करोना महामारीनंतर पॅण्डेमिक हा शब्द सर्वसामान्यांच्या परिचयाचा झाला आहे. करोना महामारीनंतर आता पुढे आणखी काय येणार? यावर जगभरात बराच खल झाला. एक भीषण महामारी पुन्हा जगाच्या दारावर येऊन ठेपली आहे. पण या महामारीचा संसर्ग मानवांमध्ये नाही तर पिकांवर होत आहे. यालाच ‘प्लँट पॅण्डेमिक’ म्हणजेच पिकांवरील महामारी म्हटले जात आहे. ही महामारी पिकांना हानी पोहोचवणारी असली तरी शेवटी नुकसान मात्र मानवाचेच होणार आहे. त्यामुळे आता या महामारीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

PLOS या संकेतस्थळावर Plant Pandemic बद्दलचा संशोधन अहवाल प्रकाशित (११ एप्रिल) करण्यात आला आहे. Plos ही संस्था वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील जगभरातील संशोधकांना त्यांचे संशोधन अहवाल प्रसिद्ध करून देण्यासाठी मदत करते. ‘प्लोस’ची सुरुवात २००० साली हॅरॉल्ड व्हार्मस (Harold Varmus), पॅट्रिक ब्राउन, मायकेल ईसेन यांनी केली. ‘प्लोस’ने जगभरातील वैज्ञानिकांना एक खुले पत्र लिहिले होते, ज्यावर १८० देशांतील ३४ हजार वैज्ञानिकांनी स्वाक्षरी करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.

India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

प्लँट पॅण्डेमिक (Plant Pandemic) म्हणजे काय?

नावावरूनच आपल्याला पिकांशी संबंधित महामारी असल्याचे समजते. या महामारीमुळे पिकांचा नाश होतोय. कृषी क्षेत्रात विविध बुरशीजन्य आजारांना पिकांचे सर्वात मोठे शत्रू मानले जाते. करोना विषाणूप्रमाणेच पिकांवरील रोगाचे विषाणू जलद गतीने उत्परिवर्तन (Mutation) करीत आहेत. अतिसूक्ष्म असलेले हे विषाणू वारा, पाऊस आणि मातीच्या माध्यमातून वेगाने पसरत आहेत. या बुरशीजन्य रोगाचे बिजाणू हे नैसर्गिक पद्धतीने पसरत असतातच. पण आता जागतिक व्यापार आणि वातावरणीय बदल हे घटक बिजाणू वेगाने पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. शक्तिशाली वादळ आणि तीव्र हवामान घटकांमुळे रोग पसरविणाऱ्या बिजाणूंना नव्या प्रदेशात वाहून नेले जात आहे. नव्या प्रदेशातील वनस्पती आणि पिकांची प्रतिकारक शक्ती या नव्या रोगासाठी विकसित झालेली नसते. अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले की, शेतीचे आधुनिकीकरण झाल्यानंतर पिकांना संसर्ग होण्याचा धोका वाढलेला आहे.

धोका काय आहे?

एका नव्या अभ्यासानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे गव्हाचे पिक Wheat Blast या बुरशीजन्य रोगाच्या संक्रमणाला बळी पडत आहे. उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेशात याचा प्रादुर्भाव अधिक पाहायला मिळत आहे. या रोगामुळे पिकांचे पूर्णतः नुकसान होत आहे. सर्वात आधी १९८५ साली ब्राझीलमधील गव्हाच्या पिकावर हा रोग आढळून आला होता. त्यानंतर गव्हाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिना या देशांतही रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला. ‘व्हीट ब्लास्ट’वरील वैज्ञानिक माहितीपुस्तिका जुलै २०२१ मध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे.

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय गहू व्यापारामुळे हा रोग बांगलादेश आणि झाम्बिया (Zambia) देशात पोहोचला आहे. ‘व्हीट ब्लास्ट’च्या वैज्ञानिक पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ‘व्हीट ब्लास्ट’चा धोका उद्भवू शकतो.

ही महामारी किती धोकादायक आहे?

PLOS बायोलॉजीच्या संशोधकांनी पाच खंडांत केलेल्या संशोधनानुसार वैज्ञानिक माहितीपुस्तिका प्रकाशित केलेली आहे. या संशोधनानुसार कीटकनाशक आणि रोगामुळे पिकांच्या उत्पन्नावर २० टक्क्यांचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसले. बांगलादेशात २०१६ साली, जवळपास १५ हजार हेक्टरवरील पिकाला याचा फटका बसला. बांगलादेशच्या एकूण पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी १६ टक्के क्षेत्र यामुळे बाधित झाले. तर झाम्बियामध्ये २०१८ साली या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसले. त्यानंतर नियमितपणे ही महामारी पिकांवर हल्ला करताना दिसून आली, अशी माहिती ‘द इंडिपेंडन्ट’ने दिली आहे.

