Plastic Chemicals Effects on Sugar Level : आपण रोज प्लास्टिकच्या डब्यात जेवण ठेवतो, नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक करतो, पॅकेज्ड खाद्यपदार्थांचे सेवन करतो आणि बाटलीबंद पाणीही पितो. या रोजच्या वापराच्या वस्तूंमधून काही कृत्रिम रसायने आपल्या शरीराच्या संपर्कात येत असतात. पण या रसायनांचा परिणाम फक्त पर्यावरणावर किंवा हार्मोन्सवर होतोय का, की आपल्या रक्तातील साखरेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो? याचा अभ्यास सध्या संशोधकांकडून केला जात आहे.
Endocrine-disrupting chemicals (EDCs) म्हणजे शरीरातील हार्मोन्सच्या संदेशवहनात हस्तक्षेप करू शकणारी रसायने. या रसायनांमध्ये Bisphenol A (BPA), phthalates आणि Per- sand polyfluoroalkyl substances (PFAS) यांचा समावेश होतो. खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग, प्लास्टिकच्या वस्तू, नॉन-स्टिक उत्पादनं आणि काही वेळा पिण्याच्या पाण्यातही ही रसायने आढळू शकतात.
या रसायनांचे कोणते परिणाम होतात? यावर संशोधन सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय, या रसायनांचा दीर्घकाळ थोड्या थोड्या प्रमाणात शरीराशी संपर्क होत राहिला, तर शरीरातील चयापचय (metabolism) आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर या रसायनांचा परिणाम होऊ शकतो का?
मधुमेहाचा व्यक्तीला किती धोका आहे हे त्याच्या आनुवंशिकता, आहार, व्यायाम आणि शरीराचे वजन या प्रमुख घटकांवरच ठरत असते. त्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील रसायनांचा मानवी शरीरावर काही अतिरिक्त परिणाम होतोय का, याचाही शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
काही अभ्यासांमध्ये ईडीसी आणि इन्सुलिन रेसिस्टन्स, शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयातील बिघाड किंवा टाइप-२ मधुमेहाचा वाढलेला धोका यांच्यातील संभाव्य संबंध आढळला आहे. मात्र, याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. या रसायनांमुळे थेट मधुमेह होतो का? त्याचे धोके किती गंभीर असू शकतात? याबाबतची अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणूनच घाबरण्यापेक्षा सध्याच्या संशोधनातून नेमकं काय समोर आलंय आणि रोजच्या आयुष्यात कोणती काळजी घेता येऊ शकते, हे तज्ज्ञांकडून समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
EDC मधुमेहाचा संबंध काय?
न्यूट्रिशन इन सिंकच्या प्रमुख आहारतज्ज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञ जीन रिबेरो यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की , ‘याबाबत अनेक क्लाएंट प्रश्न विचारतात. त्यामुळे भीती निर्माण करणाऱ्या मथळ्यांपेक्षा याचं प्रामाणिक उत्तर देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. उपलब्ध पुराव्यांवरून या रसायनांचा मधुमेहाशी संबंध असल्याचे दिसते, पण ते रसायनाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.”
रिबेरो यांच्या मते, बीपीए बाबतचा पुरावा सर्वाधिक सुसंगत आहे. त्या सांगतात की, फ्रान्समध्ये ७५५ लोकांवर नऊ वर्षे संशोधन करण्यात आले. या संशोधनानुसार, इतर जोखमीचे घटक विचारात घेता, बीपीएचा टाइप-२ मधुमेहाशी संबंध असल्याचे आढळले. एकत्रित संशोधनाच्या आकडेवारीनुसार, बीपीएच्या अधिक संपर्कामुळे मधुमेहाचा धोका सुमारे ४५ टक्क्यांनी वाढू शकतो.
थॅलेट्स (Phthalates ) बाबतही काहीसा असाच संबंध दिसतो. १२ हजारांहून अधिक लोकांचा समावेश असलेल्या एका मेटा-अॅनालिसिसमध्ये थॅलेट्सचा संबंध मधुमेहाशी जोडला गेला. थॅलेट्स मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टन्सचा धोका वाढू शकतो.
