन्याने ‘अमेरिकन कॅम्प’ आणि ब्रिटीश सैन्याने ‘इंग्लिश कॅम्प’ स्थापन करून तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरची १२ वर्षे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांपासून अवघ्या काही अंतरावर शांततेत राहिले. या काळात त्यांच्यात सामाजिक संवाद, एकत्र जेवण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असे मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय लवाद आणि वादाचा अंतिम निकाल
१८७१ च्या वॉशिंग्टन कराराद्वारे या सीमावादाचा निर्णय करण्यासाठी मध्यस्थ म्हणून जर्मनीचे सम्राट कैसर विल्हेल्म प्रथम यांची निवड करण्यात आली. त्यांनी जिनेव्हा येथील तीन सदस्यांच्या निष्पक्ष आयोगाकडे हा विषय सोपवला. सर्व दस्तऐवज आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर, २१ ऑक्टोबर १८७२ रोजी या आयोगाने अमेरिकेच्या बाजूने निकाल दिला. सीमा हारो सामुद्रधुनीतून निश्चित करण्यात आली आणि सॅन जुआन बेटांवर अधिकृतपणे अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य झाले.
या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व
निकालांनंतर १८७२ साली नोव्हेंबर महिन्यात ब्रिटीश सैन्याने आणि १८७४ पर्यंत अमेरिकन सैन्याने बेटावरील छावण्या रिकाम्या केल्या. या संपूर्ण संघर्षात केवळ एका डुकराचा जीव गेला, म्हणून याला ‘पिग वॉर’ असे गमतीशीर नाव पडले. परंतु ऐतिहासिक दृष्टीने, ही घटना आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, समजूतदारपणा आणि लवादाचे एक उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. सैन्याची ताकद आणि चिथावणी असूनही, केवळ संवादाच्या जोरावर एका मोठ्या युद्धाचा भडका कसा रोखता येतो, हे या घटनेने सिद्ध केले.
