लिझ मॅथ्यू, शॅजू फिलिप

Pinarayi Vijayan Kerala Assembly Election: देशात सध्या फक्त केरळ या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) सरकार अस्तित्वात आहे. केरळमध्ये उद्या (९ एप्रिल) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात माकप निवडणुकीला सामोरे जात आहे. २०१६ व २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत विजयन यांच्या नेतृत्वात माकपने दोनदा सत्ता मिळवली होती. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ८१ वर्षीय कॉम्रेड, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात माकप निवडणूक लढत आहे. देशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता फक्त केरळ राज्यात आहे. त्यामुळे केरळचा गड पुन्हा राखणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अस्तित्वासाठी महत्वाचे आहे.

‘माकप’साठी केरळमध्ये अस्तित्वाची लढाई?

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्य व केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी पश्चिम बंगाल व केरळची निवडणूक महत्वाची आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाजपाला कडवे आव्हान आहे, तर केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ८१ वर्षीय नेते व मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासमोर पक्षाला जीवंत ठेवण्याचे आव्हान असणार आहे. पिनराई विजयन यांची कार्यपद्धती ही ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी आहे. पिनराई विजयन हे शांत, संयमी, शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केरळमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पसरणाऱ्या आक्रमकतेला विजयन कसे थोपवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केरळमध्ये झालेल्या २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहभागी असलेल्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळाले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी देशातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिनराई विजयन यांच्याभोवती एकसंध झाला होता. मागील दोन दशकांपासून केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात माकपचे सरकार आहे.

पिनराई विजयन केरळमध्ये माकपचा मुख्य चेहरा

पिनराई विजयन हे मागील दहा वर्षांपासून केरळचे मुख्यमंत्री आहेत. तसेच आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचे (एलडीएफ) ते मुख्य चेहरा आहेत. २०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी पिनराई विजयन यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. समुद्रामध्ये वादळात अडकलेल्या जहाजाचे कॅप्टन असल्यासारखी परिस्थिती विजयन यांची झाली होती. केरळवर करोना, निपाह, ओखी चक्रीवादळ, पूर अशा अनेक समस्या आल्या होत्या. त्या समस्यांमधून विजयन यांनी केरळला पुढे नेले. केरळचा कायापालट करणारी व्यक्ती अशी पिनराई विजयन यांची सध्या ओळख झाली आहे. केरळमधील रस्त्यांवर, तसेच इन्स्टाग्रामवर शेअर होणाऱ्या रिलमधून विजयन यांच्यासाठी जोरदार प्रचार केला जात आहे. “जर एलडीएफ नाही, तर मग कोण?” असा प्रश्न विचारणारे फलक रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत. दरम्यान, ८१ वर्षीय कॉम्रेड मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सीपीआय (एम) या पक्षावरील, एलडीएफ या आघाडीवरील व सरकारवर असलेले निर्विवाद वर्चस्व पाहता “जर विजयन नाही, तर मग कोण?” असा सवाल विचारणे देखील संयुक्तिक ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

पिनराई विजयन यांचे व्यक्तिमत्व कसे आहे?

पिनराई विजयन यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री होण्याबाबत विश्वास आहे. परंतु, त्यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. सबरीमाला मंदिरातील सोन्याचा गैरप्रकार तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला धक्का यांमुळे विजयन यांच्यासमोर तिसऱ्यांदा सत्तेत येणे आव्हानात्मक ठरणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ८१ वर्षीय विजयन यांनी दररोज चार सभा घेतल्या. विजयन हे ३० मार्च रोजी कोट्टारक्करा येथे एका प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्टेजवर पक्षाचे उमेदवार के.एन.बालगोपाल भाषण देत होते. विजयन सभास्थळी पोहोचल्याचे पाहून बालगोपाल यांनी त्यांचे भाषण थांबवून विजयन यांचे स्वागत केले. तसेच तिथे जमा असलेल्या कार्यकर्त्यांनी विजयन यांनी कारमधून खाली पाय ठेवताच हात वर करून “कॉम्रेड विजयन, आमचे नेतृत्व करा”, “पिनराई विजयन यांना सलाम”, अशा घोषणा दिल्या.

पिनराई विजयन कारमधून उतरून थेट स्टेजवर गेले. स्टेजवर त्यांची वाट पाहत थांबलेल्या नेत्यांशी बोलण्यात वेळ न दवडता विजयन यांनी सभेला संबोधित केले. शांत व संयमीपणे विजयन यांनी त्यांच्या पक्षाची कामगिरी सांगितली. निवडणुकीत बालगोपाल यांना पाठींबा द्या, असे विजयन यांनी समोर उपस्थित जन समुदायाला सांगितले. त्यानंतर भाषण संपवून विजयन हे पुढील सभेसाठी निघून गेले. त्यांनी कोणाबरोबरही सेल्फी किंवा हॅण्डशेक केला नाही. पिनराई विजयन यांच्या याच कामाशी काम ठेवणे अशा व्यक्तिमत्वाचा केरळच्या सामान्य जनतेवर मागील दोन दशकांपासून प्रभाव पडत आला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन व केरळचे माजी मुख्यमंत्री उम्मन चंडी यांच्यातील संबंध कसे?

पिनराई विजयन हे संकट काळात मदतीसाठी धावून येतात, हे केरळमधील विजयन यांचे समर्थक व विरोधक मानतात. केरळचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते उम्मन चंडी यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चंडी यांच्या कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विजयन यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून चंडी यांच्या कुटुंबावर टीका झाली. त्यावेळी उम्मन चंडी यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये विजयन यांनी कसे सहकार्य केले, याबाबत चंडी यांच्या पुत्राने माहिती दिली होती. उम्मन चंडी व पिनराई विजयन हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते.

