कबुतरांची दिशा ओळखण्याची आणि कुठल्यातरी कोसावरून मार्ग काढत अचूक घरट्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता आजही माणसांना आणि तज्ज्ञांना खिळवून ठेवते. अखेर आज त्यातल्या गुपित उघडकीस आले आहे. कबुतरे त्यांचा रस्ता कसा शोधतात, या प्रश्नाचे उत्तर संशोधनातून मिळाले आहे.

अलीकडेच प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिक ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनाने यामागचे रहस्य उलगडले आहे. कुतूहलाची गोष्ट म्हणजे कबुतरांच्या ‘नॅव्हिगेशन’ यंत्रणेचा मुख्य स्रोत त्यांच्या डोक्यात किंवा डोळ्यांत नसून, त्यांच्या यकृतातील लोहयुक्त रोगप्रतिकारक पेशींमध्ये दडलेला असल्याचे समोर आले आहे.

प्राणी दिशा कशी शोधतात?

पूर्वीच्या सिद्धांतांनुसार पक्षी, समुद्री कासव, शार्क आणि कुत्रे यांसारखे अनेक प्राणी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून दिशा ठरवतात. मात्र, ते हे चुंबकीय क्षेत्र कसे अनुभवतात यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती.

यापूर्वी शास्त्रज्ञांनी केलेले दोन अंदाज:

  • प्राण्यांच्या शरीरात चुंबकाच्या सुईसारखे कार्य करणारे छोटे कण असावेत किंवा,
  • त्यांच्या डोळ्यांमधील विशिष्ट प्रथिनांमुळे त्यांना चुंबकीय क्षेत्र ओळखता येत असावे.

नवा शोध काय?

संशोधकांना असे आढळले आहे की, कबुतरांच्या यकृतातील ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये ‘फेरिटिन’ (Ferritin) नावाच्या प्रथिनामध्ये मोठ्या प्रमाणात लोह (iron) साठवलेले असते. यकृतातील या पेशी मज्जातंतूच्या (Nerve cells) अगदी जवळ ओढल्या जातात. त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, या पेशी चुंबकीय माहिती गोळा करून, ती थेट मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असाव्यात.

ढगाळ वातावरणात कबुतरे भरकटतात का?

ही स्थिती पडताळून पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात काही प्रयोग करून पाहिले. त्यामध्ये शास्त्रज्ञांनी ३४ कबुतरांवर एक प्रयोग केला. त्यांनी या कबुतरांना १९ किलोमीटरचा प्रवास करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनतर एका विशिष्ट औषधाचा वापर करून, काही कबुतरांच्या शरीरातील या ‘लोहयुक्त रोगप्रतिकारक पेशी’ तात्पुरत्या निकामी करण्यात आल्या.

या प्रयोगाचे निकाल काय?

ज्या दिवशी खूप ढग दाटून आले होते, त्या दिवशी औषध दिलेल्या कबुतरांना रस्ता शोधात आला नाही आणि ती पूर्णपणे भरकटली. मात्र, ज्या कबुतरांवर त्या विशिष्ट औषधाचा वापर केला नव्हता, ती नेहमीप्रमाणे अचूक घरी परतली.
यातली रंजक गोष्ट म्हणजे ज्यावेळी हा प्रयोग कडकडीत उन्हात केला गेला तेव्हा औषध दिलेली कबुतरेही आपल्या घरी अचूकपणे पोहोचली.

याचा अर्थ काय?

लख्ख ऊन असताना कबुतरांनी दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा नैसर्गिक होकायंत्र म्हणून वापर केला. यावरून हे स्पष्ट होते की, जेव्हा सूर्यप्रकाश किंवा इतर नैसर्गिक खुणा उपलब्ध नसतात, तेव्हा यकृतातील या विशिष्ट पेशी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ओळखून, कबुतरांना अचूक दिशा दाखवतात.

ही प्रक्रिया नक्की कशी घडते?

शास्त्रज्ञ अजूनही या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करीत आहेत. पण सध्याची मुख्य थिअरी अशी आहे की, पेशींमध्ये साठवलेले लोह पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देते आणि लगोलग असलेल्या मज्जातंतूंना (Nerves) संकेत (Signals) पाठवते. हे मज्जातंतू मग ती माहिती थेट मेंदूपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे प्राण्यांना ‘कोणत्या दिशेने जायचे आहे’ हे समाजते.

या संशोधनाचे महत्त्व काय?

जर हे संशोधन पूर्णपणे सिद्ध झाले, तर याचे परिणाम केवळ कबुतरांपुरते मर्यादित राहणार नाहीत. मधमाशा, वटवाघूळ, देवमासे (Whales) व शार्क यांसारखे चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असणारे इतर अनेक प्राणीही दिशा शोधण्यासाठी याच जैविक यंत्रणेचा वापर करीत असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

तूर्तास, निसर्गातील एका अद्भुत चमत्कारावर प्रकाश टाकण्याचे काम या संशोधनाने नक्कीच केले आहे. प्राण्यांना त्यांच्या ‘घरी’ पोहोचवणारा निसर्गाचा हा ‘गूगल मॅप’ खऱ्या अर्थाने आश्चर्यकारक आहे.