डॉ. देवदत्त पोखरकर
Pitrupaksha Tree Importance Darbha Til Peepal: पूर्वजांनी आपल्याला केवळ घर, जमीन किंवा संपत्ती दिलेली नाही; तर एक निसर्गसंपन्न वारसाही दिलेला आहे. म्हणूनच पितृपक्षाकडे केवळ विधींचा काळ म्हणून न पाहता निसर्गाबद्दल आदरपूर्वक कृतज्ञतेची तसंच पर्यावरण संवर्धनाची व्यापक जाणीव करून देणारा काळ म्हणूनही पाहता येतं.

पितृपक्षाचं निसर्गाशी नातं काय ?

माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अनेक संस्कारांमध्ये वृक्ष, वनस्पती, फुलं, फळं, धान्य आणि गवत इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी मनोभावे पाळला जाणारा पितृपक्षही याला अपवाद ठरत नाही. पितृपक्ष म्हटला की श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि पूर्वजांचं स्मरण एवढ्याच धार्मिक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात; परंतु या परंपरांमध्ये काही वनस्पतींना मिळालेलं स्थान पाहिलं तर भारतीय संस्कृतीचं निसर्गाशी असलेलं घट्ट नि अर्थपूर्ण नातं अधिक स्पष्टपणे जाणवतं.

श्राद्ध आणि तर्पणात मोल कशाकशाचं ?

पितृपक्ष वा पितृपंधरवडा हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा आणि अमावास्येपर्यंत चालणारा कालखंड मानला जातो. या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. प्रदेशांनुसार विधी पद्धती आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये फरक आढळतो. मात्र दर्भ, तीळ, उदक/पाणी, धान्य, फळं आणि विविध वनस्पतीजन्य पदार्थांचा अनेक परंपरांमध्ये समान रितीने वापर दिसून येतो.

दर्भाचं महत्त्व काय?

श्राद्धविधी, तर्पण आणि इतर धार्मिक विधींमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या वनस्पतींपैकी एक म्हणजे, दर्भ. संस्कृतमध्ये कुश किंवा दर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गवताचं शास्त्रीय नाव Desmostachya bipinnata आहे. ही Poaceae म्हणजे गवत कुलातली पाती आहे. भारतीय धार्मिक विधींमध्ये दर्भाला प्राचीन काळापासून विशेष स्थान आहे. अर्थातच, दर्भाचा उपयोग हा केवळ पितृपक्षापुरता मर्यादित नाही. अनेक वैदिक आणि पारंपरिक विधींमध्ये दर्भाचा वापर आढळतो. म्हणूनच दर्भ ही केवळ एक साधी गवताची जात न राहता भारतीय संस्कृतीच्या धार्मिक कार्यातील एक महत्त्वाचा घटक बनली आहे.

काळे तीळ का?

पितृपक्षातील आणखी एक महत्त्वाचा वनस्पतीजन्य घटक म्हणजे तीळ. त्यातही Sesamum indicum या वनस्पतीच्या बियांना धार्मिक विधींमध्ये विशेष स्थान मिळालं आहे. खास करून काळ्या तिळाचा तर्पणामध्ये वापर केला जातो. ‘तिलतर्पण’ हा शब्दच मुळी या परंपरेचं महत्त्व अधोरेखित करतो. तिळाचं धार्मिक महत्त्व मोठं आहेच, पण भारतीय आहारात आणि पारंपरिक तेल निर्मितीतही मोठ्या प्रमाणावर तिळाचा उपयोग केला जातो. तिळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे बियाणं लहान असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल असतं. त्यामुळे प्राचीन काळापासून तीळ हा भारतीय कृषी आणि आहारसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. समृद्धीचं प्रतीकही. धार्मिक विधीमध्ये त्याचा जाणीवपूर्वक वापर झाल्यामुळे अन्नधान्य आणि निसर्गातील उत्पादनांना पवित्र अर्थ देण्याची भारतीय परंपरा इथे प्रकर्षाने दिसून येते.

पितृपरंपरेशी पिंपळाचं नातं काय?

पिंपळ हाही पितृपरंपरेशी जोडला गेलेला पुरातन वृक्ष आहे. Ficus religiosa या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा पिंपळ भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो. अनेक भागांमध्ये पितरांच्या स्मरणाशी संबंधित लोकपरंपरांमध्ये पिंपळाला मोठं स्थान दिलं जातं. इतकंच नव्हे, तर पिंपळाभोवती धार्मिक श्रद्धा मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या दिसतात.मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे, एखाद्या वृक्षाला धार्मिक महत्त्व आहे, याचा अर्थ त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक श्रद्धेचं वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध आहे,असं होत नाही.उदाहरणार्थ, पिंपळाच्या झाडाखाली विशिष्ट विधी केल्यानं पितर प्रत्यक्ष तिथे येतात, अशा श्रद्धांकडे धार्मिक किंवा लोकपरंपरेचा भाग म्हणून पाहता येतं; त्यांनाच वैज्ञानिक तथ्य म्हणून मांडणं योग्य ठरत नाही.

