Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0 eligibility criteria and step-by-step online application process: प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे पक्के घर असावे यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना – शहरी २.० (PMAY-U 2.0)’ ही महत्त्वाकांक्षी योजना १ सप्टेंबर २०२४ पासून लागू केली आहे. ऑगस्ट २०२९ पर्यंत चालणाऱ्या या योजनेत १ कोटी शहरी कुटुंबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य आहे. EWS, LIG आणि MIG गटातील नागरिकांना ₹२.५० लाखांपर्यंत मदत आणि गृहकर्जावर ४% व्याज अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

घर विकत घेण्याचे आव्हान

मात्र घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लागणारी मोठी आर्थिक तरतूद सर्वांनाच शक्य होत नाही. उच्च उत्पन्न गटातील लोकांना घर खरेदी करणे तुलनेने सोपे असते आणि मध्यमवर्गीयांना बँकांकडून गृहकर्ज मिळते. परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी कर्ज मिळवणे, तसेच त्याची परतफेड करणे, हे मोठे आव्हान ठरते.

एक कोटी शहरी घरे

हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना– शहरी २.० (PMAY-U 2.0)’ ही योजना १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू केली आहे. ही योजना पुढील पाच वर्षे म्हणजे ऑगस्ट २०२९ पर्यंत लागू राहणार आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत एक कोटी शहरी कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0 PMAY-U eligibility details | PMAY U 2.0 apply online guide in Marathi | प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अर्ज प्रक्रिया | PMAY-U 2.0 गृहकर्ज व्याज सबसिडी माहिती
PMAY-U 2.0: घरकुलासाठी अर्ज आणि सबसिडी नियम (Image- Gemini)

योजनेचा मुख्य उद्देश

या योजनेचा उद्देश शहरी भागातील गरीब, निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना पुढील बाबींसाठी आर्थिक मदत करणे हा आहे:

  • स्वतःचे पक्के घर बांधणे,
  • घर खरेदी करणे,
  • विद्यमान घराचा विस्तार किंवा सुधारणा करणे,
  • परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देणे.

योजनेअंतर्गत बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन (BLC), अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप (AHP), इंटरेस्ट सबसिडी योजना आणि भाड्याच्या घरांसाठी गृहनिर्माण (Rental Housing) अशा विविध घटकांचा समावेश त्यात आहे.

लाभ कोणाला मिळू शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील अटी महत्त्वाच्या आहेत:

  • अर्जदाराच्या कुटुंबाकडे भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे.
  • कुटुंबाने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश होतो.

उत्पन्नानुसार लाभार्थ्यांचे पुढील गट केले आहेत:

  • EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपर्यंत
  • LIG (निम्न उत्पन्न गट)– ₹३ लाख ते ₹६ लाख
  • MIG (मध्यम उत्पन्न गट)– ₹६ लाख ते ₹९ लाख

ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून ₹२.५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

कुणाला प्राधान्य?

योजनेमध्ये काही घटकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे:

  • विधवा महिला,
  • एकल महिला,
  • दिव्यांग व्यक्ती,
  • ज्येष्ठ नागरिक,
  • तृतीयपंथीय (Transgender),
  • अनुसूचित जाती-जमाती,
  • अल्पसंख्याक समाज,
  • सफाई कर्मचारी,
  • पथविक्रेते,
  • अंगणवाडी सेविका,
  • चाळीत किंवा झोपडपट्टीसदृश परिस्थितीत राहणारे नागरिक.

महिलांच्या नावावर किंवा संयुक्त मालकीत घर नोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे महिला सक्षमीकरणालाही चालना मिळते.

कर्ज आणि व्याज अनुदान

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ₹२५ लाखांपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. मात्र घराची किंमत ₹३५ लाखांपर्यंत असावी आणि घराचे क्षेत्रफळ १२० चौ. मीटरपर्यंत मर्यादित असते. योजनेतील महत्त्वाचा फायदा म्हणजे व्याजावर ४% पर्यंत सबसिडी मिळते. ही सबसिडी पहिल्या ₹८ लाख कर्जरकमेवर लागू होते.

  • कमाल व्याज अनुदान: ₹१.८० लाख
  • कालावधी: पहिली ५ वर्षे
  • वार्षिक फायदा: अंदाजे ₹३६,०००
  • कर्ज परतफेडीची मुदत: १२ वर्षांपर्यंत

कर्ज खाते NPA (थकीत) झाले तर व्याज अनुदानाचा लाभ मिळत नाही.

अर्ज कसा करावा?

अर्जदाराने PMAY-U च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

अर्जाची प्रक्रिया:

  1. Apply for PMAY-U 2.0 हा पर्याय निवडा.
  2. आधार क्रमांकाद्वारे OTP पडताळणी करा.
  3. वैयक्तिक माहिती, उत्पन्नाचा तपशील आणि बँक खात्याची माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करून त्याचा संदर्भ क्रमांक जतन करा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)
  • उत्पन्नाचा दाखला,
  • बँक पासबुक,
  • रहिवासी दाखला,
  • मालमत्तेची कागदपत्रे,
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • आवश्यक असल्यास जात किंवा दिव्यांग प्रमाणपत्र.

या योजनेचे प्रमुख फायदे

*आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळवण्याची संधी.

  • ४% व्याज अनुदानामुळे मासिक EMI कमी होतो.
  • महिलांच्या नावावर मालकीमुळे आर्थिक सुरक्षितता वाढते.
  • तृतीयपंथीय आणि एकल महिलांसाठी सन्मानाने निवासाची संधी निर्माण होते.
  • शहरी भागातील झोपडपट्ट्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी २.० ही केवळ गृहकर्ज योजना नसून “सर्वांसाठी सुरक्षित आणि सन्माननीय निवास” या व्यापक सामाजिक उद्दिष्टाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर परवडणारी घरे उपलब्ध करून देणे ही मोठी राष्ट्रीय गरज आहे. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.