Who Was Sewdass Sadhu? भारतीय वंशाच्या एका सामान्य गिरमिटिया कामगाराने इतिहास घडवला. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या समुद्राच्या काळ्याशार लाटांमध्ये तब्बल ८० वर्षांपूर्वी त्याने एक भव्य हिंदू मंदिर उभारलं. त्या काळात परदेशात, तेही समुद्रात मंदिर उभारणं ही केवळ दुर्मीळच नव्हे तर असाधारण अशी गोष्ट होती. हे मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर त्यामागे जिद्दीचा, श्रद्धेचा आणि अथक संघर्षाचा एक प्रेरणादायी इतिहास आहे.
हा एका वास्तूचा इतिहास नाही, तर एका स्वप्नवेड्या माणसाच्या निश्चयाचा प्रवास आहे. त्याने सायकलवर बांधकाम साहित्य वाहून, समुद्राच्या विरोधात २५ वर्षं झगडत अखेर हे मंदिर उभं केलं. हेच ते ‘टेम्पल इन द सी’ जे आजही भारतीय परंपरेचा आशेचा किरण ठरत समुद्रात तेजाने झळकत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या भारतीय वंशाच्या मोठ्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय मुळं असलेल्या अनेक नामवंत व्यक्तींचा उल्लेख केला. त्यामध्ये गणितज्ज्ञ व राजकारणी डॉ. रुद्रनाथ कॅपिलदेव (१९२०–७०), त्रिनिदादचे प्रसिद्ध संगीतकार व ‘चटनी किंग’ (King of Chutney) सुंदर पोपो आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरेन गंगा यांचा समावेश होता.
मोदींनी यावेळी तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या सेवादास साधू यांचाही उल्लेख केला. ते एक करारशर्तीखाली (indentured labourer) काम करणारे कामगार होते. त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर ‘टेम्पल इन द सी’ (समुद्रातील मंदिर) नावाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर बांधले. हे मंदिर त्रिनिदाद आणि व्हेनेझुएलामधील पॅरिया उपसागरात आहे. सेवादास साधू हे त्रिनिदाद आणि टोबॅगोचे दशरथ मांझी म्हणूनही ओळखले जातात.
समुद्रातील मंदिर
सेवादास साधू शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदिर वॉटरलू, कारापिचायमा (पोर्ट ऑफ स्पेनच्या दक्षिणेला) येथे आहे. या मंदिराची पहिली उभारणी १९५५ साली झाली. पॅरिया उपसागराच्या निसर्गरम्य जलराशीने वेढलेले हे मंदिर जमिनीला एका मार्गिकेद्वारे जोडले गेले आहे. या मंदिराची रचना मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या समुद्रातून जाणाऱ्या एक मार्गिकेसारखी भासते. या परिसरातच कारापिचायमामधील दत्तात्रेय मंदिराजवळ उभे असलेले ८५ फूट उंच हनुमानाचे भव्य मूळ स्वरूपही लक्ष वेधून घेते.
सेवादास साधू शिव मंदिर हे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, जगभरातून भाविक आणि पर्यटक येथे येतात. या मंदिरात हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्राचे अनेक पारंपरिक घटक पाहायला मिळतात. मंदिरातील मंडप, गोपुरम् (द्रविडीय मंदिर स्थापत्यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार) आणि नक्षीदार छताची रचना हे विशेष उल्लेखनीय आहेत.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय वंशाचे हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणांच्या काळात हे मंदिर धार्मिक उत्सवांचे केंद्र असते.
मंदिर बांधणारे साधू
सेवादास साधूंनी १९४७ साली समुद्रकिनाऱ्यावर पहिले मंदिर बांधले होते. परंतु, ते पाडण्यात आले कारण ते मॅकमिलन पार्कमध्ये बांधले होते. हे पार्क टेट अॅण्ड लायल लिमिटेड या प्रमुख साखर कंपनीची खासगी मालमत्ता होते. यामुळे सेवादास साधूंना तुरुंगवासही भोगावा लागला.
परंतु, त्यांनी मंदिर बांधायची जिद्द सोडली नाही. त्यानंतर त्यांनी समुद्रातच मंदिर उभारले. ते सांगत की, पाणी कुणाच्या खासगी मालकीचं नसतं. त्यांनी हे काम एकट्याने, तब्बल २५ वर्षं सातत्याने केलं. केवळ स्वतःची सायकल वापरून त्यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य त्या ठिकाणी नेलं आणि शेवटी तिथे एक अष्टकोनी, एक मजली मंदिर उभं राहिलं.
सेवादाससाधूंची ही कथा बिहारच्या दशरथ मांझी यांच्याशी साधर्म्य दर्शवते. त्यांनी केवळ हातोडा आणि छिन्नीच्या साहाय्याने २२ वर्षं मेहनत करून एकट्याने डोंगर फोडून आपल्या गहलौर गावाला गया शहराशी जोडणारा रस्ता तयार केला होता.
प्रवासी भारतीयांचा संबंध
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकसंख्येपैकी जवळपास ४० टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. या भारतीय-त्रिनिदादीयन समुदायातील सुमारे निम्मे लोक हिंदू आहेत, तर उर्वरित मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख धर्माचे आहेत.
पहिले भारतीय १८४५ साली या बेटांवर आले. त्यामध्ये बहुतांश लोक आजच्या बिहारमधील भोजपूर आणि उत्तर प्रदेशातील अवध भागातून आलेले करारशर्तीखालील मजूर होते.
२०२५ साली त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय आगमनाच्या १८० वर्षांचा उत्सव साजरा होत आहे. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले की, आता भारतीय वंशाच्या सहाव्या पिढीपर्यंतच्या लोकांना OCI (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया) कार्ड दिले जाईल. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की, भारतीय सरकार गिरमिटिया वारशाच्या जतनासाठी अनेक उपक्रमांना पाठिंबा देईल.