केळीचं पान हवंच

एक देश म्हणून काही समान धार्मिक परंपरा रुजलेल्या असतात. पितृपक्षातल्या विधींबाबतही असंच काहीसं म्हणता येतं. पितृपक्षातला विधी करताना काही प्रदेशांमध्ये केळीची पानं किंवा इतर वनस्पतीजन्य पदार्थांचाही उपयोग केला जातो. त्यातही केळीची पानं भारतीय संस्कृतीत धार्मिक विधी,नैवेद्य आणि सामुदायिक भोजन यांच्याशी जोडलेली आहे. मोठी,रुंद आणि सहज उपलब्ध होणारी केळीची पानं पूर्वीपासून भोजन वाढण्यासाठी वापरली जात आहेत.

पितरांसोबतच निसर्गाचंही स्मरण

पितृपक्षाचा काळ हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऋतूचक्राच्या दृष्टीनंही मोलाचा ठरतो. हा काळ साधारणपणे पावसाळ्याच्या उत्तरार्धाशी संबंधित असतो.भारतीय संस्कृतीत हा काळ शेतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. पाऊस, माती, धान्य, गवत, वनस्पती आणि पशुधन आदी घटकांशी असलेल्या पूर्वापार संबंधांची या काळात अधिक प्रकर्षानं आपल्याला जाणीव होते. खरं तर भारतीय संस्कृतीत ‘अन्न’ आणि ‘जल’ यांना अत्यंत पवित्र स्थान देण्यात आलं आहे. म्हणूनच प्रतिकात्मकरीत्या पितृपक्षातल्या तर्पणामध्ये पाणी अर्पण केलं जातं, तर श्राद्धविधींमध्ये अन्न आणि धान्याला महत्त्व दिलं जातं. या सर्व गोष्टी आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्यामुळे पूर्वजांइतकाच आपण निसर्गाचाही मान राखायला हवा याचीही जाणीव या परंपरांमधून होत असते.

यजमानाचा राखावा मान

निसर्ग हा खराखुरा ज्ञानदाता आहे. तुम्ही जितकं त्याच्या निकट राहता, तितके तुमच्यात आणि त्याच्यात ज्ञानबंध आकारास येत जातात. परस्परांमधलं नातं फुलत राहातं. मात्र, आधुनिक जीवनशैली ही मुख्यतः शहरकेंद्री असल्याने निसर्ग आणि माणसाच्या नात्यात एकप्रकारचं तुटलेपण येऊ लागलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक पारंपरिक वनस्पतींबद्दलचं आपलं ज्ञान हळूहळू कमी होत चाललं आहे. अशा प्रसंगी पितृपक्षात धार्मिक विधींमध्ये उपयोगात येणारा दर्भ नेमका कोणता? तीळ कोणत्या वनस्पतीचं बी आहे? पिंपळ आणि इतर Ficus प्रजातींमध्ये काय फरक आहे? धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर वनस्पतींची शास्त्रीय नावं कोणती? असे जिज्ञासा चाळवणारे प्रश्न नव्या पिढीसमोर ठेवणं गरजेचं आहे. त्या योगे पितृपक्षाच्या निमित्तानं आपण केवळ पूर्वजांचं स्मरण करण्यापेक्षा त्यांच्या काळातलं निसर्गाशी असलेलं नातंही समजून घेऊ शकतो. आपल्या पूर्वजांनी ज्या मातीवर शेती केली, ज्या वनस्पतींचा दैनंदिन उपयोग केला, ज्या वृक्षांच्या सावलीत ते आपलं जीवन जगले आणि ज्या पाण्यावर त्यांचं जीवन विसंबून राहिलं, त्या नैसर्गिक वारशाचं संवर्धन करणं ही पुढच्या पिढीची जबाबदारी आहे ही जाणीव आपण त्यांच्यात रुजवू शकतो. शेवटी,आपण या पृथ्वीतलावरचे पाहुणे असतो आणि निसर्ग हा इथला यजमान. तो कायम राहतो. माणूस निघून जातो, पिढ्या बदलतात; पण वृक्ष, वनस्पती, माती आणि पाणी यांचं संवर्धन केलं तर त्यातूनच पुढच्या पिढ्यांचं जीवन समृद्ध होत राहतं.