देशभरात आज भाजप शक्तिमान पक्ष म्हणून पुढे आला असला तरी दोन राज्ये अशी आहेत की, जेथे भाजपला कधी चार-पाचपेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नाहीत. तमिळनाडू आणि केरळ येथे भाजपचा प्रभाव मर्यादित राहिला. दक्षिणेकडील या दोन्ही राज्यांत प्रभाव वाढविण्यासाठी भाजपचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या धडाकेबाज दौऱ्यांकडे त्या दृष्टीने पाहावे लागेल.

चार राज्यांत निवडणूकज्वर

एप्रिलच्या मध्यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. आसाममध्ये भाजप तर पुदुच्चेरीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हॅटट्रिकसाठी रणनीती आखत असून तमिळनाडूत द्रमुक सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. केरळमध्ये गेल्या वेळी सलग दुसऱ्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला सत्ता मिळाली होती. यंदा या राज्यात काँग्रेसच्या आघाडीला संधी असल्याचे गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालातून दिसले. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे डाव्या आघाडीची वाट येथे बिकट दिसते. केरळमध्ये आतापर्यंत भाजपचे नाममात्र अस्तित्व दिसले. गेल्या म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केरळमध्ये खाते उघडले. पाठोपाठ राजधानी थिरुअनंतपुरम महापालिकेत यश मिळाल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या केरळ दौऱ्याकडे पाहिले जाते. कोची येथे झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवत भाजपने धोरण बदलले. चंद्रशेखर यांनी सर्वच समाजघटकांशी संवाद साधत पक्षविस्तार केला. परिणामी राज्यात भाजप एक शक्ती म्हणून पुढे आला आहे.

पंतप्रधानांचे केरळवर लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत तीनदा केरळचा दौरा केला. त्यात धार्मिक स्थळी दर्शनाबरोबरच पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले. यात हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्याला विकासाची जोड देण्याचा हा प्रयत्न. जानेवारीत दोन वेळा तर मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात पंतप्रधानांचा केरळ दौरा झाला. कोची येथील कार्यक्रमात दहा हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. त्या वेळी सभेत पश्चिम आशियातील संघर्षाचा विशेषत्वाने उल्लेख केला. आखातात केरळी मोठ्या संख्येने आहेत. सरकार अनिवासी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. धीवरा समाजाच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. काँग्रेस व डाव्या पक्षांना लक्ष्य करत भाजपसाठी वातावरणनिर्मिती केली. केरळमध्ये २६ टक्के मुस्लीम तर १८ टक्के ख्रिश्चन आहेत. भाजप गेली काही वर्षे ख्रिश्चन मते वळवण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी शबरीमाला मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित करत या संवेदनशील मुद्द्यावर राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारला जाब विचारला. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहील अशी चिन्हे आहेत. सध्या केरळ विधानसभेत भाजपचा एकही सदस्य नाही. विधानसभेच्या १४० जागा असून, २०१६ मध्ये जिंकलेली एकमेव जागा ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एका जागा जिंकता आली असली तरी, विधानसभेच्या ११ मतदारसंघांत भाजप काँग्रेस व डाव्या पक्षांच्या विरोधात क्रमांक एकवर होता. त्यामुळे यंदा विधानसभेला दोन आकडी संख्येत भाजप मजल मारणार का, याची चर्चा केली जात आहे. त्या दृष्टीने पंतप्रधानांच्या दौऱ्यांचे महत्त्व आहे.

तमिळनाडूत चुरस

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच (दि. १) पंतप्रधानांनी पुदुच्चेरीसह मदुराईत सभा घेतल्या. पुदुच्चेरीत एन. आर. काँग्रेसच्या एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. दोन्ही ठिकाणी पंतप्रधानांनी द्रमुकवर जोरदार टीका केली. तमिळनाडूत भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत असला, तरी त्यांचा प्रमुख मित्रपक्ष असलेला अण्णा द्रमुक मात्र याबाबत वेगळी भूमिका घेत आहे. तमिळनाडूतील परंपरांचा काँग्रेसने आदर केला नाही असा आरोप पंतप्रधानांनी मदुराईत केला. त्यासाठी जलिकट्टूवर बंदी आणल्याचा दाखला दिला. व्यासपीठावर अण्णा द्रमुकचे सर्वेसर्वा ई. के. पलानीस्वामी तसेच अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम व पट्टली मक्कल काचीचे नेते उपस्थित होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी भाजपच्या आव्हानाला आतापर्यंत यशस्वीपणे तोंड दिले आहे. त्यामुळे भाजपसाठी तमिळनाडूचा मार्ग कठीण आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी भाजपच्या वाट्याला अण्णा द्रमुक ३० ते ३५ जागाच देईल अशी शक्यता आहे. आता भाजपचे केवळ चार आमदार आहेत. उत्तर भारतातील पक्ष अशी तमिळनाडूत भाजपची प्रतिमा आहे. त्यातच द्रमुकने प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर राज्यात भाजपची डाळ शिजू दिलेली नाही. आताही त्यांनी डीआयडीएम व अन्य छोट्या पक्षांची मोट बांधत सत्ता राखण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कझागम या पक्षाच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. राज्यात तिरंगी सामना आहे. सर्वाधिक मंदिरे असलेले राज्य असा तमिळनाडूचा उल्लेख अनेकदा होतो. तरीही भाजपला हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर येथे आजवर फारसे यश मिळालेले नाही. अण्णा द्रमुकच्या मदतीने गेल्या विधानसभेला भाजपला चार जागा जिंकता आल्या. लोकसभेला (२०२४) मतांची टक्केवारी वाढली हे समाधान असले तरी जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेच्या जोरावर भाजप यंदा द्रमुकला शह देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या दौऱ्यांना महत्त्व आहे.