PM Narendra Modi vs Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विशेष बैठकीला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. २०१४ नंतर भारताने केलेल्या प्रगतीचे श्रेय आपल्या नेतृत्वाखालील सरकारला देताना त्यांनी देशाला काँग्रेसच्या दुष्टचक्रातून मुक्त केल्याचा दावा केला. त्याचवेळी सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांनी केलेल्या गौरवाचे मोदी यांनी आभार मानले. हा माझा वैयक्तिक सन्मान नसून आघाडीतील सर्व घटक आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या सामूहिक योगदानाचे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून कोणते ५ प्रमुख मुद्दे मांडले, त्याबाबत जाणून घेऊ…

“काँग्रेसच्या नाकर्तेपणाने हिंदू बदनाम”

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसच्या जुन्या आर्थिक धोरणांना लक्ष्य केले.
देश आता काँग्रेसच्या मानसिकतेतून मुक्त झाला आहे. भारतात विकासाचा वेग कायमच संथ गतीने राहील, अशी भावना काँग्रेसने लोकांच्या मनात निर्माण केली होती. त्यांनी या संथ आर्थिक विकासाला धूर्तपणे ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. वास्तविक पाहता ते अपयश काँग्रेसचेच होते; पण त्याचे खापर मात्र हिंदूंच्या माथ्यावर फोडले गेले. त्यामुळे त्याला काँग्रेसचा विकास दर असे म्हणायला हवे होते, असा घणाघात मोदी यांनी केला. त्याच वेळी, २०१४ पासूनच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशाला काँग्रेसच्या ‘दुष्टचक्रातून’ मुक्त केल्याचा दावाही त्यांनी केला. ‘हिंदू विकास दर’ ही संज्ञा विशेषतः १९५० आणि १९६० च्या दशकात भारताच्या आर्थिक विकासदराचा उल्लेख करण्यासाठी वापरली जात होती. आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचताना पंतप्रधान म्हणाले की, ‘काँग्रेसचा विकासदर’ आणि ‘एनडीएचा विकासदर’ यातील हाच मुख्य फरक आहे.

भाजपाच्या मित्रपक्षांचे तोंडभरून कौतुक

सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांचे आभार मानले. सलग सर्वाधिक काळ सेवा करणारा लोकनियुक्त पंतप्रधान होण्याची संधी मला मिळेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. हे माझे भाग्य असून ते ईश्वराच्या कृपेनेच शक्य झाले आहे. माझ्यासाठी देशातील जनता हीच ईश्वर आहे. हा प्रवास एका यज्ञासारखा असून त्यात तुम्ही सर्वांनी आपले योगदान दिले, असे म्हणत मोदींनी भाजपाच्या मित्रपक्षांचे आभार मानले. या ऐतिहासिक प्रसंगी एनडीएतील घटक पक्षांनी एकमताने विशेष ठराव मंजूर केला. त्याबाबत बोलताना हे माझे वैयक्तिक यश नसून, आपल्या सर्वांचा सामूहिक विजय आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

“स्थिर सरकारमुळे विकासाला गती मिळाली”

देशातील मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आपल्याला इतका दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाल्याचे मोदी यांनी नमूद केले. देशाने आता स्थिर सरकारचे फायदे अनुभवण्यास सुरुवात केली आहे. पूर्वीच्या दशकांतील राजकीय अस्थिरतेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. मात्र आज नागरिक स्थिर सरकारचे सकारात्मक परिणाम दिसत असून विकासाला गती मिळाली आहे. २०१४ मध्ये जनतेच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या होत्या, याचीही पंतप्रधानांनी आठवण करून दिली. काँग्रेसने केलेल्या विश्वासघातानंतर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही हा विश्वास सार्थ करून दाखवला. २०१४ मध्ये उगवलेला आशेचा सूर्य आता आत्मविश्वासाचा ‘प्रकाशपुंज’ बनला आहे, असेही मोदी म्हणाले.

एनडीए सरकारच्या कामगिरीचा उल्लेख

गेल्या काही वर्षांत २५ कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचा दावाही मोदी यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची धोरणे योग्य दिशेने सुरू असल्यामुळे देशातील गरीब जनतेला आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा आत्मविश्वास मिळाला. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारला २४ तास काम करावे लागेल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात देशात आशेचा किरण निर्माण झाला होता, मात्र त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचार वाढला, असा आरोप मोदी यांनी केला. २०१४ पासून पुन्हा एनडीएचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशाचे नशीब बदलले. अनेक दशकांत पूर्ण न झालेली कामे काही महिन्यांत पूर्ण होऊ लागली, असे सांगत त्यांनी विमानतळांची उभारणी, मेट्रो नेटवर्कचा विस्तार, संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढ आणि इतर विकासकामांचा उल्लेख केला. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २५ कोटींवरून १०० कोटींवर पोहोचल्याचे सांगत आज भारत डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत अग्रस्थानी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. करोनासारख्या महामारीवर भारताने यशस्वीपणे मात केली. जगातील अनेक अर्थव्यवस्था अजूनही अडचणीत असतानाही आपल्या देशाचा आर्थिक विकासदर ७.७ टक्के आहे, असेही त्यांनी नमूद केले.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय

देशातील फुटीच्या घटनांवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारने मध्यमवर्गीयांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिल्याचे सांगितले. पूर्वीच्या सरकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे मध्यमवर्ग त्रस्त होता, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही मध्यमवर्गाच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या. त्यामुळे आज वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तसेच उत्तम पायाभूत सुविधांमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेमुळे मध्यमवर्गाला फायदा झाल्याचा झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात मध्यमवर्गाची महत्त्वाची भूमिका आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे आमचे ध्येय असून त्याकरिता विकासाचा वेग आणखीच वाढवावा लागेल, असे म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.