पिनराई विजयन यांची कार्यशैली कशी आहे?

उम्मन चंडी व पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत एका व्यावसायिकाने माहिती दिली. चंडी मुख्यमंत्री असतानाचा अनुभव व्यावसायिकाने सांगितला. चंडी हे मुख्यमंत्री असताना ते ‘पिपल्स सीएम’ असल्याचे दिसून येत होते. मुख्यमंत्री चंडी यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा कार्यालयात प्रचंड गर्दी होती. कोणी खाली बसले होते, कोणी उभे होते तर कोणी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या हँडलवर बसलेले होते. त्या गर्दीत मला मुख्यमंत्र्यांना शोधावे लागले. शोधता शोधता माझी नजर कार्यालयातील बाथरूमकडे गेली. तेव्हा तिथे चंडी फोनवर बोलताना आढळून आले, असा अनुभव व्यावसायिकाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितला.

तर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कार्यालयातील अनुभवही व्यावसायिकाने सांगितला. विजयन तुम्हाला भेटीसाठी ठराविक वेळ देतात. त्यावेळी तुम्ही तिथे हजर असणे आवश्यक असते. तुमचे बोलणे ते शांतपणे ऐकून घेतात. तुमच्या म्हणणे त्यांना योग्य वाटले तर ते त्यांच्या सेक्रेटरीला बोलावून काय करणे आवश्यक आहे, ते करतात. परंतु, जर तुमचे काम होणार नसेल, तर ते तुम्हाला तसे स्पष्टपणे सांगतात, असे व्यावसायिकाने म्हटले आहे.

बालपण व महाविद्यालयीन शिक्षण

पिनराई विजयन यांचे वडील मुंदायिल कोरन हे ताडी काढण्याचे काम करत, तर त्यांच्या आई कल्याणी कोरन या गृहिणी होत्या. विजयन यांचे प्राथमिक शिक्षण पिनराई गावातील अमाला बेसिक या मिशनरी शाळेत झाले. त्या काळात पिनराई गावातील मुले पाचवी पर्यंत शिकत होती. पिनराई विजयन हे अभ्यासात हुशार होते. त्यामुळे त्यांना पाचवीनंतरही शिकवावे असा आग्रह शिक्षकांनी विजयन यांच्या पालकांकडे धरला होता. थलासरी येथील ब्रेनन कॉलेजमध्ये विजयन यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

पिनराई गावातीलच निवृत्त झालेले शिक्षक के. नानू हे विजयन यांचे बालपणीचे मित्र आहेत. नानू व विजयन हे दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते. नानू यांनी विजयन यांच्याबाबत एक किस्सा सांगितला. “पिनराई गावातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होडीत बसून जावे लागत होते. होडी सेवा मोफत होती. पण, एकदा होडी चालकाने पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर होडी बुडवून टाकेल अशी धमकी त्यांने विद्यार्थ्यांना दिली होती. त्या धमकीला घाबरून विजयन सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांनी नदीत उड्या मारल्या. विजयन मात्र होडीत बसून राहिले. त्यानंतर महाविद्यालयात ते लवकरच विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत होते. केरला स्टुडेंट फेडरेशनचे (सीपीआयची विद्यार्थी संघटना, जी पुढे एसएफआय नावाने ओळखली जाते) ते एक धाडसी नेते झाले”, असे के. नानू यांनी सांगितले.

पिनराई विजयन यांचा विवाह कसा झाला?

विजयन यांच्या विवाहाबद्दलही नानू यांनी माहिती दिली. “विजयन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्याकाळी राजकारण्यांना विवाहासाठी कन्या मिळणे कठीण होते. पण कमला यांचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. कमलाचा विवाह विजयन यांच्याशी करून देताना ते आनंदी होते”, असे नानू म्हणाले. विजयन व कमला यांची मुलगी विना हीचा विवाह केरळचे मंत्री रियास यांच्याशी झाला आहे. तर त्यांचे पुत्र विवेक हे बँकिंग प्रोफेशनल आहेत.

पिनराई विजयन “प्रोफेशनल मुख्यमंत्री” का आहेत?

केरळचे माजी मुख्य सचिव व्ही पी जॉय म्हणाले, पिनराई विजयन हे एक प्रोफेशनल मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पदाचे कामकाज ते प्रोफेशनल पद्धतीने हाताळतात. चर्चा, विचारविनिमय करून ते निर्णय घेतात. एकदा निर्णय घेतला कि त्यात पुन्हा बदल ते करत नाहीत. बैठकांमध्ये ते आधी सर्वांचे ऐकून घेतात. त्यानंतर त्यांचे मत मांडतात. त्यांच्या बैठका अगदी वेळेवर होतात. त्या जवळपास एक तास चालतात. तर केरळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सेखर लुकोज कुरियाकोस म्हणाले, पिनराई विजयन हे संकट काळात योग्य निर्णय घेतात व पुढील धोका टाळतात.

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत विजयन यांची प्रतिमा “डेव्हलपमेंट मॅन” अशी बनवण्यात आली आहे. प्रत्येक बॅनरवर तसा उल्लेख आहे. दरम्यान, एका काँग्रेस नेत्याने म्हटले, “अशी माणसे सत्तेवर राहावीत अशी आमची इच्छा आहे. कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्यांचा अहंकार पाहू शकतील. त्यामुळे आम्हाला संधी मिळू शकते.”