PM Modi Gold Purchase Appeal and 1962 India China War Nehru Gold Donation: अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधातील संघर्षाच्या झळा संपूर्ण जगाला बसल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील अडथळ्यांमुळे कच्चे तेल आणि खतांच्या किंमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रविवारी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुढील एक वर्ष सोनं खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे, परकीय चलनाची बचत करण्यासाठी स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचे आणि आणि इंधन बचतीसाठी मेट्रोने प्रवास करण्याचे तसेच घरून काम करण्याचे आवाहन केले.
२०२५-२६ या कालखंडात भारतामध्ये होणाऱ्या सोन्याच्या आयातीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ ७१.९८ अब्ज डॉलर (₹६.७७ लाख कोटी) इतकी विक्रमी आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. राहुल गांधींनी या आवाहनाचे वर्णन ‘अपयशाचा पुरावा’ असे केले. परंतु, पंतप्रधान मोदी हे संकटकाळात असे आवाहन करणारे पहिलेच पंतप्रधान नाहीत. किंबहुना ६४ वर्षांपूर्वी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी अर्थात पंडित नेहरूंनी केलेले आवाहन आजच्या पार्श्वभूमीवरही चर्चेचा विषय ठरले आहे.
६४ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
चीनने १९५० नंतर तिबेटवर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. तिबेटमधील श्रद्धास्थानांत बौद्ध धर्म आणि दलाई लामा यांना महत्त्वाचे स्थान आहे. चिनी हस्तक्षेपामुळे तिबेटची पारंपरिक राजकीय व्यवस्था, धार्मिक स्वायत्तता तसेच स्थानिक सत्ताकेंद्रांवर दबाव वाढला. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली. त्याचाच परिपाक १९५९ साली झाला. १९५९ साली मार्च महिन्यात ल्हासा येथे चिनी अधिकारी दलाई लामांना कधीही ताब्यात घेऊ शकतात, असे वृत्त आले आणि परिणामी चीन सरकारचा निषेध करण्यासाठी तिबेटी जनता रस्त्यावर उतरली.

या उठावानंतर भारताने दलाई लामांना आश्रय दिला. त्यामुळे भारत-चीन संबंध अधिकच ताणले गेले. सीमावर्ती भागात संघर्ष वाढला. विशेषतः ३० एप्रिल १९६२ नंतर लडाख भागात चीन अधिकच आक्रमक झाले. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने लडाख आणि ईशान्य सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले. अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांचे लक्ष क्यूबावर केंद्रित असताना चीनने भारताविरुद्ध कारवाई करण्याची वेळ निवडली असावी, असे काही इतिहासकार मानतात. परंतु, याच कारणामुळे चीनने हल्ला केला असे सिद्ध झालेले नाही.
चीनने सुरूवातीला लडाख तसेच ईशान्य सीमावर्ती भागातील मॅकमहोन रेषेपलीकडील वादग्रस्त प्रदेशात घुसखोरी केली. या युद्धातील बहुतांश लढाया डोंगराळ भागात झाल्या. ४००० मीटर पेक्षा (१३,००० फूट) जास्त उंचीवर मोठ्या प्रमाणावर युद्ध लढले गेले. विशेष म्हणजे, या संपूर्ण युद्धात दोन्ही बाजूंनी नौदल वा वायुदलाचा वापर करण्यात आला नाही; हे युद्धं पूर्णपणे जमिनीवर लढले गेले. भारत-चीन युद्ध हे सिनो-इंडियन युद्ध किंवा इंडो-चायना युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे.