या रोगाचे बिजाणू हे वारा आणि सदोष बियाणांमुळे वेगाने पसरत आहेत, अशा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे बांगलादेशमध्ये या रोगाचा प्रार्दुभाव दिसल्यानंतर शेजारी असलेल्या भारत आणि चीनमध्येही याचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि चीन हे जगाला गहू निर्यात करणारे दोन मोठे देश आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (University College London) आणि सिन्सबरी लॅबोरेटरी (Sainsbury Laboratory) यांनी संयुक्तपणे काही संशोधकांना घेऊन या बुरशीजन्य रोगाचा अभ्यास केला असता त्यांना कळले की, बांगलादेश आणि झाम्बिया या देशात आढळलेली रोगाची बुरशी आणि दक्षिण अमेरिकेत आढळलेली बुरशी यांच्यामध्ये समान आनुवंशिकता आहे. मात्र या रोगाची उत्पत्ती कशी झाली, याचा शोध लागू शकलेला नाही.

जगाची चिंता का वाढली?

आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या तीनही खंडांत सर्वाधिक गहू उत्पादित केला जातो. येथे रोगाचे संक्रमण वाढल्यास जगासाठी चिंता निर्माण होऊ शकते. बदलते हवामान अशा प्रकारेच रोग पसरविण्यासाठी पोषक ठरते, असे तथ्य काही संशोधनातून समोर आले आहे. ज्यामुळे जगभरातील अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. या तीनही खंडांत झालेले हवामानातील बदल ‘व्हीट ब्लास्ट’चा प्रादुर्भाव वेगाने पसरविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेतच. त्याशिवाय हवामान बदलासोबतच मोठे कृषी क्षेत्र असलेल्या देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही जगावरील अन्नसंकट वाढू शकते, अशी भीती वैज्ञानिक व्यक्त करतात. (युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गहू निर्यातीवर विपरीत परिणाम झाला.)

रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी काय गेले पाहिजे?

करोना महामारीमुळे संपूर्ण जगाला महामारीसोबत कसे झगडायचे, याचे ज्ञान मिळाले. त्यामुळे वैज्ञानिक सांगतात त्याप्रमाणे, या बुरशीजन्य रोगाला रोखण्यासाठी बुरशीमधील जिवाणूंच्या आनुवंशिक बदलांकडे लक्ष ठेवले पाहिजे. ज्या प्रकारे करोना विषाणूच्या उत्परिवर्तन आणि संक्रमणाच्या पद्धतीचा अभ्यास केला गेला, तसाच या प्रकारातही होणे गरजेचे आहे. ज्या देशांमध्ये ‘व्हीट ब्लास्ट’ पसरला आहे, त्यांच्या शेजारील राष्ट्रांनी या रोगाच्या जिवाणूंच्या पेशीतील जनुकांचा संरचनेत होणारे बदल (Genome surveillance) अभ्यासल्यास या बुरशीजन्य रोगाला कसे नियंत्रणात आणायचे, याचा मार्ग निघू शकेल.

जर या रोगाला रोखायचे असेल, त्याचा सामना करायचा असेल तर या बुरशीचा मुकाबला करू शकणाऱ्या प्रतिजैविक जिवाणूंचा शोध घ्यावा लागेल. जागतिकीकरण आणि हवामान बदलामुळे ‘व्हीट ब्लास्ट’ संपूर्ण जगभरात पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्याला यासाठी सज्ज व्हावे लागेल, अशी प्रतिक्रिया सिन्सबरी प्रयोगशाळेचे प्राध्यापक निक टालबोट (Nick Talbot) यांनी दिली. ‘द इंडिपेंडन्ट’ने ज्या संशोधक पथकाची मुलाखत घेतली होती, त्या पथकात निक यांचाही समावेश होता.

आपण संकट आल्यावर त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा संकट येण्याआधीच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार राहायला हवे. हा रोग कसा पसरू शकतो, त्यामुळे किती नुकसान होऊ शकते? याचा अंदाज काढून आतापासूनच तयारीला लागायला हवे, असेही निक म्हणाले.