Giorgia Meloni Partner Breakup Reason: गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि इटली यांच्यातील संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा मिळाला. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी टॉफीचं पाकीट गिफ्ट म्हणून दिलं. जॉर्जिया मेलोनी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा #melody ट्रेंड होत आहे.

#Melody आलं कुठून?

२०२३ साली सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या जी-२० (G20) परिषदेदरम्यान मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचे व्हिडिओ, फोटोज पाहून इंटरनेट युजर्सनी सोशल मीडियावर पहिल्यांदा मेलोडी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. मोदी आणि मेलोनी या आडनावांना (मेलोनी + मोदी) एकत्र करून #Melodi (मेलोडी) हा शब्द तयार केला. त्यानंतर २०२३ च्या डिसेंबर महिन्यात दुबईत पार पडलेल्या COP28 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतः पंतप्रधान मोदींबरोबरचा एक सेल्फी पोस्ट केला आणि त्याला #Melodi असे कॅप्शन दिले. त्यामुळे #Melodi हे जगभरात व्हायरल झाले. तर, २०२४ साली जून महिन्यात झालेल्या जी-७ (G7) परिषदेत मेलोनी यांनी “हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम” असा व्हिडिओ शेअर केला आणि आता पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना प्रत्यक्षात ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिल्याने या ट्रेंडला अधिकच हवा मिळाली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर ४९ वर्षीय इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान त्यांचा कुणी पती किंवा जोडीदार आहे का? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

गार्बाटेलाची ती मुलगी

जॉर्जिया मेलोनी या रोम शहरातील गार्बाटेला या परिसरात लहानाच्या मोठ्या झाल्या. हा परिसर मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांच्या वस्तीसाठी ओळखला जात होता. त्या अवघ्या दीड वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे घरावर गरिबीचे सावट होते. त्यातच घरात लागलेल्या एका भीषण आगीत त्यांचे पहिले घर खाक झाले. परिणामी, शिक्षण पूर्ण करत असताना जॉर्जिया यांनी घराला हातभार लावण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामे केली. कधी लहान मुलांची नॅनी म्हणून काम केले, तर कधी रोममधील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये त्या वेट्रेस आणि बारटेंडर म्हणून वावरल्या. हे सगळं करत असताना वयाच्या पंधराव्या वर्षी जॉर्जिया यांनी एका राजकीय युवा संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.

संघर्षाचे दिवस आणि जिद्द

दिवसा हातात राजकीय फलक आणि रात्री हातात कामाची थाळी, अशा कठीण परिस्थितीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावूनसुलाखून निघाले. त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, त्यांना हिणवलेही गेले. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्या इटलीच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्री झाल्या. सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांच्या सरकारमध्ये त्यांना युवा मंत्रालयाची जबाबदारी मिळाली.

‘ब्रदर्स ऑफ इटली’ची स्थापना

२०१२ साली देशातील प्रस्थापित राजकारणाला कंटाळून जॉर्जिया यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘ब्रदर्स ऑफ इटली’ (Fratelli d’Italia) या नव्या पक्षाची स्थापना केली. इटलीच्या राष्ट्रगीतातील शब्दांवरून हे नाव घेण्यात आले होते. सुरुवातीला या पक्षाला लोकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. २०१३ च्या निवडणुकीत या पक्षाला फक्त २ टक्के मत मिळाली. तरीही जॉर्जिया यांनी हार मानली नाही. देशभर दौरे केले. राष्ट्रवाद, कौटुंबिक मूल्ये आणि देशाच्या अस्मितेचा मुद्दा लावून धरला. एका सभेत त्यांनी दिलेली घोषणा कमालीची गाजली, “मी जॉर्जिया आहे. मी एक स्त्री आहे, मी एक माता आहे, मी इटालियन आहे आणि मी ख्रिश्चन आहे!”

या त्यांच्या विधानाची विरोधकांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. समाजमाध्यमांवर अनेक मीम्स तयार करण्यात आले. या एकाच घोषणेने जॉर्जिया यांना एका रात्रीत ‘पॉप फेनोमेनन’ केले.

ऐतिहासिक विजय आणि सत्तेची धुरा

२०२२ साली इटली राजकीय संकटातून जात होते. करोना महामारीच्या काळात जॉर्जिया यांनी विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न आक्रमकतेने मांडले. त्याच काळात देशात मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. जॉर्जिया यांच्या पक्षाने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत जॉर्जिया यांच्या पक्षाने इतिहास रचला. ज्या पक्षाला कधीकाळी केवळ २ टक्के मते मिळाली होती, तो पक्ष इटलीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी जॉर्जिया या इटलीच्या इतिहासातील ‘पहिल्या महिला पंतप्रधान’ म्हणून संसदेत उभ्या राहिल्या.

