पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेत वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कांग्रा शैलीतील एक चित्र भेट म्हणून दिले. तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांनी ‘माता नी पचेडी’ हे मंदिरामध्ये अर्पण करण्यात येणारे गुजरातमध्ये निर्मिती केले जाणारे एक कापड भेट म्हणून दिले. मात्र या सर्व भेटवस्तूंपैकी मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिलेल्या ‘पाटण पटोला’ शैलीत विणकाम केलेल्या खास स्कार्फची चर्चा होत आहे. हा पाटण पटोला स्कार्फ कसा आहे? तो कशापासून बनवण्यात येतो? या स्कार्फचे महत्त्व काय आहे? यावर एक नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : पैसा, संघाचा समोतल की अन्य काही, IPL मध्ये फ्रँचायझी खेळाडूंना संघमुक्त का करतात?

पाटण पटोला शैलीत विण्यात येणाऱ्या कापडाची निर्मिती प्रामुख्याने गुजरातमध्ये केली जाते. हा कपडा हाताने विणला जातो. गुजरातमधील साळवी कुटुंब प्रामुख्याने हे काम करते. या कुटुंबातील ७० वर्षीय रोहित यांच्यापासून ते सर्वात तरुण ३७ वर्षीय सावनपर्यंत सर्व सदस्य हे काम करतात. साळवी कुटुंबात पाच पुरूष आणि ४ महिला असे एकूण ९ सदस्य आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

पाटण पटोला शैलीत विण्यात येणाऱ्या वस्त्राबद्दल साळवी यांनी अधिक माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महायुद्धापूर्वी प्रामुख्याने इंडोनेशिया देशातून पाटण पटोला वस्त्राला मागणी होती. सोळंकी वंशाचे राजा कुमारपाल यांनी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून पटोला शैलीत वस्त्राचे विणकाम करणाऱ्या ७०० कुटुंबांना उत्तर गुजरातमध्ये वास्तव्यास बोलावले होते. यापैकीच साळवी हेदेखील आहेत. साळवी कुटुंबाच्या या विणकामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

“पाटण पटोला शैलीत सहा यार्डच्या एका साडीची निर्मिती करण्यासाठी साधारण तीन ते चार महिने लागतात. दोन विणकरांनी सोबत काम केल्यास एका दिवसात ते फक्त ८ ते ९ इंचापर्यंतच विणकाम करू शकतात. चार ते पाच माणसांनी काम केले तर एका साडीला ४० ते ५० दिवस लागू शकतात. साडीवर विणकाम किचकट असेल तर हा कालावधी वाढू शकतो,” असे ४४ वर्षीय राहुल साळवी यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे विणकाम करण्यासाठी अत्यंत कुशल कारागीर लागतो.

पाटण पटोला शैलीत वस्त्रनिर्मिती करताना त्यावर मानवी आकृती, नारीकुंज, फुलवाडी, फुले, प्राणी, पक्षी, आदी आकृत्यांचे विणकाम केले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण : बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रेग्नन्सी; करिअरवर काय परिणाम होतो? आलिया भट्टमुळे चर्चेला उधाण!

पाटण पटोला शैलीतील वस्त्रांची किंमत किती असते?

पाटण पटोला शैलीतील वस्त्र परिधान करणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जाते. या वस्त्राची खरेदी करणे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पाटण पटोला शैलीतील विणकाम केलेल्या एका साडीची कमीतकमी किंमत १.५ लाख रुपये आहे. नंतर ही किंमत ६ लाख रुपयांपर्यंत वाढते. ४६ इंच लांबी असलेली ओढणी किंवा स्कार्फ खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत ८० हजार रुपयांच्या घरात असते. स्कार्फवरील विणकामानुसार ही किंमत कमीजास्त होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : मेटा, ट्विटरसह आणखी कोणत्या कंपन्यांकडून नोकरकपात? आर्थिक फटका रोखण्यासाठी घेतला जातोय निर्णय

राजकोट पटोला शैलीत विणकाम केलेली एक साडी ७० हजार रुपयांपासून ते १.२५ लाख रुपयांपर्यंत आहे. राजकोट पटोला आणि पाटण पटोला शैलीतील विणकामांत मुख्य फरक म्हणजे या वस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा रंग. राजकोट शैलीतील वस्त्रांमध्ये रासायनिक रंगांचा वापर केला जातो. तर पाटण पटोला शैलीत विणण्यात आलेल्या वस्त्रांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. पाटण पटोला शैलीतील वस्त्रांवरील विणकाम हे ठळक आणि सुस्पष्ट असते. तर राजकोट शैलीतील विणकाम हे तुलनेने अंधूक असते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi gives patan patola scarf as gift to italian pm giorgia meloni know what is patan patola clothes prd
First published on: 18-11-2022 at 08:44 IST