पंडित नेहरूंनी भारतीयांना दान करण्याचे आवाहन का केले?
१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नागरिकांना राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी (Prime Minister’s National Defence Fund) सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशव्यापी मोहीम राबवून भारतीयांना योगदान देण्याचे आवाहन केले. युद्धानंतरही चीनच्या ताब्यात भारताची १४,००० चौरस मैल भूमी आहे आणि चीनकडून सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरूच आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. आपल्या भूमीतून शेवटचा आक्रमक हुसकावून लावला जाईपर्यंत विश्रांती न घेण्याची प्रतिज्ञा आपण पुन्हा नव्याने करूया,”असे त्या आवाहनात म्हटले होते.
तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी लोकांना पैसे, महिलांना सोन्याचे दागिने आणि उबदार लोकरीचे कपडे दान करण्याचेही आवाहन केले होते. या मोहिमेदरम्यान वापरण्यात आलेले एक वाक्य उभ्या देशाच्या काळजाला भिडले; त्यात म्हटले होते की, “आपण सोने दान करूया. कारण उद्या जर आपल्या सगळ्यांच्या हातापायांत लोखंडी बेड्या पडणार असतील, तर आज त्या सोन्याच्या बांगड्यांचा उपयोग तरी काय?” इतकचं नाही तर फिल्म्स डिव्हिजनकडून तशा जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या.
Video (सौजन्य: युट्यूब)
Prime Minister’s National Defence Fund मागील उद्दीष्ट
सरकारने या मोहिमेमागे नागरिकांचे आणि मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवणे, भारताची भौगोलिक अखंडता अबाधित राखणे आणि शांततेचे संरक्षण करणे ही उद्दीष्ट्ये आहेत, असे स्पष्ट केले होते.
इंदिरा गांधींनी सोन्याचे दागिने दान केले
१९६२ च्या युद्धकाळात योगदान देणाऱ्यांमध्ये इंदिरा गांधी यांचाही समावेश होता. नंतर त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या. संरक्षण मंत्रालयाने २००९ साली प्रकाशित केलेल्या एका कॉफी टेबल पुस्तकात, युद्धाच्या काळात इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय मदतनिधीसाठी ३६७ ग्रॅम सोन्याचे दागिने दान केले होते, असे म्हटले आहे. त्यांनी दागिने दान करतानाचा फोटोही प्रकाशित केला होता.

राजस्थानातील बर्धाना खुर्द या गावातील सुमारे २५० कुटुंबांनी आपल्या प्रत्येक घरातून एक मुलगा सैन्यात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. एकूणच डिफेन्स ऑफ इंडिया फंडासाठी रोख स्वरूपात २२० दशलक्ष डॉलरहून अधिक निधी जमा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु, किती देणगी मिळाली याचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे फेलो मनोज जोशी यांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी डिफेन्स ऑफ इंडिया फंडासाठी दान करण्यात आलेले विस्मृतीत गेलेले अनेक सोन्याचे दागिने आजही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीत पडून आहेत (Scroll-2015).
फिल्म्स डिव्हिजनच्या प्रचारजाहिरातीत सोने दान केल्यास विजय निश्चित होईल, असेही सूचित करण्यात आले होते. परंतु, या देणगी मोहिमेचा प्रत्यक्ष उपयोग नेमका किती झाला, हे कधी स्पष्ट झाले नाही; तरी या रोख मदतीमुळे अर्थसंकल्पावरील मोठा ताण काही प्रमाणात हलका झाल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात. कर्नाटक विधानसभेच्या २ डिसेंबर १९६३ च्या प्रश्नोत्तर नोंदीत “१५ ऑगस्ट १९६३ पर्यंत नॅशनल डिफेन्स फंडाला राज्यातून जमा झालेली रक्कम आणि सोने” (Total Amount of Money and Gold Contributed to the National Defence Fund upto 15th August 1963 in the State) असा स्वतंत्र विषय नोंदलेला आहे. यावरून अशा आकड्यांची सरकारी पातळीवर नोंद होत होती, हे दिसते
या एकात्मता मोहिमेचे इतरही परिणाम दिसून आले. तमिळनाडूमधील फुटीरतावादी चळवळ लवकरच शांत झाली, कामगार संघटनांनी सर्व संप मागे घेतले. १९६२ च्या युद्धानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रीय एकजुटीमुळे, नॅशनल इंटिग्रेशन कौन्सिलची स्थापना ज्या उद्देशाने झाली होती, तो उद्देश एका रात्रीत साध्य झाल्याचे म्हटले गेले.
१९६२ च्या युद्धात भारताच्या गळ्यात विजयमाला पडली नाही. प्रत्यक्षात बीजिंगने २० नोव्हेंबर १९६२ रोजी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आणि त्यानंतर माघार घेतली. मात्र, नेमके काय चुकले याचे संपूर्ण विश्लेषण आजतागायत (Henderson Brooks–Bhagat) सार्वजनिक झालेले नाही.
संदर्भ सूची:
- Nehru Archive. Appeal for Contributions (27 October 1962).
- Nehru Archive. To M.G. Ramachandran: Contribution for Troops (27 October 1962).
- News On AIR. Prime Minister Narendra Modi makes seven appeals for economic self-reliance (11 May 2026).
- Scroll. Nehru asked Indians to give jewellery to fund the 1962 war, and some of it is still in RBI (2015).