जॉर्जिया मेलोनी आणि अँड्रिया गियाम्ब्रुनो

जॉर्जिया मेलोनी यांनी आजवर लग्न केलेले नाही. मेलोनी या इटालियन टेलिव्हिजन पत्रकार अँड्रिया गियाम्ब्रुनो (Andrea Giambruno) यांच्या बरोबर १० वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या. २०१४ च्या सुमारास इटलीतील मीडिया आणि राजकीय वर्तुळात काम करत असताना या दोघांची भेट झाल्याचे सांगितले जाते. ‘मीडियासेट’ (Mediaset) चॅनेलवर निवेदक असलेले गियाम्ब्रुनो नात्याच्या सुरुवातीच्या वर्षांत प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच होते.

प्रेमाचा अंकुर

त्यांची पहिली भेट २०१४ साली एका टीव्ही शोच्या सेटवर झाली. जॉर्जिया मेलोनी एका राजकीय कार्यक्रमात मुलाखतीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी मेलोनी यांना भूक लागली होती, म्हणून त्या ब्रेक दरम्यान सेटवरच एक केळ खात होत्या. ब्रेक संपत आला तरी त्यांच्या हातात केळ तसच होतं. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले अँड्रिया गियाम्ब्रुनो (जे त्या शोचे सायलेन्ट डायरेक्टर म्हणून काम पाहत होते) धावत आले आणि त्यांनी मेलोनी यांच्या हातातून ते केळ हिसकावून घेतलं. जेणेकरून कॅमेऱ्यात त्या केळ्यासह दिसणार नाहीत. इथूनच प्रेमाचा अंकुर फुलण्यास सुरुवात झाली होती.

१० वर्षे लिव्ह-इन

मेलोनी आणि गियाम्ब्रुनो यांनी कधीही लग्न केले नाही, पण ते दोघे जवळपास १० वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहिले. २०१६ साली त्यांना (जिनेव्रा-Ginevra) मुलगी झाली. मेलोनी या अत्यंत कट्टर उजव्या विचारसरणीच्या (Conservative) नेत्या आहेत, त्या पारंपारिक कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार करतात. त्यामुळे त्यांनी स्वतः लग्न न करता लिव्ह-इनमध्ये राहणे हा इटलीत अनेकांसाठी आश्चर्यात पाडणारा विषय होता. जॉर्जिया मेलोनी या देशाच्या पंतप्रधान झाल्या, तर गियाम्ब्रुनो हे एका आघाडीच्या चॅनेलवर टीव्ही अँकर म्हणून काम करत होते. २०२२ मध्ये ‘ब्रदर्स ऑफ इटली’ (Brothers of Italy) पक्ष सत्तेवर आल्यानंतर गियाम्ब्रुनो अनेकदा जॉर्जिया मेलोनींबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असत. ते त्या काळातील युरोपियन नेत्यांच्या जोडीदारांपैकी एक अत्यंत सुप्रसिद्ध चेहरा ठरले होते.

ब्रेकअप कसा आणि का झाला? (२०२३)

२०२३ साली गियाम्ब्रुनो यांच्या काही क्लिप्स लीक झाल्या. त्यात ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलताना, फ्लर्ट करताना आणि काही आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत होते. हे प्रकरण समोर आल्यावर संपूर्ण इटलीत खळबळ उडाली. पंतप्रधान म्हणून मेलोनी यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत होता. मेलोनी यांनी अजिबात वेळ न घालवता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अँड्रिया गियाम्ब्रुनो यांच्याशी आपले १० वर्षांचे नाते संपल्याची घोषणा केली.

Photo via Facebook/Giorgia Meloni
Photo via Facebook/Giorgia Meloni

जॉर्जिया मेलोनी यांची पोस्ट

“अँड्रिया गियाम्ब्रुनो बरोबरचे माझे नाते जवळपास १० वर्षे टिकले, ते आता संपले आहे. आम्ही जे एकत्र सुंदर क्षण घालवले आणि आम्हाला मिळालेल्या जिनेव्रा या मुलीसाठी मी त्याचे आभार मानते. आमचे रस्ते काही काळापूर्वीच वेगळे झाले होते, आता ते अधिकृतपणे मान्य करण्याची वेळ आली आहे.” यावेळी त्यांनी आपल्या स्वतःच्या लहानपणाचाही एक दुर्मीळ संदर्भ दिला. लहान असताना त्यांच्या वडिलांनी कुटुंबाला कसे सोडून दिले होते याची आठवणही त्यांनी या पोस्टमध्ये करून दिली होती.

(Facebook/Giorgia Meloni)

ब्रेकअपनंतर….

या ब्रेकअपनंतर, मेलोनी यांचे नाव सार्वजनिकरित्या इतर कोणत्याही नवीन जोडीदाराशी जोडले गेलेले नाही आणि त्या आजही अविवाहितच आहेत. एका केळ्याच्या किश्श्यावरून सुरू झालेली या रोमँटिक लव्ह स्टोरीचा राजकीय दबाव, टीव्ही इंडस्ट्रीतील ग्लॅमर आणि वैयक्तिक वादांमुळे शेवट झाला. नाते संपले असले तरी, दोघेही मिळून त्यांच्या मुलीचा (जिनेव्रा) सांभाळ करत आहेत.