जगातील अनेक देशांमधून पोलिओचे समूळ उच्चाटन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सहयोगी संस्थांच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. मात्र अजूनही जगातील काही देशांमध्ये पोलिओ पसरत आहे. युद्धाच्या सावटाखाली असणाऱ्या गाझामध्ये एका लसीकरण न झालेल्या बाळाला पोलिओची लागण झाली. या भागात २५ वर्षांहून अधिक वर्षांनी पहिल्यांदा पोलिओग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे युद्धविराम करून लसीकरण केले जाणार आहे.
पोलिओ काय आहे?
पोलिओ किंवा पोलिओमायलिटीस हा संसर्गजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. यामुळे पाठीचा कणा आणि मेंदूचा अर्धांगवायू होऊ शकतो. या आजाराची लागण विशेषतः ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होते. पोलिओची लागण होणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश लोकांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु विषाणूने रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. ताप, डोकेदुखी, उलटी, मणका आखडणे अशी काही पोलिओची लक्षणे इतर सामान्य आजारांमध्ये असतात तशी लक्षणे आहेत. पण गंभीर परिस्थितीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या ‘गतिप्रेरक न्यूरॉनना’ अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते. पोलिओचा विषाणू मज्जासंस्थेवर आघात करतो आणि काही तासांत अर्धांगवायू होऊ शकतो, अशी जागतिक आरोग्य संघटनेची माहिती आहे. हा प्रकार २०० पैकी एका रुग्णात आढळतो असे संघटनेचे निरीक्षण आहे. यामुळे विशेषतः पायांमध्ये कायमस्वरुपी पक्षाघात किंवा अर्धांगवायू होतो. ज्या मुलांना असा अर्धांगवायू जडतो त्यापैकी १० टक्के मुले त्यांच्या श्वसनक्रियेच्या स्नायूंवर परिणाम होऊन दगावतात. हा संक्रमित आजार असल्याने तो पसरण्याचा धोका असतो.
पोलिओ संक्रमित कसा होतो?
आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात धुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा अशा पोलिओ संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. गंभीर आजार होण्याचे प्रमाण कमी आहे. लसीकरण हाच यावरील प्रतिबंधात्मक प्रभावी उपाय आहे.
लसीकरणासाठी युद्धविराम
जगातील मोठमोठ्या बलशाली देशांनी प्रयत्न करूनही जे इस्रायल-हमास युद्ध थांबले नाही, ते युद्ध तीन दिवसांसाठी पोलिओमुळे थांबणार आहे. २५ वर्षांच्या खंडानंतर २३ ऑगस्ट २०२४ मध्ये गाझामध्ये पोलिओचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे सावध झालेल्या गाझाने सुमारे ६.४० लाख मुलांचे पोलिओ लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इस्रायल आणि हमासने गाझामधील काही भागांत प्रत्येकी तीन दिवसांच्या युद्धविरामास सहमती दर्शवली. मध्य, दक्षिण आणि उत्तर गाझामध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि युएनआरडब्ल्यूए या संघटनांच्या सहकार्याने पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
पोलिओचा भूतकाळ
जगात गेले कित्येक शतके पोलिओचे अस्तित्व आहे. प्राचीन इजिप्शियन चित्रलिपींमध्येही पोलिओग्रस्त मुले चितारलेली आढळतात. १९५० साली पोलिओची पहिली लस विकसित करण्यात आली. तत्पूर्वी पोलिओची जगभरात भयाण स्थिती होती. १९१६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये दोन हजारांहून अधिक लोक पोलिओमुळे मृत्युमुखी पडले होते. तर १९५२ मध्ये अमेरिकेत पुन्हा पोलिओमुळे तीन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. जे वाचले ते आयुष्यभरासाठी अपंग झाले. पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये ठराव केला. याला आठ वर्षांपूर्वी यशस्वीपणे राबविलेल्या देवी रोगाच्या उच्चाटनाची पार्श्वभूमी होती. २००० सालापर्यंत पोलिओ हद्दपार करण्याचे उद्दिष्ट होते. तोंडावाटे देण्याच्या लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली आणि पोलिओग्रस्तांचे प्रमाण ९९ टक्क्यांहून अधिक घटले. याला अपवाद केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांचा आहे. अद्यापही या देशातून पोलिओ हद्दपार झालेला नाही. त्यामुळे शेजारी देश म्हणून भारताला कायम सतर्क राहावे लागते. आफ्रिका खंडातील काही देशांमध्येही अद्याप पोलिओग्रस्त आहेत. गरीबी, आरोग्यव्यवस्थेची वानवा आदी कारणांमुळे काही देशांमध्ये अद्याप पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविता आलेली नाही. पण त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०२६ चे उद्दिष्ट ठेवले आहे.
हेही वाचा – चक्क हुकूमशहा हिटलरने ‘कार’ भेट देऊ केलेला ‘हा’ भारतीय महाराजा कोण होता?
भारतातील स्थिती
१९७०, १९८० आणि १९९० च्या दशकात भारतात पोलिओग्रस्तांचे प्रमाण शिगेला पोहोचले होते. त्यानंतर दरवर्षी दोन ते चार लाख पोलिओग्रस्तांची नोंद होत होती. पण भारताने लसीकरण मोहित अतिशय प्रभावीपणे राबविली आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. ‘दो बूंद जिंदगी की’ म्हणत व्यापक जनजागृती करून लसीकरण करण्यात आले. २०१४ पासून भारत पोलिओमुक्त आहे.