पीएफएस बाबत मात्र चित्र अजून स्पष्ट नाही. २०२५ मध्ये माउंट सिनाई येथे झालेल्या एका अभ्यासात पीएफएसचा शरीराशी संपर्क वाढल्यास मधुमेहाचा धोका सुमारे ३१ टक्क्यांनी वाढू शकतो, असे दिसून आले. मात्र, इतर काही अभ्यासांमध्ये असा संबंध आढळलेला नाही.
यामागे आणखी एक अडचण आहे. मधुमेह झाल्यानंतर आहार आणि शरीरातील चयापचय प्रक्रिया बदलू शकते. त्यामुळे रक्तातील रसायनांचे प्रमाणही बदलू शकते. अशावेळी रसायनांमुळे मधुमेह झाला की मधुमेहामुळे शरीरातील रसायनांचे प्रमाण बदलले, हे ठरवणे कठीण होते, असे रिबेरो सांगतात.
त्यांच्या मते, ही चिंता पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही; BPA बाबत पुरावे सर्वाधिक ठोस, Phthalates बाबत मध्यम आणि PFAS बाबत अजून संमिश्र आहेत. मात्र, मधुमेहाच्या धोक्यात आहार, वजन आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे घटक या रसायनांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत.
रक्तातील साखरेवर या रसायनांचा परिणाम कसा होतो?
ही रसायने शरीरातील इन्सुलिन आणि हार्मोन्सच्या कामात अडथळा आणून रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडवू शकतात. जीन रिबेरो यांच्या मते, काही रसायने थेट स्वादुपिंडावर परिणाम करतात. उदाहरणार्थ, बीपीए इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर परिणाम करू शकते. बीपीएचा जास्त प्रमाणात संपर्क आल्यास या पेशींना नुकसानही होऊ शकते.
काही रसायने शरीरातील नैसर्गिक हार्मोन्ससारखेच काम करू शकतात. बीपीए इस्ट्रोजेनसारखे काम करू शकते, तर काही रसायने थायरॉईड आणि शरीरातील चरबी साठवणे व इन्सुलिनला प्रतिसाद देणे यासंबंधीच्या प्रक्रियांमध्ये अडथळा आणू शकतात. शिवाय, रोजच्या आयुष्यात आपल्या शरीराचा संपर्क एकाच रसायनाशी नसतो. अनेक रसायनांचा एकत्रित संपर्क असल्याने त्यांचा परिणामही वाढू शकतो.
कोणत्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी?
रिबेरो यांच्या मते, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भावस्थेत शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो. त्याच काळात या रसायनांचा हार्मोनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही रसायने गर्भापर्यंतही पोहोचू शकतात आणि त्यामुळे बाळाच्या पुढील चयापचयावर परिणाम होण्याची शक्यता असते.
लहान मुलांबाबतही विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. बालपणी या रसायनांशी संपर्क आला तर पुढील आयुष्यात मधुमेहाचा धोका वाढवू शकतो, असे काही पुरावे आढळले आहेत; मात्र याबाबत अद्याप ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत.
प्री-डायबेटीस असलेल्या व्यक्तींनीही सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्या शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी आणि इन्सुलिनची कार्यक्षमता आधीच तणावाखाली असते. त्यामुळे गर्भवती महिला, लहान मुले आणि प्री-डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी घाबरून जाण्याऐवजी शक्य तितका अनावश्यक रासायनिक संपर्क कमी ठेवण्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.
मात्र, प्लास्टिकमधील या रसायनांचा संपर्क झाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मधुमेह होतो, असं म्हणता येत नाही. या रसायनांचा रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता संशोधनातून दिसून आली आहे; मात्र त्यांचा मधुमेहाशी नेमका संबंध किती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. त्यामुळे अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणं हा सावधगिरीचा मार्ग ठरू शकतो.
